Vandaniya Shantakka : स्त्री ही समाजाला धारण करणारी सुदृढ शक्ती आहे, त्यामुळे ती नारायणी बनू शकते : वंदनीय शांताक्का

07 Mar 2026 17:25:51
Vandaniya Shantakka
 
मुंबई : (Vandaniya Shantakka) "भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. समाजाला धारण करणारी सशक्त शक्ती म्हणजे स्त्री असून त्यामुळेच ती ‘नारायणी’ बनू शकते. मंगलाचरण असो, वेदांचा अभ्यास असो किंवा ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी कार्ये असोत; भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अद्वितीय शौर्य आणि कर्तृत्व दाखवले आहे", असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्का यांनी केले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित महिला विचारवंतांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद ‘भारती – नारी से नारायणी’ च्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या.(Vandaniya Shantakka)
 
महिला विचारवंतांच्या या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून निर्माण होणारी ‘अमृतधारा’ देशभर पोहोचवून योग्य असा वैचारिक संवाद प्रस्थापित करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे वंदनीय शांताक्कांनी सांगितले. भारतीय दृष्टिकोनातून होणाऱ्या चिंतन-मननाला कृतीतही रूपांतरित करणे आवश्यक असल्याचे त्या (Vandaniya Shantakka) म्हणाल्या.
 
याप्रसंगी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यादेखील उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, भारतातील महिला केवळ परंपरेच्या वाहक नाहीत, तर परिवर्तनाच्या वाहकही आहेत. निर्णयक्षमता, धैर्य आणि परिश्रम यांचे स्त्री-पुरुष म्हणून वर्गीकरण होत नाही. आज प्रत्येक क्षेत्रात भारतीय महिला पुरुषांपेक्षा अधिक चांगले कार्य करत आहेत. महिलांनी स्वतःचे ध्येय निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. महिलांनी कुटुंब, समाज आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात; परंतु स्वतःच्या आनंदासाठीही थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याचाही विचार करायला हवा. मातांनी आपल्या मुलींना असे वातावरण द्यावे जे त्यांना स्वतःला मिळाले नाही, आणि त्यांना उंच भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश द्यावे.(Vandaniya Shantakka)
 
हेही वाचा : विविधता प्रत्यक्षात एकतेचे सौंदर्य आणि उत्सव आहे, विभाजनाचे कारण नाही; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
 
त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय महिलांमध्ये प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करण्याची क्षमता आहे. जर त्यांनी स्वतःची ध्येये निश्चित केली, तर त्या ‘नारी’पासून ‘नारायणी’ होऊ शकतात. या सभागृहात उपस्थित महिलांच्या चेहऱ्यांवर मला आनंद दिसत आहे. उच्च पदांवर कार्यरत महिलांनी इतर महिलांना पुढे येण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीचे त्यांनी कौतुक केले.(Vandaniya Shantakka)
 
उद्घाटन समारंभात भारतीय विद्वत परिषदेच्या सचिव शिवानी वी. यांनी सांगितले की ‘नारी ते नारायणी’ ही एक पवित्र यात्रा आहे. अनेकदा स्त्री सशक्तीकरणाची चर्चा केली जाते; परंतु स्त्री स्वतःमध्येच ऊर्जा आणि शक्तीचा स्रोत आहे. या परिषदेत प्रत्येक स्त्री सशक्तीकरणावर चर्चा करण्यासाठी नव्हे, तर स्वतःतील शक्ती जागृत करून आत्मबोधासाठी सहभागी झाली आहे. भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. त्या समस्या नसून ‘अल्टिमेट सोल्वर’ आहेत. शिक्षणाचा अर्थ केवळ अक्षरज्ञान नसून शक्तीचे संस्कारही असावेत. या दोन दिवसीय परिषदेतून मिळणाऱ्या सूचनांना भारत सरकारच्या संबंधित विभागांकडे पाठवले जाईल.(Vandaniya Shantakka)
 
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत आठ विविध विषयांवर चर्चा होत असून महिला खासदार, कुलगुरू (व्हाइस चान्सलर) आणि साध्वींचे विशेष पॅनेल चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे. ८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परिषदेला समारोपाच्या कार्यक्रमात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. या परिषदाचे आयोजन भारतीय विद्वत परिषद, राष्ट्र सेविका समिती आणि स्वयंसेवी संस्था शरण्या यांनी संयुक्तपणे केले आहे.(Vandaniya Shantakka)
 
Powered By Sangraha 9.0