मुंबई : (US-Iran War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील तेलसाठ्यांचा ताबा मिळवला. त्यानंतर आता त्यांनी इराणच्या तेलाशी संबंधित सुविधांवर नियंत्रण मिळवायचे असल्याचा हेतू ट्रम्प यांनी बोलून दाखवला आहे. इराणची लाईफलाईन असलेले खार्ग बेट हे तेल निर्यातीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे बेट आपण सहज ताब्यात घेऊ, असे ट्रम्प म्हणाले आहेत.(US-Iran War)
इराणची 'लाइफलाइन'च का हवीय?
'फायनान्शिअल टाइम्स'शी बोलताना ट्रम्प यांनी इराण युद्धाची पुढची संभाव्य रणनीती काय असू शकेल, यावर भाष्य केले. ते म्हणाले, "खरं सांगायचे तर इराणच्या तेलावर नियंत्रण मिळवणे, हे माझे सर्वात आवडते काम आहे. या बेटावर इराणची सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे. आम्ही अगदी सहजरित्या ते ताब्यात घेऊ शकतो."(US-Iran War)
इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायल आक्रमक पवित्रा घेत असून अमेरिका मध्यपूर्वेत हजारो सैनिक तैनात करण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प याबाबत म्हणाले, "खार्ग बेटावरील इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र अमेरिका ताब्यात घेऊ शकते. पण अमेरिकेतील काही मूर्ख लोक याला विरोध करत असून यावर ते प्रश्न उपस्थित करत आहेत. पेंटागॉन अनेक लष्करी पर्यायांचा विचार करत आहे. आम्ही कदाचित खार्ग बेट ताब्यात घेऊही किंवा कदाचित घेणारही नाही. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. तसेच आम्ही त्याठिकाणी अधिक काळ राहू."(US-Iran War)
खार्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र मानले जाते. या बेटावर ताबा मिळवण्याचे संकेत देऊन ट्रम्प यांनी इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी आवळण्याची तयारी दर्शवली आहे. तिथून १००० पाउंड यूरेनियम बाहेर काढण्यासाठी मोठ्या लष्करी मोहिमेचा विचार करत असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.
(US-Iran War)