Adarsh Mhatre scam: नवी मुंबईत ‘लव्ह-स्कॅम’चा पर्दाफाश! कधी ‘इस्रो’चा शास्त्रज्ञ, तर कधी डॉक्टर बनून महिलांची फसवणूक...

30 Mar 2026 16:33:51
 
Adarsh Mhatre scam
 
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता नवी मुंबईतून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण अजून तापलेलं असतानाच, दुसरीकडे महिलांना टार्गेट करून लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या आणखी एका नराधमाचा पर्दाफाश झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ३४ वर्षीय आदर्श म्हात्रे याला अटक केली असून, त्याचे कारनामे ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. स्वतःला कधी ‘इस्रो’चा शास्त्रज्ञ, कधी डॉक्टर, तर कधी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असल्याचे भासवून त्याने अनेक महिलांची फसवणूक केली. पण ही फसवणूक तो करायचा कसा? किती महिला या जाळ्यात अडकल्या होत्या? आणि हा आदर्श म्हात्रे नेमका आहे तरी कोण? (Adarsh Mhatre scam)
 
राज्यात सध्या सर्वत्र महिलांचे शोषण प्रकरणी भोंदू अशोक खरात याच्या नावाची चर्चा जोरदार सुरु असून, त्यात आता नवी मुंबईतून असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. ३४ वर्षीय आदर्श म्हात्रे हा विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिलांची फसवणूक करत होता. आरोपी विविध नावांनी जसं की, स्वप्नील वारुळे, नहुष म्हात्रे, जयेश नाईक, तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोवेकर अशा अनेक बनावट ओळखी तयार करून प्रोफाइल अपलोड करायचा. या प्रोफाइलमध्ये तो स्वतःला श्रीमंत, उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित अधिकारी असल्याचे दाखवत असे. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ दहावी पास असलेला हा आरोपी इतक्या कुशलतेने फसवणूक करत होता की, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी आणि उच्चशिक्षित महिलाही त्याच्या जाळ्यात अडकल्या. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ३० वर्षांवरील, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अनेकदा एकट्या असलेल्या महिलांना तो जाणीवपूर्वक टार्गेट करायचा. (Adarsh Mhatre scam)
 
एका महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला. आरोपीने ‘इस्रो शास्त्रज्ञ’ असल्याचे सांगून ऐरोलीतील एका आयटी इंजिनिअर महिलेला २० लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले. सुरतमध्ये जमीन खरेदी करायची असल्याचे सांगून पैसे मागितले गेले आणि ती रक्कम आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करण्यात आली. (Adarsh Mhatre scam)
 
आदर्श म्हात्रेचे कारनामे केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नाहीत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्याच्याविरोधात नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींनुसार, हा तरुण अत्यंत सराईतपणे आपली ओळख बदलून महिलांची दिशाभूल करत असे. (Adarsh Mhatre scam)
 
आरोपीची कार्यपद्धतीही तितकीच धक्कादायक होती. तो आधी मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांशी ओळख वाढवत असे. काही दिवसांतच विश्वास संपादन करून त्यांना आलिशान हॉटेलमध्ये भेटायला बोलवत असे. BMW, Mercedes सारख्या गाड्यांमध्ये फिरत असल्याचे दाखवून तो स्वतःची श्रीमंत प्रतिमा उभी करत असे. यानंतर तो त्या महिलांशी जवळीक साधायचा आणि काही प्रकरणांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित करायचा. काही दिवसांनी अचानक एखादं गंभीर कारण सांगत १५ ते २० लाख रुपयांची मागणी करायचा. आणि पैसे मिळाल्यानंतर हळूहळू संपर्क तोडायचा. (Adarsh Mhatre scam)
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने किमान ५० ते ७८ महिलांना लक्ष्य केल्याचा संशय आहे. मात्र, सामाजिक बदनामीच्या भीतीने अनेक महिला पुढे येत नसल्याने खऱ्या आकड्याबाबत अनिश्चितता आहे. सध्या तरी राज्यभरातून त्याच्याविरोधात १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा म्हणजे, आरोपी बनावट आधार कार्ड, सरकारी ओळखपत्रे आणि किमान १२ फेक आयडी वापरत होता. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तो महिलांचा विश्वास जिंकत असे. (Adarsh Mhatre scam)
 
नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीतून मिळवलेला पैसा आरोपीने विविध बँक खात्यांमध्ये वळवला. या प्रकरणात त्याचा चुलत भाऊ २१ वर्षीय प्रेम म्हात्रे यालाही अटक करण्यात आली आहे. (Adarsh Mhatre scam)
 
तसेच, डीसीपी सचिन गुंजल यांनी सांगितले की, आरोपी जाणीवपूर्वक उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य करत होता. तो आधी विश्वास निर्माण करत असे आणि नंतर त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत असे.
 
त्यानंतर, फसवणुकीतून मिळालेला पैसा गोव्यातील कॅसिनो आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये उधळायचा. पोलिसांनी या प्रकरणात तब्बल ८९ लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. (Adarsh Mhatre scam)
 
या प्रकरणानंतर पोलिसांनी Shaadi.com, Marathi Matrimony आणि इतर विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांच्या प्रतिनिधींना बोलावून सूचना दिल्या आहेत. प्रोफाइल अपलोड करण्यापूर्वी कडक पडताळणी करणे, फोटो ओळखणारे सॉफ्टवेअर वापरणे आणि अर्जदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रकरणानंतरही आरोपीची काही प्रोफाइल्स अजूनही सक्रिय असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे या प्लॅटफॉर्म्सच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Adarsh Mhatre scam)
 
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे की, ऑनलाइन नातेसंबंध जुळवताना सतर्कता आणि पडताळणी किती गरजेची आहे, त्याशिवाय आता अजून किती महिला या जाळ्यात अडकल्या आहेत? अशा फेक प्रोफाइल्सना थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्म्स काय पावलं उचलणार? आणि सर्वात महत्त्वाचं… डिजिटल युगात विश्वास ठेवताना किती सतर्क राहव? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Adarsh Mhatre scam)
 
 
Powered By Sangraha 9.0