वैद्यकीय धर्म आणि आध्यात्मिक कर्म यांचा सुवर्णसंगम साधणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अजय प्रभाकर संखे, ज्यांना आध्यात्मिक जगतात ‘माधवानंद प्रभूजी’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्याविषयी...
जगी सर्व सुखी असा कोण आहे|
विचारी मना तूचि शोधूनि पाहे॥
समर्थ रामदासांची ही उक्ती मानवी जीवनातील अपूर्णता दर्शवते. याच धर्तीवर ‘जगी सर्वगुणी असा कोण आहे?’ असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर शोधणे कठीण जाते. कारण, माणसामध्ये उणिवा असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु, काही व्यक्ती याला अपवाद ठरतात. वैद्यकीय क्षेत्रातील नैपुण्य, सामाजिक बांधिलकी आणि प्रगाढ आध्यात्मिक बैठक यांचा त्रिवेणी संगम असलेले असेच एक अपवादात्मक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अजय प्रभाकर संखे, ज्यांना आध्यात्मिक जगतात ‘माधवानंद प्रभूजी’ म्हणूनही ओळखले जाते.पालघर जिल्ह्यातील धुकटण या छोट्याशा गावी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर डॉ. अजय संखे यांचा जन्म वारकरी परंपरा जपणार्या कुटुंबात झाला. १९७०च्या दशकात बालपणी ‘टायफॉईड’ने त्यांना मृत्यूच्या दारात लोटले होते. त्याकाळी ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे होणारी तडफड त्यांनी अनुभवली. तिथूनच एका ध्येयाचा जन्म झाला-‘ग्रामीण भागासाठी तज्ज्ञ डॉटर’ होण्याचा!
अजय यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर होता. पालघरच्या भारत छात्रालयात राहून आर्यन शाळेत त्यांनी दहावीत केंद्रात दुसरा क्रमांक पटकावला. पुढे मुंबईच्या रुपारेल कॉलेज आणि जे. जे. रुग्णालयातून वैद्यकीय पदवी व सेंट जॉर्ज रुग्णालयातून ‘एमडी’ (बालरोगतज्ज्ञ) पूर्ण केले. वरळीच्या संत एकनाथ हॉस्टेलसारख्या ठिकाणी राहून त्यांनी शिक्षणाची ही शिखरे गाठली. शिक्षण घेत असतानाच, आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी मित्रांची एक टीम तयार केली. ही टीम केवळ पुस्तकी-ज्ञान मिळवत नव्हती, तर सुट्यांमध्ये गावागावांत वैद्यकीय शिबिरे यशस्वीपणे आयोजित करीत होती. मोफत उपचार, मोफत औषधे आणि डॉक्टरमित्रांनी स्वतः तयार केलेला ‘सात्त्विक प्रसाद’ हे या शिबिरांचे वैशिष्ट्य. याच टीमने पुढे सर्जरी,
ऑर्थो, मेडिसीन, स्त्रीरोग, बालरोग अशा विविध शाखांत प्रावीण्य मिळवले आणि पालघरमध्ये ‘चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली.वैद्यकीय शिक्षणादरम्यान अजय यांचा संपर्क ‘इस्कॉन’शी आला. १९८५ मध्ये त्यांनी श्रील राधानाथ स्वामी महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले आणि ‘माधवानंद प्रभू’ म्हणून त्यांच्या आध्यात्मिक प्रवासालाही सुरुवात झाली. त्यांनी आपल्या गृहस्थी कर्तव्यात किंवा वैद्यकीय सेवेत कधीही अध्यात्माचा अडथळा येऊ दिला नाही.
पालघरच्या ‘चैतन्य लिनिक’पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास फिलिया हॉस्पिटल, विरारच्या संजीवनी हॉस्पिटलमधून मिरा रोड येथील भव्य ‘भक्ती वेदांत’ हॉस्पिटलच्या रूपाने विसावला. मिरा रोड येथील प्रसिद्ध ‘भक्ती वेदांत हॉस्पिटल’ हे त्यांच्या कष्टाचे फलित आहे. ३५० खाटांचे हे रुग्णालय आज आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘स्पिरिच्युअल केअर’ (आध्यात्मिक काळजी) यांचा मेळ घालणारे भारतातील एकमेव केंद्र ठरले आहे. मथुरा येथील वैद्यकीय केंद्र असो, पंढरपूरची वारी असो किंवा कुंभमेळा, डॉ. संखे यांची टीम तिथे सेवेसाठी तत्पर असते. विशेष म्हणजे, स्वतः डॉ. संखे वारीत पायी चालत सेवा देतात. ‘कोरोना’च्या भीषण संकटात स्वतः दोनवेळा बाधित होऊनही त्यांनी आपली सेवा थांबवली नाही. पी. व्ही. जोशी कोरोना केंद्रात ते अविरत कार्यरत होते. पालघरमधील कृष्णभक्तांसाठी त्यांनी आपल्या घराचे रूपांतर मंदिरात केले, जे आज भव्य ‘इस्कॉन मंदिरा’च्या रूपात उभे आहे. पालघर जिल्ह्यातील धुकटण, तारापूर, हमरापूर, आंबिस्ते, निर्मळ अशा गावांमध्ये अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचे कार्य आजही अखंड सुरू आहे.
डॉ. संखे हे केवळ डॉक्टर नाहीत, तर ते: ‘गोवर्धन इको व्हिलेज’ (गालतरे) या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद असलेल्या जागतिक कीर्तीच्या संस्थेचे ट्रस्टी, ‘विश्व हिंदू परिषद’, कोकण प्रांताचे महत्त्वाचे पदाधिकारी, ‘विराट हिंदुस्थान संगम’ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. पहाटे साडेतीनला ब्रह्ममुहूर्तावर त्यांचा दिवस सुरू होतो. दररोज १६ माळा जप, सात्त्विक आहार आणि कडक शिस्त पाळत ते आजही रोज ‘ओपीडी’ चालवतात.
एकीकडे ३५० खाटांच्या हॉस्पिटलचे संचालन, तर दुसरीकडे शिष्यांना मार्गदर्शन आणि कीर्तन हे सर्व ते लीलया पेलतात. या धावपळीतही त्यांनी आपल्या कुटुंबाकडे (स्त्रीरोगतज्ज्ञ पत्नी, भूगर्भशास्त्रज्ञ मुलगा आणि वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी) कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही.डॉ. अजय संखे हे मुंबई आणि ठाणेच्या उत्तर विभागातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘भक्ती वेदांत’ रुग्णालयाला २०१५ मध्ये महाराष्ट्रातील नवकल्पना आणि संशोधनासाठीचे ‘सर्वोत्तम मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ हा पुरस्कार मिळाला आहे. समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. अजय संखे यांना २०१३ मध्ये ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’कडून त्यांना ‘राष्ट्रीय उद्योगरत्न’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. कलियुगातील दोषांचा स्पर्श स्वतःला होऊ न देता, नम्रतेने आणि हसतमुखाने ‘सेवा हाच धर्म’ मानणार्या डॉ. अजय संखे ऊर्फ माधवानंद प्रभुजींच्या कार्याला त्रिवार सलाम. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
- कमलेश संखे