बलवानों को दे दे ज्ञान...!

05 Mar 2026 13:05:13

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहंकारामुळे अर्ध्या जगाची राखरांगोळी केली जात आहे. साऱ्या गोष्टी झटपट आणि आपण म्हणू तशाच घडल्या पाहिजेत, या अहंकाराने घेरलेल्या ट्रम्प यांना इराणने जोरदार दणका दिला आहे. अमेरिकेला ‌‘महान‌’ करण्याऐवजी तिचा दरारा ‌‘लहान‌’ करण्यास ते जबाबदार ठरत आहेत.

जगात कुठेही युद्ध सुरू करण्यास अमेरिका एका पायावर तयार असते. पण, ते युद्ध जर तिच्या अपेक्षा आणि आखणीप्रमाणे घडत गेले नाही, तर मात्र डाव अर्धवट टाकून पळ काढण्यात देखील अमेरिका पटाईत आहे. अफगाणिस्तानला तब्बल 20 वर्षे नियंत्रणाखाली ठेवूनही तेथे लोकशाहीची मुळे अमेरिकेला रुजविता आली नाहीत. इतकेच नाही, तर त्या राजवटीला स्वसंरक्षणासाठीही ती सामर्थ्यवान करू शकली नाही. अमेरिका कधीतरी कंटाळून परत जाईलच, याची तालिबानला पूर्ण खात्री होती. अखेरीस अमेरिकेने अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडले आणि तिचे सैन्य रातोरात अमेरिकेला पळून गेले. सुमारे 20 वर्षे मुक्त जीवन जगलेल्या लोकांना तालिबानने पुन्हा मध्ययुगात लोटले आहे. तेथील जीवन कसे असेल, याची भारतीयांना कल्पनाही करता येणार नाही.

इराकचीही अशीच सैरभैर अवस्था करून टाकली आहे. त्या देशावर कोणाचे नियंत्रण आहे, तेच कळत नाही. कारण, इराकच्या काही भागावर ‌‘इसिस‌’चे नियंत्रण आहे, तर उत्तरेकडील काही प्रदेशावर कुर्दांचे नियंत्रण आहे. देशाचा काही भाग बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे, तर उर्वरित भागावर अमेरिकेचे अंकित असलेल्या सरकारचा ताबा आहे. या गोंधळातून त्या देशाचा कोणता आणि कसा विकास होत आहे, ते फक्त अमेरिकाच जाणो!

आता इराणला उद्ध्वस्त केले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी इराणसह संपूर्ण आखाती प्रदेश युद्धाच्या आगीत लोटला गेला. अमेरिकेला ‌‘महान‌’ करण्याच्या नादात ट्रम्प यांनी साऱ्या जगाला अनिश्चिततेच्या आणि युद्धाच्या खाईत लोटले आहे. जगातील बहुसंख्य देश आपली उत्पादने अमेरिकेला विकत होते आणि अमेरिकेकडून फारच थोडा माल खरेदी केला जात होता. साहजिकच, अमेरिकेचा व्यापार तुटीचा होता. अमेरिकी जनतेला प्रत्येक वस्तू स्वस्तात मिळायला हवी असते आणि आपली सुखासीन जीवनशैली बदलण्यास अमेरिकी नागरिक तयार नसतात. त्यामुळे त्यांनी देशातील कारखाने दुसऱ्या देशांमध्ये हलविले आणि त्या देशांकडून स्वस्तात माल आयात करण्यास प्रारंभ केला.

हा असमतोल दूर करण्याचा चंग ट्रम्प यांनी बांधला होता. त्यासाठी अमेरिकी अर्थव्यवस्थेला पुन्हा उत्पादन-केंद्रित करणे गरजेचे होते. पण, आर्थिक गणित आणि कायद्याने दिलेले स्वातंत्र्य, यामुळे अमेरिकी कंपन्या अमेरिकेत कारखाने उघडण्यास नाखूश होत्या. रातोरात हे घडणेही शक्य नव्हते. त्यामुळे ट्रम्प यांनी यावर साधा आणि सोपा उपाय योजला. तो म्हणजे आयात मालावर जबरदस्त शुल्क (टॅरिफ) लादणे. अमेरिकी सरकारला यामुळे उत्पन्न मिळाले हे खरे; पण अंतिम ग्राहकासाठी सर्व वस्तू महागल्या. कारण, हे आयातशुल्क कंपन्या ग्राहकांकडूनच वसूल करीत होत्या. वाढती महागाई आणि अतिशय कमी विकासदर, यामुळे अमेरिकेत बेरोजगारी व महागाई वेगाने वाढली आहे. आजवर सुरळीत चाललेल्या गाड्याला ट्रम्प यांच्यामुळे खीळ बसली आहे. परिणामी, ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने असे मनमानी आयातशुल्क लादण्याचा ट्रम्प यांना अधिकारच नसल्याचा निकाल दिल्याने ट्रम्प यांचा सारा तोरा उतरला. हे कमी होते म्हणून की काय, ‌‘एपस्टिन फाईल‌’मधील एकेक गौप्यस्फोटांमुळे ट्रम्प यांची वैयक्तिक बदनामीही होत आहे.

या साऱ्याचा विपरीत परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर आणि येत्या नोव्हेंबरमध्ये संसदेच्या होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीवर होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. सध्या ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे सीनेट आणि प्रतिनिधीगृह या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत आहे. पण, नोव्हेंबरमधील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जोरदार फटका बसून या दोन्ही सभागृहांतील बहुमत जाण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसे झाल्यास आपल्या हाती निरंकुश सत्ता राहणार नाही आणि विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाकडे थोडे जरी बहुमत आले, तर तो पक्ष आपल्यावर महाभियोगही चालवू शकेल, हे ट्रम्प जाणतात. त्यामुळे त्यांनी आपली बाजू सावरण्याचा सोपा, सवंग मार्ग निवडला.

हा सोपा मार्ग म्हणजे, जगात कुठेतरी युद्ध सुरू करायचे आणि त्यात विजय मिळवून देशातील जनतेला राष्ट्रभक्तीचे चूर्ण चाटवायचे, असा हिशोब ट्रम्प यांनी केला. इराणचा ‌‘अण्वस्त्र कार्यक्रम‌’ हा विषय आयताच त्यांच्या हाती लागला. त्याला इस्रायलने भरपूर हवा दिली. कारण, तो त्या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. इराण हा तिसरा जगातील मागास देश आहे, त्याच्यावर आधीच भरपूर आर्थिक निर्बंध आहेत आणि तो अमेरिकेसारख्या महा-महासत्तेपुढे किती काळ टिकाव धरेल, या गैरसमजुतीमुळे अमेरिकेने मागचा-पुढचा विचार न करता आणि पुरेशी सामरिक तयारी न करताच इराणवर हल्ला चढविला. आता चार-पाच दिवस उलटल्यावरही इराणच्या शरणागतीची धूसर शक्यताही दिसत नाही. उलट, त्याने आजूबाजूच्या सर्व देशांचे जितके आर्थिक नुकसान करता येईल, तितके करण्याचा सपाटा लावला आहे. इराणची कितीही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले, तरी त्यांचा पुरवठा काही कमी होताना दिसत नाही. दिवसागणिक युद्धाची भौगोलिक व्याप्ती आणि आर्थिक नुकसान भूमिती-श्रेणीने वाढत चालले आहे. हे नुकसान अमेरिका आणि इस्रायल यांच्या कथित लष्करी सामर्थ्यावरही शंका उपस्थित करीत आहे. हे युद्ध आपल्या हाताबाहेर चालले असल्याची चाहूल ट्रम्प यांना लागली आहे.

या स्थितीत ‌‘हम दोनो‌’ चित्रपटातील या प्रार्थनेच्या ओळी आजच्या परिस्थितीत किती चपखल बसतात, ते पाहा. त्यात लताजींचा आर्त स्वर गातो-

ओ सारे जग के रखवाले, निर्बल को बल देने वाले,
बलवानों को दे दे ज्ञान, सबको सन्मति दे भगवान|


बलवंत, धनवंतांनी आपल्या या ताकदीचा विनियोग दुर्बलांच्या कल्याणासाठी करावा, अशी सुबुद्धी परमेश्वर त्यांना देवो, हेच या प्रार्थनेत म्हटले आहे. आज जे बलवान देश आकाशातून आग बरसत आहेत, त्यांना सुबुद्धी मिळो आणि हे युद्ध लवकरच संपुष्टात येवो, अशी प्रार्थना करण्याखेरीज आपल्या हाती तरी काय आहे?

- राहुल बोरगांवकर

Powered By Sangraha 9.0