विपश्यनेबद्दल फार माहिती नव्हती; पण ऐकून होतो. कधीतरी जावे असे मनातही यायचेे. मुंबई-नाशिक प्रवासात एकदा ‘धम्मगिरी’ला सहकुटुंब भेटही दिली होती; पण शिबिराचा योग यंदाच आला. या दहा दिवसांच्या तपस्येचे मोल शब्दातीत आहे. स्वत:शी आणि जगाशीही नव्याने ओळख होते. विपश्यनेचा अर्थ, महत्त्व आणि त्यातून एक साधक म्हणून समाजशीलतेचे आणि मला प्राप्त झालेला अनुभव या लेखात मांडला आहे...
‘धम्मगिरी’ला अॅडमिशन मिळणे इतके सोपे नसते. बरोबर दोन महिने आधी नोंदणी चालू होते. अॅडमिशन नक्की झाल्याचा ‘ईमेल’ आला. इगतपुरीला उतरलो. रेल्वे स्टेशनपासून ‘धम्मगिरी’ फार लांब नव्हते. ‘धम्मगिरी’ला पोहोचलो. मला माझे कार्ड ‘एनएम-४५६’ व सोबत धोबी टोकन क्र. १६ (कपडे धुण्यासाठी सशुल्क सेवा उपलब्ध असते) बेडशीट, कांबळे, उशीचा अभ्रा आणि पाय-पुसणे मिळाले. ट्रॉली बॅग असल्यामुळे बरे झाले, हा सगळा लवाजमा घेऊन मी ‘ग-३८’ या माझ्या निवासस्थानी पोहोचलो. ६ वाजता भोजनालयात शिबिराच्या सर्व सूचना दिल्या (पूर्ण शिबीरभर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून सूचना दिल्या जातात). विपश्यना या साधनेची माहिती आणि या साधनेसाठी पूर्ण समर्पण भाव (पुढील दहा दिवसांसाठीच) पाळण्याची तयारी नसल्यास तुम्हाला शिबीर सोडण्यासाठी एक संधी दिली जाते. त्यानंतर तुम्हाला नोंदणीच्या वेळी दिलेल्या ग्रुपप्रमाणे त्या-त्या धम्म हॉलला नेले जाते. प्रत्येकासाठी एक आसन होते. आता पुढील दहा दिवस हॉलमध्ये बसण्यासाठी आसन पक्के झाले. आमचे दहा दिवसांचे मौनही सुरू झाले.
शून्य दिवसाचे (वर्गातील पहिल्या दिवसाला ‘शून्य दिवस’ संबोधले जाते) प्रवचन (प्रमुख विपश्यनाचार्य श्री. सत्यनारायण गोयंका यांची रेकॉर्डेड प्रवचने दृकश्राव्य माध्यमातून असतात) ठीक ७ वाजता सुरू झाले. गुरुजी (म्हणजे गोयंकाजी) याला ‘धर्मचर्चा’ असे संबोधतात. पहिल्याच दिवशी धर्मचर्चा? अऽहं, आपल्या डोक्यात धर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई असे संप्रदाय येतात, तसे नाही; तर शुद्ध धर्म. सर्व समाज सदा सर्वकाळ, प्रत्यक्ष धारण करू शकतो, जो सर्व सृष्टीचा नियम आहे (द लॉ ऑफ युनिव्हर्स) असा सनातन धर्म. याचा कुठल्याही पूजा पद्धती, रूढी, परंपरा, कर्मकांड, दार्शनिक मान्यता याचा काहीही संबंध नाही. उदाहरणादाखल अग्नीचा धर्म कालातीत दहन होणे आणि दहन करणे आहे. बर्फाचा धर्म थंड असणे आहे तसे. अशा शुद्ध धर्मात ‘शील’ ही पहिली पायरी आहे आणि आपण दहा दिवस ‘पंचशीला’चे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. दीड तास त्यांनी हा विषय समजावला. मला जणू काही संघाच्या शिबिरात बौद्धिक ऐकत आहे, असाच भास होत होता. प्रवचन झाल्यावर ९ वाजता विश्रांतीसाठी आपापल्या खोलीवर जाण्याच्या सूचना मिळाल्या. दुसर्या दिवशी ४.३० वाजता आम्ही धम्म हॉलमध्ये आपापल्या आसनावर स्थित झालो. गोयंका गुरुजींच्याच आवाजातील रेकॉर्डेड प्रार्थना आणि मग सूचनेप्रमाणे ‘आनापान’ सुरू झाले. ‘आनापान’ म्हणजे स्वतःचा श्वास बघणे, त्याचे नियमन किंवा कुठलाही श्वसनप्रकार नाही; तर केवळ श्वास अनुभवणे. पुढे थोडी विश्रांती घेऊन ८ वाजता पुन्हा धम्म हॉल गाठला. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला गुरुजींचे खर्जातले आणि ‘विथ पॉज’ स्वर कानावर पडायचे ‘फिर से शुरू करो, स्टार्ट अगेन’ मी पण एक सुस्कारा घ्यायचो, जरा मांडी ठोकायचो आणि श्वसन बघायला सुरुवात करायचो. तासाभराने ब्रेक, मग पुन्हा दीड तास तेच. ११ वाजले की, दुपारचे (की सकाळचे म्हणायचे) भोजन. नंतर १ पर्यंत विश्रांती. १ ते २ - २.३० ते ३.३० आणि मग ३.३० ते ५ अशी साधनेची तीन सत्रे. या सत्रांमध्ये पाच मिनिटे ब्रेक मिळायचा; पण आर्य मौन पाळायचे
(आर्य मौन म्हणजे बोलणे तर नाहीच; पण पुटपुटणे नाही की, कुणाला खुणा करून पण काही संकेत द्यायचे नाहीत), खरेतर कंटाळून गेलो; पण शिबीर सोडून जावे, हा पर्याय काही योग्य वाटत नव्हता. ५ वाजता भडंग आणि दूध घेतले. नंतर थोडी विश्रांती. मग ६ वाजता पुन्हा सत्र चालू, ‘स्टार्ट अगेन’. ७ वाजता गुरुजींचे प्रवचन. गुरुजी म्हणाले, "बरेचसे साधक दुसर्या दिवशी शिबीर सोडून जातात, त्यामुळे हीच कठीण घडी आहे.” यात त्यांनी उदाहरण दिले. सांगितले की, जर आपले पाऊल योग्य दिशेला असेल, तर एक एक पाऊल टाकत पुढे जाणे हाच मार्ग आहे. शिवाय, धर्माचा मार्ग हा अष्टांग आहे (हे मी ब्रह्मविद्येच्या पाठात ऐकले होते) आणि त्याचे शील, समाधी व प्रज्ञा असे तीन भाग आहेत. हा मार्ग आपल्याला ‘आर्य’ बनवेल. दुर्दैवाने गेल्या पंचवीसशे वर्षांत शब्द आणि शब्दांचे अर्थ एवढे बदलले की, आर्य म्हणजे आपल्याला एक संप्रदाय वाटतो आणि मग आर्य/द्रविड अशा विचारात आपण पडतो; पण पूर्वीच्या भारतात संत, निर्मळ माणसाला आर्य म्हणत असत; त्याचा रंग, रूप, संप्रदाय याच्याशी काहीही संबंध नव्हता. शील आणि समाधी त्यांनी विस्तृत करून सांगितले आणि तुम्हाला अजून नऊ दिवस खूप पुरुषार्थ करायचा आहे, तपायचे आहे. या तपोभूमीत तुम्ही फक्त तप आणि तपच म्हणजे आखून दिलेली साधना करायची आहे, त्यात जोड/तोड काही करायची नाही. खरेच ते प्रवचन म्हणजे दुसर्या दिवसाच्या साधनेसाठी उत्तम मात्रा होती. सत्र संपल्यावर उद्याच्या अभ्यासाची तयारी आणि मग ९ वाजता विश्रांतीसाठी पुन्हा रूमवर. थोडक्यात, दिवसाची विभागणी होती की, एकूण दहा तास साधना, दहा तास विश्रांती, दोन तास खानपान व दोन तास अन्य गोष्टींसाठी. पण मौन २४ तास!
पुढचे दोन दिवस याच चक्रात गेले. तिसर्या दिवशी सकाळी आम्हाला ‘शून्यागार सेल’ अलोकेट झाले. माझा शून्यागार सेल क्रमांक ‘१५९’ आणि धम्म हॉलच्या बाजूच्याच पॅगोडात होता. ही सेल म्हणजे पॅगोडातील ३ बाय ६ फुटांची एक खोली. खोलीच्या दरवाजाला खालच्या बाजूला जाळी सोडली, तर खोलीत हवा किंवा प्रकाश येण्यासाठी काहीच नाही (आवश्यकता वाटली, तर एक झीरो वॅट दिवा असतो, जो एरव्ही बंद असतो) एकप्रकारे स्वतःला ‘आयसोलेट’ करून पूर्ण शांततेत साधना करायची. काही महिन्यांपूर्वी पाहिलेल्या कान्हेरी गुंफांची आठवण झाली. थोडक्यात, ही आधुनिक गुंफाच. आत आसन ठेवलेले होतेच. पहिल्यांदा खोलीत गेलो, तेव्हा मला कसेतरीच झाले. तेव्हा स्वा. सावरकरांच्या अंदमानातील सेलची आठवण झाली आणि त्यांनी भोगलेल्या यातनांची महतीही पटली. असो, इथे रोज ‘शुद्ध धर्म’ याच विषयाला धरून चर्चा आणि उदाहरणे असायची. त्यांचे म्हणणे एकच होते, ”मी सांगतो म्हणून काहीही करू नका. रोज साधना करताना जो अनुभव येईल, तो तुमचा. त्याबद्दल आनंद किंवा दुःख काहीच व्यक्त करू नका, फक्त शरीराकडे पाहा आणि अनुभवा, खूप मेहनत करा. तुम्हाला कोणीतरी महापुरुष भेटेल आणि तो तुमचे कल्याण करेल अशा कल्पनेत राहू नका, सगळे कष्ट तुम्हालाच करायचे आहेत. महापुरुष भेटलाच, तर तो फक्त मार्ग सांगेल.” थोडक्यात या चचार्ंमधून दहा दिवस या तपोभूमीत राहून मोक्षप्राप्तीसाठी ‘पारमिता‘ कशा जमावत होतो, याची आठवण करून दिली जात होती.
असो, या शिबिरातून प्रखरतेने मनात रूजले की आपल्या जीवनात शिस्त, अनुशासन हवेच. जर कुणाला दंड द्यायची वेळ आली, तर तो कठोरपणा द्यायला पाहिजे; पण मनात त्या व्यक्तीबद्दल कटुता नको. उलट, त्या व्यक्तीच्या बाबतीत करुणा जागृत व्हायला हवी. जसे- आई आपल्या मुलाला दंड देतानाही वात्सल्य कायम असते तसे. धर्म भित्रेपणा शिकवत नाही. धर्म हे एक सामर्थ्य आहे, शक्ती आहे. अन्यायाचा प्रतिकार करताना व्याकुळता नको. ही सगळी सकारात्मकता घेऊन पुन्हा दैनंदिन जिवनात आलो आहे.‘टू स्टार्ट अगेन’. भवतु सब्ब मंगलम्!
१. नैष्कर्म्य - दुसर्यांनी केलेल्या दानावर आपल्याला अन्न आणि निवारा मिळाला (स्वतःचे पैसे भरून शिबीर केले असते, तर विलासाची, चैनीची आसक्ती केली असती)
२. शील - मौन आणि सूचना पालन केल्यामुळे ‘शील’ आपोआपच जपले
३. वीर्य - खडतर तप करण्याचा प्रयत्न केला
४. प्रज्ञा - केवळ बुद्धिविलासाने नाही, तर स्वानुभवाने संवेदना अभ्यासण्याचा आणि त्यात सम्यक स्थिती ठेवण्याचा प्रयत्न केला
५. क्षांति - शिबिरात कुणामुळे काही गैरसोय झाली, तरी तक्रार केली नाही.
६. सत्य - शील पालन करून कुणी खोटे बोलले नाही.
७. अधिष्ठान - निदान एक तास तरी न हलता ध्यानाला बसण्याचा दृढसंकल्प करून पाळायचा आटोकाट प्रयत्न केला.
८. मैत्री - शुद्ध मैत्रीचे ध्यान केले.
९. उपेक्षा - ध्यानात संवेदना येवो, न येवो; सुखाची वा दुःखाची येवो, तटस्थ राहायचा प्रयत्न केला.
१०. दान - गृहस्थी माणसाने कायमच आपल्या कमाईतून एक हिस्सा दान केला पाहिजे, तसे आपणही धनाचे दान दिले पाहिजे
(आपल्या राहण्याचा खर्च नाही, तर पुढील साधकांच्या सोयीसाठी). कुणी धनाऐवजी सेवक म्हणून काम करेल, कुणी विपश्यना करून अधिक साधक वाढवेल. थोडक्यात, आपले तन, मन आणि धन सगळे समर्पण आवश्यक करावे (संघात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हेच करत आलो). सत्राचा शेवट सर्व प्राणिमात्रांना दुःख मुक्ती मिळो, सर्वांचे मंगल होवो, या कामनेने झाला. शिबिरात मला जी काही विपश्यना समजली, त्यात शारीरिक तपाच्या जोडीला १२ प्रवचनांचा तितकाच मोलाचा वाटा आहे.
- अजित वर्तक