मुंबई : (Nalanda Stampede) बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. मगडा येथील प्रसिद्ध शीतला देवी मंदिराच्या परिसरात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.(Nalanda Stampede)
नालंदा जिल्ह्यातील मगडा येथे शीतला देवी मंदिरात दर मंगळवारी पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. उत्तर भारतातील पंचांगाप्रमाणे आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यादरम्यान अचानक मंदिरात चेंगराचेंगरी सुरू झाली. गोंधळ उडाल्याने लोक सैरावैरा धावू लागले. अचानक सुरू झालेल्या या गोंधळात अनेक महिला खाली पडल्या आणि गर्दीखाली चिरडल्या गेल्या. यात आठ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही उपस्थित नसल्याचे भाविकांकडून सांगण्यात येत आहे.(Nalanda Stampede)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि नालंदा जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. स्थानिक लोकांचाही आरोप आहे की प्रत्येक मंगळवारी येथे प्रचंड गर्दी असते, तरीही प्रशासनाकडून पुरेसे व्यवस्थापन केले जात नाही. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.(Nalanda Stampede)