योगायोग की रणनीती?

04 Mar 2026 12:54:43
Iran–Israel War
 
पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही उफाळून आला. या दोन संघर्षांचा एकमेकांशी थेट संबंध नसला, तरी या घडामोडींना व्यापक भू-राजकीय संदर्भात पाहणे आवश्यक आहे. विशेषतः इराणचा मित्रदेश मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानला व्यस्त ठेवण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. इराण आणि इस्रायल यांच्यातील वैर हे केवळ सीमावाद किंवा तात्कालिक कारणांपुरते मर्यादित नाही. पश्चिम आशियातील प्रभाव वाढवण्याच्या स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात. इराण विविध प्रादेशिक गटांना पाठिंबा देतो, तर इस्रायल इराणच्या लष्करी आणि अणुक्षमतेला धोका मानतो. त्यामुळे संघर्षाचे स्वरूप अनेकदा थेट युद्धापेक्षा अप्रत्यक्ष कारवायांमध्ये दिसते.
 
याच काळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला दिसतो. विशेषतः सीमाभागात चकमकी आणि हल्ले घडत असल्याने पाकिस्तानचे लक्ष पश्चिम सीमेकडे वळले आहे. परिणामी, पाकिस्तानला व्यापक इस्लामी किंवा प्रादेशिक राजकारणात सक्रिय भूमिका घेणे कठीण होते. जर पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमावादात गुंतलेला राहिला, तर तो इराणला थेट किंवा अप्रत्यक्ष मदत करण्याच्या स्थितीत राहणार नाही. जरी पाकिस्तानने इराणला लष्करी मदत करण्याची शक्यता फार मोठी नसली, तरी राजनैतिक पाठिंबा, सीमावत सहकार्य किंवा सामरिक समन्वय यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे पाकिस्तान अंतर्गत किंवा सीमावत प्रश्नांमध्ये अडकून राहणे, हे इराणसाठी काही प्रमाणात तोट्याचे ठरू शकते.
 
इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धामुळे पाकिस्तानमद्येही घबराट पसरली. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी इशारा दिला आहे की, इराणशी संबंधित युद्धाचा परिणाम पाकिस्तानपर्यंत पोहोचू शकतो. त्यांनी इराणमधील युद्धाला ‌‘जायोनिझम (यहुदीवाद) अजेंडा‌’ असे संबोधले असून, इस्रायलचा प्रभाव पाकिस्तानच्या सीमांपर्यंत वाढवणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचा आरोप केला.
 
आंतरराष्ट्रीय राजकारणात एखाद्या देशाला एकाच वेळी अनेक सीमांवर व्यस्त ठेवणे, हे नवीन नाही. याला साधारणपणे ‌‘मल्टी-फ्रंट प्रेशर‌’ किंवा ‌‘स्ट्रॅटेजिक डिस्ट्रॅक्शन‌’ असे म्हटले जाते. जर एखादा देश एका सीमेजवळ संघर्षात अडकला, तर दुसऱ्या सीमेकडे त्याचे लक्ष आणि संसाधने कमी होतात. पाकिस्तानच्या बाबतीत पूर्वेला भारत आणि पश्चिमेला अफगाणिस्तान-इराण हा संवेदनशील पट्टा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढलेला असताना त्याच काळात अफगाणिस्तानकडून पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका दिसून आली. आता इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही पाकिस्तानच्या पश्चिम सीमेकडील तणाव वाढलेला दिसतो. दुसरी शक्यता अशी की, पाकिस्तान एकाच वेळी अनेक समस्यांमध्ये अडकला, तर त्याची बाह्य राजकारणातील क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत तो इराणसारख्या देशाला उघड पाठिंबा देणे किंवा भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेणे, मर्यादित करू शकतो.
 
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान हा इराणचा औपचारिक लष्करी मित्रदेश नाही, तर व्यावहारिक संबंध ठेवणारा शेजारी देश आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाणीवपूर्वक गाफील ठेवण्यासाठी संघर्ष छेडला गेला, असे ठामपणे म्हणणे कठीण आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा समांतर घडामोडींचा फायदा विविध शक्ती घेतात, हेही तितकेच खरे. इराण-इस्रायल संघर्ष आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव या स्वतंत्र घटना असल्या, तरी त्यांचे परिणाम एकमेकांवर अप्रत्यक्षपणे होऊ शकतात. या सर्व घडामोडींकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट दिसते, भू-राजकारणात कोणतीही घटना पूर्णपणे वेगळी किंवा एकाकी नसते. आंतरराष्ट्रीय राजकारणात एखाद्या देशाला अनेक आघाड्यांवर गुंतवून ठेवणे, ही जुनी आणि परीक्षित रणनीती मानली जाते. एकूणच काय तर आज घडणाऱ्या या घटना योगायोग आहेत की, मोठ्या पटावरील नियोजित रणनीती हे भविष्यात अधिक स्पष्ट होईल; पण इतके मात्र निश्चित की, बहुआघाडी तणावाच्या सावटाखाली कोणतेही राष्ट्र दीर्घकाळ प्रभावी भूमिका बजावू शकत नाही!
 
 
 
Powered By Sangraha 9.0