युद्धाच्या अर्थझळा...

05 Mar 2026 13:01:57

तेलाच्या वाढत्या किमती, बंदरे, विमानतळांवर अडकून पडलेला शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा माल... अशी सध्या कमी-अधिक प्रमाणात जगभरात उद्भवलेली चिंताजनक परिस्थिती आणि त्याचे कारण म्हणजे इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने छेडलेले युद्ध. साहजिकच या युद्धाच्या अर्थझळा भारतातही जाणवतील. त्यानिमित्ताने युद्धामुळे भारतीय बाजारपेठांवर होणाऱ्या परिणामांचे केलेले हे आकलन...

पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेच्या भीषण युद्धाचा भारतातील सुकामेवा बाजारपेठेला मोठा फटका बसला. सुकामेवा भारतात इराणवगळता अफगाणिस्तान, सौदी अरब, यूएई, इराक आदी देशांमधूनही दाखल होतो. पण, आता पश्चिम आशियातील बहुतांश देश युद्धज्वरात सापडल्यामुळे मालवाहतूक ठप्प झाल्याने सुकामेव्याच्या किमतीही वाढू लागतील. त्यामुळे सुकामेव्याच्या व्यापाऱ्यांना, ग्राहकांनाही याची झळ बसणार आहे. यावर अवलंबून असलेले व्यवसाय जसे की- मिठाई आणि अन्य पदार्थांच्या किमतीही महागण्याची भीती वर्तविली जात आहे. या संपूर्ण बाजारपेठेची उलाढाल 65 हजार कोटी इतकी. त्यांपैकी 40 हजार कोटींची आयातच. सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे नव्या ऑर्डर देणेच व्यापाऱ्यांनी बंद केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत इतका प्रचंड माल अडकून पडला आहे. पिस्ता, खजूर, अंजीर, केसर, बदाम आदी सुकामेवा मिळावा, यासाठी व्यापारी अफगाणिस्तान व यूएईवर अवलंबून आहेत. काही ठिकाणी बदाम अमेरिकेतूनही आयात केला जातो. मात्र, ‌‘टॅरिफ‌’मुळे तिथेही चिंतांचे ढग दाटून आले आहेत.

तिकडे भारतीय बंदरावर कित्येक टन बासमती तांदूळदेखील पडून आहे. हा सर्व माल इराणला पोहोचवला जाणार होता. याचाच अर्थ इराणला युद्धाची कल्पना होतीच, त्यामुळेच हा साठा केला जात होता, असाही एक अंदाज वर्तविला जात आहे. इराण हा भारतीय बासमती तांदूळ बाजारपेठेतील प्रमुख खरेदीदार. पण, आता रमजानच्या महिन्यात लागणाऱ्या अधिकच्या बासमती तांदळाची ऑर्डरही बंदरावर पडून आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात भारताने एकूण 10.4 लाख टन सुगंधित बासमती तांदूळ इराणला निर्यात केला होता. गतवषच्या तुलनेत ही वाढ 27 टक्क्यांनी जास्त होती. फेब्रुवारी महिन्यात इराणने 2.38 लाख टन बासमती तांदूळ भारताकडून विकत घेतला. हा गतवषच्या तुलनेत 23 टक्क्यांनी जास्त आहे. त्याची किंमत 800 डॉलर प्रतिटन इतकी. भारत एकूण 60 ते 65 लाख टन बासमती तांदूळ निर्यात करतो आणि त्यापैकी दहा लाख टनापर्यंत इराणच या तांदळाची खरेदी करतो. त्यामुळे या युद्धामुळे हा व्यापारही मंदावल्याचे चित्र आहे.

जवळपास एक कोटी भारतीय कामानिमित्त, शिक्षणासाठी आखाती देशांमध्ये कार्यरत आहेत. तसेच या क्षेत्रात भारताच्या चार ते पाच लाख परिचारिकाही सेवा बजावतात. एकट्या केरळमधून अडीच लाख परिचारिका पश्चिम आशियाई देशांमध्ये कार्यरत आहेत.

पश्चिम आशियातील या दिवसेंदिवस आणखीनच भडकणाऱ्या संघर्षाचा सर्वात मोठा फटका बसलेले तितकेच महत्त्वाचे दोन घटक म्हणजे, जगभरातील शेअर बाजार आणि कच्चे तेल. आशियातील शेअर बाजारांच्या, भांडवली बाजाराच्या एकूण एक टक्क्याची सरासरी घसरण झाली. होळीमुळे भारतीय शेअर बाजार मंगळवारी बंद होता. मात्र, बुधवार, दि. 4 मार्च रोजी ‌‘सेन्सेक्स‌’ 1122 अंकांनी, तर ‌‘निफ्टी‌’ 385 अंकांनी कोसळला. इराण आता होर्मुझची सामुद्रधुनीही लक्ष्य करत असून, येणाऱ्या मालवाहू जहाजांना थेट लक्ष्य करत आहे.

तसेच नैसर्गिक वायूच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली, ज्याचा फटका भारतासह जगभरातील देशांनाही बसणार आहे. सोन्याचा भाव तर एक लाख, 67 हजारांवर पोहोचला; तर चांदीचा भाव तीन लाख, दहा हजार प्रतिकिलो पोहोचला. विशेषतः गेल्या काही काळात धातूच्या- तांब्याच्या किमतीही 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम आगामी काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीवर दिसून येतो. परिणामी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दरही वाढू शकतात.इराण-इस्रायल युद्ध असेच सुरू राहिले, तर खाद्यतेलाच्या किमतीही आकाशाला भिडण्याची चिन्हे आहेत. कारण, हे खाद्यतेल वाहून आणणाऱ्या कच्च्या तेल्याच्या किमतीच वाढणार आहेत. सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन तेलाची खरेदी आंतरराष्ट्रीय बाजारातून भारत करतो. एकूण खाद्यतेलाच्या हिस्सेदारीत 89-90 टक्के इतकी आयात होते. नोव्हेंबर 2024 ते 2025 पर्यंतच्या काळात एकूण 1.60 कोटी टन वनस्पती तेलाची आयात देशात झाली. भारतात पामतेल हे मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांतून प्रामुख्याने येते, तूर्त त्यांच्या वाहतुकीवर कोणता परिणाम झालेला दिसत नाही. भारतात सर्वात जास्त पामतेलाची विक्री होते, त्यानंतर सोयाबीन तेलाचा क्रमांक लागतो. आफ्रिकेमार्गे व्हाया ‌‘केप ऑफ गुड होप‌’वरून ही आयात होते; तर दुसरा पर्यायी मार्ग ‌‘सुएझ‌’ कालव्याचा आहे. याला सध्यातरी कुठलाही अडथळा नाही. मात्र, सूर्यफुलाची आयात रशिया आणि युक्रेनहून केली जाते. या देशांतील युद्धकाळात वाहतुकीवर परिणाम झाला होता. होर्मुझची सामुद्रधुनी हा खाद्यतेल व्यापाऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासोबतच इंधनाच्या साठवणीसंदर्भात सर्वच देश सतर्क झाले आहेत. भारताकडेही इंधनाचा मुबलक साठा आहे, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. हवाई वाहतुकीवर तर या युद्धाने संक्रांत ओढवली. देशभरात तीन दिवसांत चार हजार विमान उड्डाणे रद्द झाल्याची आकडेवारी आहे. अनेक कार्गो विमानांची उड्डाणेही यामुळे रद्द झाली आहेत. परिणामी, कच्च्या मालाच्या किमतींतही वाढ होण्याची भीती आहे. तसेच उपभोक्ता आणि सामानाची विक्री करणाऱ्या ‌‘एफएमसीजी‌’ कंपन्यांनीही युद्ध-परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. वितरण शृंखला खेळती राहावी, याची खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, औषधे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही कंपन्या लक्ष ठेवून आहेत.

देशातील वाहन कंपन्यांनाही युद्धजन्य परिस्थिती चिंताजनक वाटू लागली आहे. सरते आणि नवे आर्थिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले असतानाच सुरू असलेली युद्धस्थिती ही लक्षात घेता, आखाती देशात अपेक्षित असलेली निर्यात कंपन्यांना गाठणे कठीण होऊन बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वच वाहन कंपन्या युद्धावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही युद्धजन्य परिस्थिती निवळावी, अशीच अपेक्षा भारतीय उद्योगविश्वाकडूनही व्यक्त होताना दिसते.


Powered By Sangraha 9.0