National Student Film Festival 2026: राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न

    03-Mar-2026   
Total Views |

मुंबई: (National Student Film Festival 2026)
राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ मुंबई विद्यापीठ, कलिना येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च हा दोन दिवसीय कार्यक्रम राष्ट्रीय कला मंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात तरुण चित्रपट निर्मात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध भाषांतील चित्रपटांचे प्रदर्शन, मार्गदर्शनपर सत्रे आणि विचारमंथनपर चर्चांमुळे हा दोन दिवसांचा सिनेमा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला होता. (National Student Film Festival 2026)

या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी उद्यावर, स्वागत समिती सचिव राज कांबळे, अभाविप राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, राष्ट्रीय कला मंच संयोजक अभिनव दीप, NSFF संयोजक सौम्या चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. (National Student Film Festival 2026)

तदनंतर ज्यूरी ब्रिफिंग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात ख्यातनाम लेखिका निधी सिंह धर्मा, प्रख्यात चित्रपट लेखक अमरनाथ झा, संगीत दिग्दर्शक राहुल सुहास, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा, राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शिका वंदिता चक्रदेव तसेच चित्रपट दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. (National Student Film Festival 2026)

या मान्यवरांनी माध्यमांची भूमिका, बदलते चित्रपटसृष्टीचे स्वरूप आणि समाजातील सिनेमाचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले. त्यांनी तरुण चित्रपट निर्मात्यांना नाविन्यपूर्ण विचार, जबाबदार कथनशैली आणि सर्जनशील धैर्य जपण्याचे आवाहन करत त्यांना प्रेरित केले. (National Student Film Festival 2026)

महोत्सवासाठी एकूण ३० चित्रपटांची निवड करण्यात आली होती आणि हे सर्व चित्रपट दोन दिवसांच्या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले. विविध विषय, शैली आणि भाषांतील या चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (National Student Film Festival 2026)

महोत्सवादरम्यान चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या ४ मार्गदर्शनपर मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले. लेखक व संपादक अभिजीत देशपांडे यांनी कथाकथन आणि पटकथा लेखन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सुदीप लाहिरी (हेड ऑफ कलेक्टिव्ह मीडिया) यांनी चित्रपट निर्मितीतील नवी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोग याविषयी चर्चा केली.

लेखक व छायाचित्रकार केदार गायकवाड यांनी छायांकन, संपादन आणि ध्वनी या तांत्रिक पैलूंवर सविस्तर व्याख्यान दिले. तसेच तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचे लेखक व दिग्दर्शक व्ही. एन. आदित्य यांनी चित्रपटांची नैतिकता, भविष्यकालीन सिनेमा आणि त्याचा सामाजिक परिणाम याविषयी आपले विचार मांडले. (National Student Film Festival 2026)

प्रत्येक सत्रानंतर प्रेक्षकांशी संवाद आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये उपास्थितांनी उत्साहाने प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. सत्यजीत मंडले, उपमहानिर्देशक, नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी एक माहितीपूर्ण व प्रेरणादायी नेटवर्किंग सत्र सादर केले, ज्यात त्यांनी सिनेमा क्षेत्रातील अनुभव, मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या. (National Student Film Festival 2026)

या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका विशेष पॅनेल चर्चेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या चर्चेत चित्रपट दिग्दर्शिका पूजा कदम आणि चित्रपट निर्माते अविनाश त्रिपाठी यांनी “एआय आणि भारतीय सिनेमाचे भविष्य” या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती भूमिका, त्याचे फायदे आणि संभाव्य परिणाम यावर सखोल चर्चा केली. तसेच सत्राच्या शेवटी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. (National Student Film Festival 2026)

महोत्सवाच्या अखेरीस भव्य समारोप समारंभ (व्हॅलेडिक्टरी) सत्राचे आयोजन करण्यात आले. या समारोप सोहळ्यास क्रिएटिव्ह डायरेक्टर, बिर्ला स्टुडिओजचे महर्षि शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, चित्रपट विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण राठी, राष्ट्रीय कला मंचाचे प्रमुख अंकित शुक्ला आणि मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थी विभागाचे संचालक सुनील पाटील यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली होती. (National Student Film Festival 2026)

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तरुण चित्रपट निर्मात्यांचे कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक दर्जेदार आणि प्रभावी चित्रपट निर्मितीसाठी प्रेरित केले. यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. (National Student Film Festival 2026)

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘पानपंख’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. विशेष प्रशंसा पुरस्कार ‘सोंगटी’ आणि ‘सीझ’ या चित्रपटांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार ‘सांझा कुआं’ याला मिळाला. सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार ‘रिहा’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट युवा दिग्दर्शक पुरस्कार ‘बाप रे बाप’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकास मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट आशादायी आवाज पुरस्कार ‘द क्व्यू’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. (National Student Film Festival 2026)

मुख्य अतिथी महर्षि शाह मनोगतात म्हणाले की, जे युवा चित्रपटनिर्माते आहेत, त्यांना प्रथम सर्व भारतीय चित्रपटांचा अभ्यास करावा, त्यांचा अनुभव घ्यावा, आणि त्यातून प्रेरणा घेऊनच ते स्वतःचे सृजनात्मक कार्य पुढे न्यायला हवे; फक्त त्यानंतरच त्यांचे कलात्मक दृष्टिकोन अधिक समृद्ध होऊ शकतो. (National Student Film Festival 2026)


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक