Census 2027 India Live-in Relationship Married Status : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना 'विवाहित' मानले जाणार! काय आहे नवा नियम?

30 Mar 2026 17:13:56
 
Census 2027 India Live In Relationship Married Status Rules
 
Census 2027 India Live In Relationship Married Status Rules : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची नोंद आता 'विवाहित' म्हणून केली जाणार आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत हा बदल करण्यात आलाय. खरंतर सामाजिक दृष्टिकोनातून हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. सरकार डिजिटल जनगणना, अचूक डेटा संकलन आणि बदलत्या सामाजिक रचनेचा विचार करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या बदलाचा परिणाम धोरणे, योजना आणि समाजाच्या रचनेवर होऊ शकतो. आतापर्यंत जनगणनेमध्ये केवळ कायदेशीररित्या विवाहित असलेल्या लोकांचीच नोंद 'विवाहित' म्हणून केली जात असे. मात्र, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? निर्णयामागची सरकारची नेमकी भूमिका काय? याविषयीच थोडक्यात आढावा घेऊयात
 
निर्णयामागची सरकारची भूमिका 
 
केंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना देखील 'विवाहित' म्हणून केली जाणार आहे २०२७ च्या जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन नियमावलीत लिव्ह-इन जोडप्यांना वेगळ्या श्रेणीत न ठेवता त्यांना विवाहित जोडप्यांच्या समकक्ष मानले जाईल. या निर्णयामागील प्रमुख कारणे काय आहेत? तर सगळ्यात आधी येतो सामाजिक सुरक्षेचा मुद्दा. सरकारनं याबाबत काय म्हटलंय तर, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना अधिकृत ओळख देण्यासाठी, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरेल. दुसरे म्हणजे, अचूक आकडेवारी. देशात लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांची नोंद विवाहित म्हणून केल्यास लोकसंख्या आणि कौटुंबिक स्थितीची अधिक अचूक आकडेवारी सरकारकडे उपलब्ध होईल. तिसरं कारण म्हणजे, न्यायालयीन संदर्भ. सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये दीर्घकाळ लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना विवाहासारखे काही अधिकार दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देखील हा निर्णय घेतला गेल्याचे समजले जात आहे.
 
स्व-गणना कशी करता येणार?

२०२७ च्या पहिल्या टप्प्यातील जनगणना एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे लिव्ह इन मध्ये राहणारे जोडपे एकमेकांच्या नात्यांविषयी कशी नोंद करणार असा प्रश्न वारंवार विचारले जात आहे. याबाबत जी माहिती समोर आलीय, त्यानुसार स्व-गणनेच्या पोर्टलवरील 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न' या सेक्शनमध्ये हे स्पष्ट करण्यात आलंय की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ज्या जोडप्यांना आपले नाते 'स्थिर संबंध' (stable union) असल्याचे वाटते, त्यांना गणनेदरम्यान विवाहित मानले जाईल. त्यांची नोंद विवाहित जोडपे म्हणून केली जाईल. मग ती नोंद स्वतः ऑनलाइन केली असो किंवा गणनेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याद्वारे केलेली असो.
 
कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या किती हा घरयादी टप्प्यातील ३३ प्रश्नांपैकी एक आहे. हा टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान ४५ दिवस चालेल, ज्याच्या तारखा प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील. पहिले १५ दिवस स्व-गणनेसाठी असतील, त्यानंतर पुढील ३० दिवस कर्मचारी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती गोळा करतील. २०२७ च्या जनगणनेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे डिजिटल स्वरूप, ज्यामध्ये नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्याची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.. लिव्ह-इन जोडप्यांच्या या नवीन समावेशामुळे जनगणनेचा अर्ज देखील बदलला जाण्याची शक्यता आहे. एकूणच, २०२७ च्या जनगणनेमधील हा बदल आकडेवारीपुरताच मर्यादित नसून, बदलत्या भारतीय समाजाच्या वास्तवाला मान्यता देणारा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार धोरणांमध्येही बदल होत असल्याचं यावरून स्पष्ट होतं आहे. आता या निर्णयावर समाजात कशा प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0