Mangalprabhat Lodha : अद्ययावत प्रशिक्षणातून युवकांसाठी रोजगार निर्मिती

05 Mar 2026 16:02:37
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : (Mangalprabhat Lodha) सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात येत आहेत. आघाडीची कंपनी असलेल्या टोयोटा आणि आयटीआयच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण प्रकल्प राबवला जात असून ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी सांगितले.
 
छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टोयोटा इंडियातर्फे उभारण्यात आलेल्या एक्सलन्स सेंटरचे मंत्री लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. दृकश्राव्य पद्धतीने एकाचवेळी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील आयटीआयमधील १७ संस्थांमध्ये १७ अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, पंकज पाठक, टोयाटोचे रमेश राव, रवी सोनटक्के, रूपा बोहरा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
 
हेही वाचा : मुंबई भाजपच्या पदाधिकारी व कार्यकारणीची घोषणा, किरण शेलार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती
 
टोयाटो कंपनीने सीएसआर निधीतून छत्रपती संभाजीनगर विभागातील १४ तर नागपूर येथील ३ आयटीआय संस्थानामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या आहेत. १७ प्रयोगशाळांसाठी ५ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) म्हणाले की, "राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे पाऊल असून हा सीएसआर निधीचा आगळावेगळा कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात कौशल्य विकासाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले असून त्यानुसार देशभरात आधुनिकीकरण केले जात आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणात नाविन्य आणले जात आहे. यातून सर्व आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कार्यक्षमता जनतेसमोर आणणार आहे."
 
१५ हजार विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करणार
 
"छत्रपती संभाजीनगर हा केवळ पहिला टप्पा असून शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून दुसऱ्या टप्प्यात अमरावती, नागपूर आणि नाशिक येथे १८ तर पुढच्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात १४ अशा ३२ आयटीआयमध्ये जागतिक रोजगाराच्या संधीचे उद्दिष्ठ ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार विद्यार्थ्यांना आवश्यक कामाचे प्रशिक्षण देवून रोजगारक्षम करण्यात येणार आहे. यापुढच्या काळात महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातील तरुणांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षणाचे बळ मिळून जागतिक स्तरावर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची विजयी पताका फडकणार आहे," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Mangalprabhat Lodha)
 
Powered By Sangraha 9.0