Jishnu Dev Varma: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णु देव वर्मा कोण आहेत? त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री ते राज्यपाल...

06 Mar 2026 12:18:08

Jishnu Dev Varma 
 
मुंबई : (Jishnu Dev Varma) देशातील राज्यपालांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी ५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णु देव वर्मा यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सध्या ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. या निर्णयामुळे देशभरातील अनेक राज्यांतील राज्यपालांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यापूर्वी सी.पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर आचार्य देवव्रत हे अतिरिक्त जबाबदारी म्हणून महाराष्ट्राचे कार्यवाह राज्यपाल म्हणून काम पाहत होते. (Jishnu Dev Varma)
 
कोण आहेत जिष्णु देव वर्मा?
 
जिष्णु देव वर्मा यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून ते त्रिपुरा येथील शाही राजघराण्याशी संबंधित आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे दीर्घकाळ कार्यकर्ते असून १९९० च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनामध्येही सक्रिय सहभागी झाले होते. कलकत्ता विद्यापीठातून बी.ए. ऑनर्स पदवी प्राप्त केली असून, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुखही राहिले. (Jishnu Dev Varma)
 
त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री...
 
२०१८ मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत त्यांनी चारिलम मतदारसंघातून २५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१८ ते २०२३ या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. (Jishnu Dev Varma)
 
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या वेळी ते त्रिपुरातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक म्हणून चर्चेत होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. (Jishnu Dev Varma)
 
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय...
 
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिष्णु देव वर्मा यांचा दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभव लक्षात घेता, राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये समन्वय आणि स्थैर्य राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Jishnu Dev Varma)
 
 
Powered By Sangraha 9.0