भक्तिरसाचा ‘मोहक’ स्वर...

04 Mar 2026 13:46:09
Mohak Pradeep Raikar
 
देशाच्या भक्तिमार्गातील कीर्तनपरंपरेचा पाईक होत, ती परंपरा जपण्यासाठी मेहनत घेणार्‍या तरुण कीर्तनकार हभप मोहक प्रदीप रायकर यांच्याविषयी...
 
नामसंकीर्तन साधन पै सोपे|
जळतील पापे जन्मांतरीची|
 
तुकाराम महाराजांनी त्यांच्या या अभंगामध्ये कीर्तनाची महती सांगितली आहे. महाराजांनी भक्तीचा सोप्पा मार्ग म्हणून कीर्तनाकडे पाहिले. काळाच्या ओघात आज कीर्तनाकडे जाणार्‍यांची गर्दी कमी झाली असली, तरीही आजही दररोज कीर्तनसेवेच्या माध्यमातून भगवंतसेवा करण्याचे व्रत अनेक मंदिरांनी ‘अखंडतैलधाराव्रता’प्रमाणे सांभाळले आहे. तसेच कीर्तन शिकवणार्‍या अनेक संस्था कीर्तनाचे शिक्षण देऊन, आद्यकीर्तनकार असलेल्या नारदमुनींच्या गादीची परंपरा कायम कशी राहील, याची काळजी घेत असून, त्यातूनच तयार झालेले आणि नारदांच्या गादीचे पाईक असणारे तरुण कीर्तनकार म्हणजे मोहक प्रदीप रायकर.
 
मोहक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळच्या पाली गावामध्ये आजोळी झाला. त्यानंतर त्यांचे बालपण रत्नागिरीमधीलच नाटे या त्यांच्या गावामध्ये गेले. लहानपणी आजी-आजोबांकडून ऐकायला मिळणार्‍या गोष्टी, तसेच गावामधील श्रीनाटेश्वराच्या उत्सवादरम्यान होणारी अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कीर्तन-श्रवणाचे भाग्य मोहक यांना लहानपणापासून लाभले. अशी कीर्तने तल्लीनतेने मोहक ऐकत. त्यातूनच, असे आपण काही करावे, असे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. यातूनच हभप विलासबुवा शाहाणे यांच्या मार्गदर्शनामध्ये, मोहक यांनी एक-दोन हौशी कीर्तने गावामध्येच केली होती. त्यामुळे यातील आनंदाची अनुभूती मोहक यांना आली. यातूनच, त्यांनी या क्षेत्रात अधिक तयारी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीमध्ये संगीताची शिकवणी सुरू केली. मात्र, दोन्हींकडील अंतर जास्त असल्याने यामध्ये त्यांचे दोन तास जात असत. त्यामुळे मोहक यांच्या वडिलांनी डोंबिवली येथे येण्याचा निर्णय घेतला. मोहक यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण नाट्यामध्ये झाल्यानंतर, कला आणि शालेय शिक्षणासाठी मोहक यांनी डोंबिवली येथे २०११ मध्ये नव्याने सुरुवात केली.
 
डोंबिवलीमध्ये आल्यानंतर त्यांनी ‘डोंबिवली कीर्तनकुला’मध्ये प्रवेश घेतला. हभप सुहासबुवा सरपोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहक यांच्यातील कीर्तनकला आता खुलू लागली होती. कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण मोहक यांनी सरपोतदारबुवांकडे चार ते पाच वर्षे घेतले. त्याच दरम्यानच्या काळामध्ये मोहक यांनी ‘फायनान्स’ या क्षेत्रामध्ये ‘बीएमएस’ ही पदवीदेखील संपादन केली. नंतर तीन ते चार वर्षे त्यांनी नोकरीदेखील करून पाहिली. पण, यामध्ये हवा तो आनंद त्यांना गवसत नसल्याचेही त्यांना लक्षात आले. त्यांना खरा आनंद हा कीर्तनसेवा करण्यातच मिळत असे. अखेरीस मोहक यांनी कीर्तनसेवेला पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला. पालकांनीही भक्कम पाठिंबा दर्शवला.
 
कीर्तनकारासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाचा अभ्यास. यासाठीही मोहक यांना अधिक मेहनत घ्यावी लागली. पण, यामध्ये अमूल्य मार्गदर्शन केले, ते नागपूरच्या हभप मोहनबुवा कुबेर यांनी. त्यांची अनेक कीर्तने मोहक यांनी विविध माध्यमांवर ऐकली होती. त्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याबाबत दूरध्वनीवरूनच मोहक यांनी दोन-चार वेळा कुबेरबुवांशी संवादही साधला होता. पुढे कुबेरबुवांनी नागपूर येथे आयोजित एका ‘कीर्तन महोत्सवा’मध्ये कीर्तन करण्याचे आमंत्रण मोहक यांना दिले. प्रत्यक्षात ती घेतलेली एक परीक्षाच होती. महोत्सवातील मोहक यांनी केलेले कीर्तन सादरीकरण ऐकून, पुढे कुबेरबुवांनी मोहक यांना या क्षेत्रातील उच्चशिक्षण देण्याचे मान्य केले. माझ्या कीर्तनाचे ‘तंत्र’ सरपोतदारबुवांचे असून, त्यातील ‘मंत्र’ हा कुबेरबुवांचा असल्याचे मोहक नम्रपणे सांगतात.
 
या शिक्षणादरम्यान, कीर्तन कसे करावे, ते कीर्तनकाराचे आचरण कसे असावे, असे सर्वप्रकारचे ज्ञान मोहक यांना दिले. दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक कीर्तनाचा श्रोत्यांना पूर्ण आनंद कसा देता येईल, याचेही मार्गदर्शन केले. सध्या मोहक यांची एक हजार, ३९१ कीर्तने झाली असून, आज मोहक पूर्णवेळ कीर्तनकार म्हणून सेवा करत आहेत. गेले एक तप मोहक कीर्तने करत असून, त्यांना ‘श्री. ब्राह्मण सेवा संघ, गिरगाव, मुंबई’ यांच्याकडून कीर्तन क्षेत्रातला ‘विद्यानंद’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच कीर्तनसेवा असो किंवा ‘ब्रह्मचिंतन’ विषयावरचे निरूपण यासाठी मोहक यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमधून, तसेच विविध राज्यांमधून अनेकदा बोलावण्यात येते. मोहक यांनी पुढील संपूर्ण आयुष्य कीर्तनसेवेला वाहून घेतले असून, या सेवेच्या माध्यमातून नारदांच्या या गादीचा मान राखण्याचेच ध्येय असल्याचे ते सांगतात. देशाच्या भक्तिमार्गातील कीर्तनपरंपरेचा पाईक होत, ती परंपरा जपण्यासाठी मेहनत घेणार्‍या तरुण कीर्तनकार हभप मोहक रायकर यांना पुढील यशासाठी दै.‘मुंबई तरुण भारत‘कडून हार्दिक शुभेच्छा!
 
- कौस्तुभ वीरकर
 
Powered By Sangraha 9.0