अंत्योदयाचा खरा अर्थ जगणारे करंदीकर दाम्पत्य...

30 Mar 2026 12:21:44
Promodrav & Ranjanatai Karandikar
 
प्रमोदराव व रंजनाताई करंदीकर हे ध्येयवादी दाम्पत्य गेली चार दशके वनवासी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी झटत आहे. त्यांच्या या निरलस कामाची दखल घेत, मुंबईमधील ‌‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी‌’तर्फे त्यांना आज सोमवार, दि. 30 मार्च रोजी ‌‘अंत्योदय पुरस्कार‌’ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मानचिन्ह, स्मृतिचिन्ह व रु. एक लाख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा हा विशेष लेख...
 
प्रमोदराव व रंजनाताई करंदीकर या ध्येयवादी दाम्पत्याने, गेली चार दशके वनवासी समाजाच्या उत्थानाशी, भवितव्याशी आपले नाते सांगत, एक आगळे-वेगळे जीवन जगण्याचा जाणीवपूर्वक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सुरुवातीला ‌‘वनवासी कल्याण आश्रम‌’ व नंतर ‌‘शबरी सेवा समिती‌’ च्या माध्यमातून, या दाम्पत्याने गेली 44 वर्षे समर्पण भावनेतून ‌‘वनवासी जनजाती समाजा‌’साठी काम केले. या निरलस व निःस्वार्थ जीवनप्रवासाची दखल घेत, मुंबईमधील ‌‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी‌’तर्फे त्यांना ‌‘अंत्योदय पुरस्कारा‌’ने सन्मानित करण्यात येत आहे. समाजातील तळागाळातील घटकांमध्ये तळमळीने काम करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना हा पुरस्कार, वर्ष 2000 पासून देण्यात येतो.
 
अनुकूल कौटुंबिक पार्श्वभूमी
 
प्रमोद करंदीकर हे मूळचे धुळ्याचे. त्यांचा जन्म दि. 17 फेब्रुवारी 1957 रोजीचा असून, त्यांचे शिक्षण ‌‘एम.कॉम.‌’पर्यंत झालेले आहे. त्यांचे सर्व शिक्षण धुळ्यातच झाले. त्यांचे काका 1946 मध्ये प्रचारक म्हणून निघाले होते. आणीबाणीच्या काळात त्यांच्या वडिलांना व मोठ्या भावाला अटक होऊन, ते एकोणीस महिने कारागृहात होते. तरुण वयातच संघाच्या मुशीत त्यांच्या ध्येय व धारणा पक्क्या झाल्या होत्या.
 
आणीबाणीच्या काळात महाविद्यालये बंद असल्याने, त्याने श्रीगुरुजींचे विचारधन आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन वाचून काढले. या काळात संघशाखा बंद झाल्या, तेव्हा तो तालमीत हिरिरीने सहभागी होऊ लागला. आजोबांचे कुस्तीप्रेम त्याच्यात उतरले. ‌‘एम.कॉम.‌’च्या दुसऱ्या वर्षाला असताना, धडगाव येथील वनवासी विद्यार्थी वसतिगृहावर दोन आठवडे राहण्याचा त्याला योगही आला होता. त्यादरम्यान वनवासी समाजाची विपन्नावस्था व विदारक स्थिती याचे त्याला दर्शन झाले. वनवासी समाजासाठी पुढील आयुष्यात काम करायचं, हा विचार त्याचा तिथेच प्रथम मनाशी पक्का झाला.
 
‌‘वनवासी कल्याण आश्रमा‌’च्या कामाची सुरुवात व विवाहयोग
 
‌‘वनवासी कल्याण आश्रमा‌’चे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. बाळासाहेब दीक्षित यांच्याशी परिचय झाल्यावर, त्यांच्या सूचनेनुसार प्रमोदने ‌‘एम.कॉम.‌’चे शिक्षण पूर्ण होताच, ‌‘कल्याण आश्रमा‌’च्या कामात प्रत्यक्ष सहभागी होण्यास 1978 मध्ये सुरुवात केली. सुरुवातीला पूर्वोत्तर भारतात वर्षभराच्या कामानंतर, त्यांच्यावर कर्जतजवळील वैजनाथ येथे वनवासी मुलांचे वसतिगृह चालू करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
 
1981च्या दरम्यान जबलपूरच्या सुशीलाबाई ताम्हणकर या वैजनाथ येथे वास्तव्यास आल्या. त्या आल्यामुळे तेथे मुलींचेही वसतिगृह चालू झाले. त्यांच्या मदतीला कर्जत येथून ‌‘बी.ए.‌’च्या शेवटच्या वर्षाला शिकणारी रंजना गांगल ही युवती कार्यकर्ती येऊ लागली. एके दिवशी सुशीलाताईंनी प्रमोदजवळ सहजपणे, पण सहेतुक लग्नाचा विषय काढला व रंजनाचे नावही सुचविले. प्रमोद मग ठरवून रंजनाशी ‌‘लग्न‌’ या विषयावर मोकळेपणाने व स्पष्टपणे बोलला. आयुष्यभर नोकरी वगैरे न करता, साधेपणाने राहून पूर्णवेळ सामाजिक काम करणार असल्याचा मनोदय व निग्रह त्याने रंजनाजवळ व्यक्त केला. “मलाही पूर्णवेळ काम करायचे आहे व साधेपणाने राहण्यात मला अडचण नाही,” असे रंजनाने सांगितल्यावर, असहमतीची जागाच उरली नाही. दोघे दि. 13 ऑगस्ट 1982 रोजी विवाहबद्ध झाले आणि पाचव्या दिवशी वैजनाथ केंद्रावर हजरही झाले.
 
कोठींब्यातील कामाला ग्राम विकासाची जोड
 
जून 1986 मध्ये वैजनाथ केंद्र बंद करून, कोठींबे येथेच मुलींचेही वसतिगृह हलविण्यात आले. वसतिगृह स्थिरावल्यावर कोठींबेमध्ये कृषिविकासाचे व फलोद्यानाचे प्रयोग चालू झाले. पावसाळ्यात भाजीपाला लागवड केली जाऊ लागली. 200 कोंबड्यांचे एक कुक्कुटपालन केंद्रही सुरू करण्यात आले. त्यातूनच परिसरातील पाड्यांवरही कुक्कुटपालन चालू झाले. परिसरातील खांदन गावात पाच तरुणांचा भाजीपाला लागवड गट तयार करण्यात आला.
 
कुस्ती स्पर्धांमधील सहभागामुळे, प्रमोदला शालेय व महाविद्यालयीन स्पर्धा सहभागाचा अनुभव होता. त्यामुळेच ‌‘कल्याण आश्रमा‌’तर्फे जेव्हा अखिल भारतीय स्तरावर क्रीडास्पर्धा भरवायचे ठरविले, तेव्हा महाराष्ट्राचा उत्तम संघ निवडण्याची जबाबदारी स्वाभाविकपणे प्रमोदकडेच आली.
 
डोंबिवलीकडे प्रस्थान व वाढत्या जबाबदाऱ्या
 
कल्याण आश्रमाच्या वाढत्या कामासाठी आता प्रांतभर फिरण्याची गरज होती. यादृष्टीने सोयीचे जावे म्हणून नव्याने बांधकाम होत असलेल्या डोंबिवलीतील वसतिगृहात राहायला जाण्यासाठी, जून 1989 पासून प्रमोदराव वैजनाथ-कोठींबे हा दहा वर्षांचा अध्याय संपवून डोंबिवलीत राहण्यास आले. पाठोपाठ प्रांत प्रकल्पप्रमुख म्हणून, प्रमोदरावांकडे नवीन जबाबदारी आली. यादरम्यान रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे ‌‘कल्याण आश्रमा‌’ची, एक अनुदानित आश्रमशाळा उभा करण्याबाबतही ते आग्रही होते. वर्ष 2000 मध्ये प्रमोदरावांकडे ग्राम विकास याविषयाची अखिल भारतीय जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे प्रमोदरावांचे कार्यक्षेत्र अधिकच विस्तारले.
 
रंजनाताई यांच्याकडेही सुरुवातीला महाराष्ट्र प्रांताची महिलाप्रमुख म्हणून जबाबदारी आली. लवकरच त्यांच्याकडे, पश्चिम उत्तर क्षेत्राची म्हणजे आठ प्रांतांची क्षेत्रीय महिला प्रमुख म्हणून जबाबदारी आली. त्यामुळे दोघांचेही कार्यक्षेत्र वाढले, प्रवास वाढला, अखिल भारतीय स्तरावरील बैठकांमधील सहभागही वाढला.
 
कुपोषणाच्या प्रश्नांकडे वेधले गेलेले लक्ष व ‌‘शबरी सेवा समिती‌’ची स्थापना
 
विविध प्रांतात वनवासी क्षेत्रात प्रवास करताना ठळकपणे लक्षात आलेली बाब म्हणजे, सर्वत्र बालकांचे कुपोषण व बालमृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. आदिवासींच्या अनेकविध आजारांच्या मुळाशी गेले की ध्यानात येते की, त्याचेही कारण महिला व बालकांमधील दीर्घकालचे कुपोषण हेच आहे. त्यामुळे त्यावर सातत्यपूर्ण व ठोस काम करणे गरजेचे आहे. तरच या जीवन-मरणाच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतल्यासारखे होईल. ‌‘कल्याण आश्रमा‌’सारख्या मोठ्या वटवृक्षाखाली व संघटन हा प्रमुख प्राधान्यक्रम असलेल्या रचनेत याला तातडीने न्याय मिळणे, जरा अवघडच दिसत होते. त्यासाठी स्वतंत्र रचना उभारणे सयुक्तिक ठरणारे आहे, असे प्रमोदरावांना मनोमन वाटू लागले. या अस्वस्थतेतून ‌‘शबरी सेवा समिती‌’ या स्वतंत्र रचनेचे बीज रोवले गेले. दि. 9 सप्टेंबर 2003 रोजी ‌‘शबरी सेवा समिती‌’ची रीतसर नोंदणी करण्यात आली. काम स्वतंत्र प्राधान्यक्रमाचे असले, तरी त्याची संघशरणता कायम होती. ती अंतराय होणे शक्यच नव्हते.
 
‌‘शबरी‌’च्या आरोग्यविषयक कामाचा श्रीगणेशा व अतिगरजू परिसरात विस्तार
 
कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथे महिला व मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून, ‌‘शबरी‌’च्या कामाचा श्रीगणेशा झाला. अपेक्षेप्रमाणे शिबिरात कुपोषित महिला व मुले मोठ्या संख्येने सापडले. नुसते आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन, उपचारात्मक कार्यक्रम करून कुपोषणाचा गंभीर प्रश्न सुटणारा नव्हता. त्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाची जोड देणे गरजेचे होते. सामूहिक डोहाळेजेवण हा असाच अभिनव उपक्रम होता. त्यात गर्भवती महिलांची स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी केली जात असे. यासाठी ‌‘शबरी‌’चे अध्यक्ष डॉ. नीलकंठ फडके आवर्जून उपस्थित असत.
 
पुढे ‌‘नाना पालकर स्मृती समिती‌’चे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. अजित फडके यांनी पुढाकार घेऊन, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा या परिसरात हे काम विस्तारण्यास मदत केली. शहादे येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अलकाताई कुलकर्णी यांनी, दहा वर्षे आपल्या रुग्णालयात ‌‘शबरी सेवा समिती‌’च्या माध्यमातून आलेल्या कुपोषित बालकांवर मोफत उपचार केले. सुमारे दशकभराच्या कालावधीत नंदुबारमधील सुमारे 12 हजार, 500 मुलांवर ‌‘शबरी सेवा समिती‌’ने, कुपोषणनिर्मूलनविषयक मोलाचे काम केले.
 
विविधांगी उपक्रमाची मोलाची जोड
 
यातील प्रमुख सामुदायिक कार्यक्रम म्हणजे, आदिवासींचे सामूहिक विवाह समारंभ. वनवासी क्षेत्रात विवाहाच्या निमित्ताने एका दिवसातून होणारी उधळपट्टी, त्यातून येणारे कर्जबाजारीपण, खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी दारू, मटणाचे जेवण व वरात या सर्वांना फाटा देण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे एकत्र सामुदायिक विवाह! अशा प्रतिकूल परिस्थितीतही 2007 पासून आजतागायत, सुमारे एक हजारांहून अधिक जोडप्यांचे विवाह ‌‘शबरी सेवा समिती‌’ने पुढाकार घेऊन लावून दिले आहेत.
 
प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत पाया भक्कम करण्याची गरज लक्षात घेऊन, ‌‘शबरी समिती‌’ने इयत्ता पहिली ते चौथी या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालू केल्या आहेत. अल्पशिक्षित स्थानिक महिला शिक्षिकाच हे काम आवडीने करतात. 75 हून अधिक ठिकाणी या अभ्यासिका चालतात. याला जोड देत, बारा ठिकाणी सुरू असलेल्या शिवणकाम प्रशिक्षण वर्गातून आत्तापर्यंत सुमारे 800 हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
 
जलसंवर्धन व कृषिविकासातील ‘शबरी‌’चे मोलाचे कार्य
 
वनवासींना स्वावलंबी व संपन्न बनविणाऱ्या जलसंवर्धन व कृषिविकासातील ‌‘शबरी‌’चे चिवटपणे चाललेले कार्य मोलाचे आहे. ‌‘शबरी‌’तर्फे जव्हार तालुक्यात 18 हजारांहून अधिक आंबा कलमांची, तर धुळे परिसरातील अक्कलकुआ येथे 50 हजार साग रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. आदिवासी पाड्यांवरील 61 सामुदायिक विहिरी ‌‘शबरी‌’ने, शेतीसाठी लोकसहभागातून खोदल्या आहेत. विहिरीचे खोदकाम करणे व बांधकामाचे साहित्य पुरविणे, याची जबाबदारी समितीकडे असते. बाकी बांधकामासाठीचे श्रमदान व गवंडी मजुरी याची जबाबदारी ग्रामस्थच घेतात. या विहिरी प्रामुख्याने धुळे-नंदुरबार परिसरात झाल्या आहेत. अशाच प्रकारे लोकसहभागातून 40 पाड्यांवर पाणीउपसा सिंचन योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्यातून सुमारे 1 हजार, 400 एकर शेतजमिनीला सिंचनाची हमी मिळाली. यांपैकी 15 ठिकाणी झऱ्याचं पाणी पाईपलाईनद्वारा शेतीला उपलब्ध केले आहे, हे विशेष.
 
आज दोघेहीजण सत्तरीच्या उंबरठ्याच्या अलीकडे उभे आहेत; पण सतत वाढत्या कामाची स्वप्ने बघत आहेत. प्रापंचिक आघाडीवर स्वतःला फार गुंतवून न घेता, गरजेपुरते प्रासंगिक लक्ष घालत आहेत. सामाजिक जाण आणि भान असणारा मुलगा (आदित्य) व सून (मानसी) असल्यामुळेच हे साधत आहे. स्वतःच्या संसाराची सुरुवात वनवासी भागात राहायला जाऊन करणारे हे दाम्पत्य, आजही 44 वर्षांनंतर तन आणि मनाने वनवासींच्या सोबतच आहे. त्यांच्याच आशा आकांक्षाशी एकरूप झालेले आहे. असे समाजभान असणारे, व्रतस्थ जीवन सहजभावाने जगून दाखविणारे दाम्पत्य आजच्या जमान्यात दुमळच म्हणावे लागेल!
 
-विवेक गिरिधारी
 
 
Powered By Sangraha 9.0