मुंबई (अक्षय मांडवकर) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या वाघाचे आगमन झाले आहे (sahyadri tiger). हा वाघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात नैसर्गिकरित्या स्थलांतरित झाला आहे (sahyadri tiger). त्यामुळे या वाघाचा सांकेतिक क्रमांक एसटीआर टी09 असा ठेवण्यात आला असून त्याला शिलेदार असे संबोधले जाईल. (sahyadri tiger)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला काही दिवसांपूर्वीच या नव्या वाघाचे छायाचित्र चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये मिळाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाचा एक भाग आहे. या भ्रमणमार्गाच्या दक्षिणेला तिलारी आणि काली व्याघ्र प्रकल्पासारखे वाघांचे ब्रिडिंग ग्राऊंड आहेत. याठिकाणी जन्मास येणारे नर वाघ निमवयस्क वयात आल्यानंतर हद्दीच्या शोधात उत्तरेला प्रवास करतात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत पोहोचतात. शिलेदार देखील याच मार्गाने आलेला दिसतो. २०२४ साली सर्वप्रथम शिलेदारचा फोटो आंबोलीत टिपला गेला. सावंतवाडी वन विभागाने डिसेंबर, २०२४ मध्ये आंबोलीत मृत अवस्थेत आढळलेल्या गुराच्या कलेवराच्या ठिकाणी कॅमेरा लावला होता. त्या कलेवरावर सर्वप्रथम हा निमवयस्क वाघ टिपण्यात आला. तिथे त्याच्या सांकेतिक क्रमांक ठेवण्यात आला SKT 21. एसकेटी म्हणजे सह्याद्री कोकण टायगर.
आंबोलीपूर्वी हा वाघ कुठे होता याचा मागमूस नाही. त्यानंतर जानेवारी, २०२५ मध्ये या वाघाचा फोटो थेट राधानगरी वन्यजीव अभयारण्यात टिपण्यात आला. त्यानंतर गेली वर्षभर हा वाघ गायब होता. या काळात तो राधानगरीत होता की राधानगरी ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मधल्या प्रदेशात याविषयी काही माहिती उपलब्ध नाही. मात्र, आता हा वाघ चांदोली राष्ट्रीय उद्याना तारा म्हणजेच एसटीआर टी05 च्या प्रदेशात आला आहे. हा नवीन वाघ निमवयस्क असून तो साधारण तीन ते चार वर्षांचा आहे. त्याने योग्य प्रदेशाच्या शोधात आंबोली ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे स्थलांतर केलेले दिसत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांच्या मदतीने वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेवरुन त्याची ओळख पटवली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा कॉरिडॉर हा व्याघ्र संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
ताराच्या हद्दक्षेत्रात शिलेदार
ताडोबामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित केलेल्या एसटीआर टी05 (तारा) या मादीने चांदोली राष्ट्रीय उद्यानात आपले हद्दक्षेत्र निश्चित केले आहे. तिच्या हद्दक्षेत्रामध्येच एसटीआर टी09 (शिलेदार) वाघाचे छायाचित्र आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे स्थानांतरित केलेल्या वाघिणीसोबत या नव्या नर वाघाची भेट होण्याची शक्यता आहे. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प