घरचे झाले थोडे....

06 Mar 2026 12:37:18

जर तुम्ही यहुदी आणि ‘झिओनिझम’च्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘गाझा पीस बोर्ड’मधून माघार घेतली नाही, तर पाकिस्तानच्या प्रत्येक रस्त्यावर आणि विशेषतः गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तुमचा अपमान आणि अपमानच होईल,” असा इशारा प्रमुख शिया धार्मिक नेते शेख करामत हुसेन नजाफी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांच्या सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लीम लीग’ (एन) (पीएमएल-एन) यांना नुकताच दिला. हे म्हणजे पाकिस्तानसाठी असे झाले की, ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’. कारण, ज्या तालिबानला पाकिस्तानने पोसले, ते तालिबानच आता पाकिस्तानच्या मुळावर उठले आहे.

अफगाणिस्तानने युद्ध करत, पाकिस्तानला दिवसा चंद्र दाखवायला सुरुवात केली आहे. त्यातच पाकिस्तानमधील मुस्लिमांमध्येच अनेक वर्ग-उपवर्ग आहेत. सुन्नी, शिया, अहमदी आणि कितीतरी वर्ग-उपवर्गातील मुस्लिमांचे एकमेकांशी अजिबात सख्य नाही. त्यामुळे तेही एकमेकांवर हल्ले करतात, सामुदायिक अत्याचार नेहमीचे झाले आहे. हे सगळे सुरू असताना पाकिस्तानमध्ये जे आदिवासी आहेत, त्यांचे आणि इतर पाकिस्तान्यांचेही विळा-भोपळ्याचे संबंध. थोडक्यात, पाकिस्तानात शांती, सौख्य वगैर वगैरे अजिबात नाही. ‘आकाश फाटल्यावर कुठे-कुठे ठिगळ लावणार’ ही म्हण सध्या पाकिस्तान जगत आहे, तर या असल्या अस्थिर आणि बेबंद परिस्थितीमध्ये ‘शिया’ समुदायाच्या धार्मिक नेत्याने पाकिस्तानी सत्ताधार्‍यांना इशारा देऊन एकप्रकारे वातावरण अजूनच अस्थिर केले आहे.

कारण, इराणचे खामेनी म्हणजे शियांसाठी सर्वोच्च राजकीय नेतृत्व होते. खामेनी यांची नुकतीच हत्या झाली. त्यामुळे शियाच नव्हे; तर जगभरातले मुस्लीम अस्वस्थ झाले. तसेही इराण हा शियापंथी असलेला देश. मात्र, पॅलेस्टाईनच्या गाझामधील सुन्नी मुसलमानांसाठी इराणने पुढाकार घेतला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या मुस्लिमांच्याही इराणच्या प्रती निष्ठा वाढल्या होत्या. अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात इराण लढतो म्हणजे इस्लामसाठी लढतो, असे जगभरातल्या अनेक मुसलमानांना वाटत होते. ‘सेव्ह गाझा, सेव्ह गाझा’ असे म्हणत पाकिस्तानमध्येही धुमाकूळ सुरूच होता. पाकिस्तानी जनता रस्त्यावर उतरली होती. पण, ‘अपना काम बनता, *ड में जाए जनता’ हे पाकिस्तान सरकारचे ब्रीदवाक्य असल्यासारखे पाकिस्तानचे सरकार तिथल्या नागरिकांच्या भावनांशी फटकूनच वागते. अमेरिका आणि इराणचा शत्रू सौदी अरब या दोन देशांशी पाकिस्तान जीवाभावाचे नाते जपत राहिला. पण, आता अमेरिका-इस्रायल आणि आखाती देशांत (ज्यात सौदी अरबही आलाच) यांनी इराणविरोधात घनघोर युद्ध सुरू केले. दुसरीकडे इस्रायलने पॅलेस्टाईनवरच्या हल्ल्यामध्ये जराही कमतरता आणली नाही. थोडक्यात, गाझावासीयांची युद्धातून सुटका झाली नाही.

अमेरिकेने पुढाकार घेत, इस्रायलच्या सहकार्याने गाझामध्ये शांती आणि जीवन पुन्हा प्रस्थापित व्हावे म्हणून ‘गाझा पीस बोर्ड’ स्थापन केले. यावर कट्टरपंथी मुस्लिमांचे म्हणणे होते की, इस्रायलचे ज्यू आणि अमेरिकेचे ‘झाओनिस्ट’ (जे ‘ज्यूं’चे रक्षण करतात) हे गाझातल्या मुस्लिमांचे पुनर्वसन करणार? हे शक्य नाही. ते शत्रू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान या बोर्डमध्ये सामील झाला. पाकिस्तानसारख्या मुस्लीम देशाने या ‘गाझा पीस बोर्ड’मध्ये जाऊन चुकीचे काम केले, शत्रूंना मदत केली, असेच पाकिस्तान्यांना वाटले. मात्र, त्यांच्या वाटण्याला पाकिस्तानी सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

पण, आता पाकिस्तानमध्ये हे युद्धाचे वातावरण असताना शिया धार्मिक नेत्याने पाकिस्तानला ‘गाझा पीस बोर्ड’मधून निघण्याचा इशारा दिला आहे. त्या इशार्‍याचे पाकिस्तानी जनता समर्थन करत आहे. बरे, पाकिस्तानची काय हिंमत की, तो अमेरिकेच्या विरोधात जाऊन त्या बोर्डमधून बाहेर पडेल? ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी पाकिस्तानची अवस्था. पण, या पार्श्वभूमीवर वाटते की, शिया समुदायाच्या नेत्याने पाकिस्तान सरकारला ‘गाझा पीस बोर्ड’मधून बाहेर पडले नाही, तर त्यांचा सर्वत्र अपमान होईल हे जे म्हटले, ते काही पटले नाही. कारण, अपमान त्यांचाच होतो, ज्याला मान असतो. मुळात नेहमीच तोंडघशी पडणार्‍या आणि जगभरात भीक मागणार्‍या पाकिस्तानला मान आहे का? त्यामुळे ‘शिया’ नेत्याने चुकीचा इशारा दिला, असे वाटते. याबाबत कुणाचेही दुमत नसेलच!


Powered By Sangraha 9.0