Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत चुकीचे दावे

05 Mar 2026 17:38:25
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project
 
मुंबई : (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये अनेक दावे शक्यतांवर आधारित असून त्यांचा ठोस तथ्यांशी संबंध नसल्याचे तसेच या प्रकल्पाच्या खर्च, निधी आणि आर्थिक भाराबाबत पसरवल्या जाणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये तथ्यात्मक त्रुटी असल्याचेही नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पष्ट केले आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
या प्रकल्पाचा अद्ययावत खर्च जागतिक निकषांनुसार निश्चित करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुरुवातीचा खर्चाचा अंदाज जवळपास दशकभरापूर्वी प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात तयार करण्यात आला होता. जगभरातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सविस्तर डिझाइन, अभियांत्रिकी आराखडे, भूसंपादन आणि बांधकाम करार अंतिम झाल्यानंतरच खर्चाचा पुनर्मूल्यांकन करून अद्ययावत अंदाज जाहीर केला जातो. भारतामध्ये यापूर्वी महामार्ग, मेट्रो रेल्वे आणि विमानतळांसारखे मोठ्या प्रमाणातील प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमध्येही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि निविदा प्रक्रियेनंतर खर्चामध्ये बदल करण्यात आले होते.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पासाठी भारत आणि जपान यांच्यात वित्त पुरवठ्याबाबत स्पष्ट आणि व्यापक करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला अत्यंत सवलतीच्या अटींवरील सार्वभौम कर्जाचा आधार असून त्यामध्ये अत्यल्प व्याजदर आणि दीर्घकालीन परतफेडीचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प भारत–जपान द्विपक्षीय भागीदारीत राबविण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पाचा आर्थिक भार भारतीय रेल्वेवर टाकला जात असल्याचा दावा देखील चुकीचा आहे. हा प्रकल्प नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या स्वतंत्र संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या संस्थेची स्वतंत्र आर्थिक रचना असून त्यामध्ये केंद्र सरकार तसेच संबंधित राज्य सरकारांचा सहभाग आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
हेही वाचा : Mangalprabhat Lodha : अद्ययावत प्रशिक्षणातून युवकांसाठी रोजगार निर्मिती 
 
जगभरात राष्ट्रीय वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन केवळ आर्थिक परताव्यावर नव्हे तर त्यांच्या व्यापक आर्थिक परिणामांवर केले जाते. हायस्पीड रेल्वे मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होतो, उत्पादकता वाढते, हवाई आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होतो तसेच मार्गालगतच्या भागांमध्ये आर्थिक विकासाला चालना मिळते. याशिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देशांतर्गत उत्पादन क्षमताही वाढण्यास मदत होते. तिकीट दरांबाबत सध्या जे अंदाज व्यक्त केले जात आहेत त्यांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी तिकीट दर किफायतशीर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन कॉरिडॉर असून या प्रकल्पाचा उद्देश केवळ एका मार्गापुरता मर्यादित नाही. भविष्यात देशात उभारल्या जाणाऱ्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक तांत्रिक, अभियांत्रिकी आणि औद्योगिक पाया तयार करणे हा त्यामागील महत्त्वाचा हेतू आहे. जगातील अनेक देशांनी हायस्पीड रेल्वे नेटवर्कची सुरुवात अशाच प्रारंभिक गुंतवणुकीपासून केली होती. हा प्रकल्प देशाच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत ‘विकसित भारत’च्या ध्येयाकडे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.(Mumbai-Ahmedabad Bullet Train Project)
 
Powered By Sangraha 9.0