पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई; गृह राज्यमंत्री योगेश कदम

04 Mar 2026 17:19:16
Yogesh Kadam
 
मुंबई : (Yogesh Kadam) पुणे शहरात विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक औषधे नशा करण्यासाठी तसेच बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या उद्देशाने औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
 
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, "या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या पाचही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेली औषधे ही प्रमाणित असूनती कोणत्याही स्थानिक मेडिकल स्टोअरमधून विकत घेतलेली नाहीत."
 
हेही वाचा : ऐतिहासिक निर्णय ! जुने-नवे सर्व कर रद्द; थकबाकीही माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा
 
"तपासादरम्यान संबंधित औषधांचा पुरवठा बाहेरच्या राज्यातून झाल्याची माहिती पुढे आली असून पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. दरम्यान, पुणे शहरात बनावट नशेची औषधे तयार करणारी कोणतीही कंपनी आढळून आलेली नाही. पुणे शहरासह राज्यभरात अशा प्रकारच्या औषध विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित कारवाई केली जात असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0