Mumbai ATS : मुंबईत 'जैश-ए-मोहम्मद'चे नेटवर्क उद्ध्वस्त; विद्यार्थी एटीएसच्या जाळ्यात

06 Mar 2026 17:24:44
Mumbai ATS

मुंबई : (Mumbai ATS) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुंबईत मोठी कारवाई करत ऑनलाइन दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेल्या अयान शेख याला अटक केली आहे. दरम्यान, अयान शेख याच्याबद्दल धक्कादायक खुलासे झाले असून, तो गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईत 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचे तपासातून समोर आले आहे.(Mumbai ATS)

तरुणांची भरती आणि ब्रेनवॉशिंग

तपासानुसार, जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून अयानवर तरुणांना कट्टरतेकडे वळवणे आणि दहशतवादी कारवायांसाठी त्यांची भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अयानने त्याच्यासोबत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर आणि जवळच्या मित्रांवर दबाव टाकल्याचेही एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, अयानच्या प्रभावाखाली येऊन त्याचे दोन मित्र देशाबाहेर जाऊन दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत होते. या प्रकरणी एटीएसने संबंधित दोन्ही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.(Mumbai ATS)
 
दहशतवादी कारवायांसाठी परदेशातून क्रिप्टोकरन्सीद्वारे निधी

अयानला या देशविघातक कृत्यांसाठी पाकिस्तान आणि सौदी अरेबियातून सतत निधी पुरवला जात होता. हा पैसा 'क्रिप्टोकरन्सी'च्या माध्यमातून दिला जात असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याला आतापर्यंत एकूण किती रक्कम मिळाली, याचा शोध घेण्यासाठी एटीएस त्याचे बँक खाते आणि 'मनी ट्रेल'ची कसून चौकशी करत आहे.(Mumbai ATS)
 
मोबाईलमध्ये आढळले पुरावे
 
अयानच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर आणि हाफिज सईद यांचे प्रक्षोभक ऑडिओ-व्हिडिओ सापडले आहेत. तो टेलिग्राम आणि इतर एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय होता, जिथे तो दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करायचा. तपासात असेही समोर आले आहे की, तो अनेक परदेशी हँडलर्स आणि जैश-ए-मोहम्मद व आयसिस (ISIS) शी संबंधित स्लीपर नेटवर्कच्या संपर्कात होता.(Mumbai ATS)


Powered By Sangraha 9.0