मुंबई : (Vijay Shivtare) बाप-लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर आणि निस्वार्थ नातं मानलं जातं. अशाच एका हृदयस्पर्शी घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना त्यांच्या मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनी किडनी दान देत नवजीवन दिलं आहे. (Vijay Shivtare)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिवतारे गेल्या काही काळापासून किडनी फेल्युअरमुळे त्रस्त होते आणि त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. प्रकृती खालावत असताना त्यांच्या मदतीला त्यांची लेक डॉ. ममता शिवतारे पुढे आली. एक डॉक्टर आणि कर्तव्यदक्ष मुलगी म्हणून त्यांनी वडिलांना किडनी दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. (Vijay Shivtare)
मुंबईत किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून, दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. डॉ. ममता शिवतारे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. एका लेकीने वडिलांसाठी दाखवलेलं हे अपार प्रेम आणि त्याग केवळ कुटुंबापुरतं मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. (Vijay Shivtare)
कोण आहेत विजय शिवतारे?
विजय शिवतारे हे पुरंदर मतदारसंघाचे शिवसेना आमदार असून ‘बापू’ म्हणूनही ओळखले जातात. २००९ आणि २०१४ मध्ये ते निवडून आले होते. २०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांनी यापूर्वी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. (Vijay Shivtare)