चांदोलीचा ‌‘नॅचरलिस्ट‌’

05 Mar 2026 13:10:12

चांदोलीत पूर्णवेळ निसर्ग पर्यटनाचे काम करून, पर्यटकांसमोर इथल्या जंगलाचे वेगळेपण उलगडणाऱ्या प्रणव पांडुरंग महाजन याच्याविषयी...

या मुलाच्या घरात नागदेवतेचे अधिष्ठान. त्यामुळे साहजिकच त्याला वन्यजीवांची ओढ असावी, असा एक समज. मात्र, त्या विपरीत वयाच्या एका टप्प्यावर वन्यजीवांसोबत मैत्री झालेल्या या मुलाने निसर्गासोबत खूणगाठ बांधली. वन्यजीव बचाव, संशोधन, जैवविविधता सर्वेक्षण अशा अनेक वाटा धुंडाळून त्याने आता निसर्ग पर्यटन आणि वन्यजीव जागृती या वाटेवर प्रवास सुरू केला आहे. चांदोलीत निसर्ग पर्यटनाचे काम करून इथल्या रानवाटांचा वाटाड्या असलेल्या प्रणव महाजन याच्याविषयी...

प्रणवचा जन्म दि. 23 जून 1995 रोजी सांगलीतील बत्तीस शिराळा या गावात झाला. त्याचे वडील पांडुरंग महाजन हे हायस्कूलमध्ये नोकरी करीत असत, तर आई शिराळा तालुका वाचनालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत होती. महाजन हे तसे सर्वसामान्य कुटुंब, मूळचे शेतकरी. मात्र, या परिवाराला धार्मिक अधिष्ठान लाभलेले. बत्तीस शिराळा गावात साजऱ्या होणाऱ्या प्रसिद्ध नागपंचमी उत्सवाचे मूळ केंद्र हे महाजन कुटुंबीय. महाजन यांच्याकडे नागदेवतेचे मूळ देवस्थान असून, आजही या उत्सवाचा मान महाजन कुटुंबीयांकडे आहे. ही पार्श्वभूमी असली, तरी आपल्यामध्ये वन्यजीवांची आवड ही काही या उत्सवाच्या परंपरेमुळे रुजली नसल्याचे प्रणव सांगतो. त्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन वयापर्यंतचे शिक्षण हे बत्तीस शिराळ्यामध्येच पार पडले. लहानपणापासूनच त्याच्या मनात वन्यजीवांविषयी ओढ होती. साधारण आठवी-नववी इयत्तेपासून त्याने प्राण्यांचा बचाव करण्यास सुरुवात केली होती. वन्यजीवांविषयी विविध पुस्तके, डॉक्युमेंटरी, प्रवासवर्णने वाचनात आली. यातूनच त्याच्या मनात वन्यजीवांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झाले.

पुढे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तो नागपंचमीनिमित्त साप पकडण्यास जाऊ लागला. साप पकडण्याचे कौशल्य त्याने अंगीकारले. याचा फायदा त्याला पुढे झाला. कृषी विषयातील पदवीच्या शिक्षणासाठी प्रणवने फोंडाघाटच्या राजाराम मराठे कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. फोंडाघाटाच्या आसपास मानवी वस्तीनजीक आढळणारे साप तो ‌‘रेस्क्यू‌’ करू लागला. प्राणीगणनेमध्ये सहभागी होऊ लागला. या काळात सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे ‌‘पक्षीमित्र‌’ संमेलन पार पडले. त्यात प्रणव सहभागी झाला. कणकवलीत पार पडलेल्या ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ मधुकर बाचूळकर यांच्या व्याख्यानामुळे सह्याद्रीच्या वनस्पतींची ओळख झाली. त्यामुळे भविष्यात आपल्याला काय करायचे आहे, याची दिशा मिळाली.

फोंड्यातील शिक्षणादरम्यानच समाजमाध्यमांमुळे प्रणवची ओळख आकाश पाटील याच्यासोबत झाली. मूळचे (वाकुर्डे) बत्तीस शिराळ्याचे असणारे पाटील हे प्रणवला समाजमाध्यमावरच भेटले, हे नवलच. पाटील यांनी प्रणवला पक्षीनिरीक्षण, जंगलातील बारकावे यांविषयी सांगितले. प्रणवनेदेखील ते टिपले. पदवी शिक्षणानंतर पर्यावरणविषयक पदव्युत्तर शिक्षणाकडे प्रणवचा कल होता. त्यामुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये ‌‘एन्व्हार्यमेंटल सायन्स‌’ या अभ्यासक्रमासाठी त्याने प्रवेश मिळवला. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात त्याने पन्हाळ्यामधील सरीसृप विविधतेचे सर्वेक्षण केले. त्या माध्यमातून सरीसृपांच्या 56 प्रजातींची नोंद केली. या शिक्षणादरम्यानच प्रणव, आकाश पाटील आणि बत्तीस शिराळ्यातील इतर समविचारी लोकांनी मिळून ‌‘प्लॅनेट अर्थ फाऊंडेशन‌’ नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बत्तीस शिराळ्यात प्रामुख्याने ‌‘रेस्क्यू‌’चे काम सुरू केले. या जोडीने वन्यजीव जनजागृती, सर्पदंश जनजागृती, वृक्षलागवड, वृक्षतोडबंदी अशी निरनिराळी कामेदेखील केली. सांगली महानगरपालिका, आष्टा नगर परिषद, शिराळा नगरपंचायत यांच्यासोबत ‌‘स्वच्छ भारत अभियान‌’ आणि ‌‘माझी वसुंधरा‌’ या उपक्रमांसाठी राष्ट्रीय मानांकन मिळवून दिले.

वन्यजीव क्षेत्रातच काम करायचे असल्याने प्रणवने 2018-19 या काळात कोकणात ‌‘एईआरएफ‌’ या संस्थेसोबत काम केले. या माध्यमातून त्याने संगमेश्वर तालुक्यातील देवराई आणि खासगी जंगल व्यवस्थापनाचे काम पाहिले. वर्षभर काम करून प्रणव पुन्हा शिराळ्यात परतला.

नगरपंचायतीमध्ये नोकरी करू लागला. 2020 साली चांदोलीमध्ये ‌‘बार्बेट हाऊस होम स्टे‌’ची सुरुवात करून त्याने निसर्ग पर्यटनाला सुरुवात केली, चांदोलीचे प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली, रस्त्यासाठी होणारी वृक्षतोड थांबवली. देहरादूनला जाऊन ‌‘निसर्ग प्रशिक्षकाचे‌’ प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षांपूव नोकरी सोडून प्रणव पूर्णवेळ चांदोलीत निसर्ग पर्यटनाचे काम करू लागला आणि चांदोली ‌‘बर्डविंग इकोटुरिझम‌’ नावाने पर्यटन संस्था सुरू केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र स्थानांतरणानंतर पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे नोकरी सोडल्याचे शल्य नसल्याचे प्रणव सांगतो. मात्र, प्रशासनाने स्थानिकांच्या दृष्टीने व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाचे प्रकल्प असो वा त्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार असो, यावर काम करण्याची गरज तो अधोरेखित करतो. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून जनजागृतीचे बीज रोवणाऱ्या प्रणवला पुढील वाटचालीसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0