‘वन्दे मातरम्‌‍‌’ आणि ‌‘श्रीसूक्त‌’

29 Mar 2026 14:07:14

बंकिमचंद्रांच्या घरी रोज ‌‘श्रीसूक्ता‌’चे पठण होत असे. ‌‘श्रीसूक्ता‌’चे पठण ऐकताना त्यांच्या डोळ्यांपुढे भारतमातेचा नकाशा उभा राहिला आणि सागरातील लाटांवर लक्ष्मी उभी असल्यासारखी आहे, असेच त्यांना वाटले. त्यामुळे श्रीसूक्ता‌’तील मंत्र या भावस्वरूपात त्यातील आशय ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मध्ये ओतून बंकिमचंद्रांनी भारतीय आध्यात्मिक श्रीमंती आणखी समृद्ध केली. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’च्या सार्धशती वर्षानिमित्ताने ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ - ‌‘श्रीसूक्त‌’ यांचा भाव शब्दबद्ध करणारा हा लेख...

वन्दे मातरम्‌‍‌’ या राष्ट्रीय गीताची निर्मिती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’च्या सार्धशती वर्षात याचे ठिकठिकाणी विश्वविक्रमही झाले आणि विद्यमान केंद्र सरकारने ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’च्या 150व्या वर्षानिमित्त सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये पूर्ण सहा कडव्यांचे ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ गायन अनिवार्य केले आहे.

कोलकात्याजवळ काटलपाडा हे छोटेसे खेडेगाव. आश्विन शुद्ध नवमीचा तो दिवस होता. त्यावेळी नवरात्र बसले होते. नोकरीतून काही दिवसांसाठी रजा काढून बंकिमचंद्र आपल्या या जन्मगावी काटलपाडा येथे मातोश्री व बंधू यांना भेटण्यासाठी व नवरात्रासाठी आले होते. त्यांचे घरी रोज ‌‘श्रीसूक्ता‌’चे पठण होत असे. बंकिमचंद्रांचे संस्कृत उत्तम होते. हे ‌‘श्रीसूक्ता‌’चे पठण ऐकताना त्यांच्या डोळ्यांपुढे भारतमातेचा नकाशा उभा राहिला आणि सागरातील लाटांवर लक्ष्मी उभी असल्यासारखी आहे, असेच त्यांना वाटले. हिमालय, काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, मेवाड, ओडिशा ही तिची करकमले, महाराष्ट्र हा तिचा उरोभाग, कर्नाटक ही तिची पदकमले, केरळ (कन्याकुमारी) ही तिची तळपदकमले असे तिचे रूप त्यांच्या प्रज्ञाचक्षुंपुढे साकार झाले असावे, हे ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’चा सूक्ष्म अभ्यास करताना जाणवते.

पारतंत्र्यात खितपत पडलेली सहा कोटी मुले त्यांना त्यावेळी गवसली असावीत व त्यांच्या कविमनात ‌‘श्रीसूक्त‌’ आणि ‌‘भारतमाता‌’ कल्पना शब्दचित्र रंगवू लागली. ‌‘श्रीसूक्त‌’ हे ऋग्वेदातील आणि ऋग्वेदात नंतर समाविष्ट झालेले सूक्त मंत्र आहे. ‌‘श्री‌’ या नावामध्ये श्रीमंती, वैभव, समृद्ध कीत, प्रतिष्ठा, सौंदर्य, सौभाग्य, सद्गुण, सद्बुद्धी, तेज अशा नाना सद्गुणांचा समावेश आहे. श्री म्हणजे लक्ष्मीची हीच वैशिष्ट्ये आहेत. ‌‘श्रीसूक्ता‌’तील मंत्र या भावस्वरूपात त्यातील आशय ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मध्ये ओतून बंकिमचंद्रांनी भारतीय आध्यात्मिक श्रीमंती आणखी समृद्ध केली. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’च्या कडव्यांमधील भावार्थ असलेल्या बऱ्याच ऋचा ऋग्वेदातील अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू, आप, औषधी (वनस्पती) वगैरेच्या मंडलांमध्येही आहेत.

‌‘श्रीसूक्ता‌’त 25 ऋचा किंवा मंत्र आहेत. त्यातील पहिले 14 मंत्र लक्ष्मीच्या नाममाहात्म्यावर आहेत. 15-16 क्रमांकाचे मंत्र ‌‘श्रीसूक्ता‌’च्या विधानपर असून 17 ते 25 हे मंत्र फलश्रुती आणि पसायदानपर आहेत. या 25 मंत्रांमध्ये विषय एकच असल्याने वेगवेगळ्या संदर्भांत पुनरुक्ती असणे स्वाभाविक आहे. शिवाय, हे मंत्र एकाच ऋषींनी रचलेले नसून आनंद, कर्दम, चिक्लीत, इंदिरासुत वगैरे वेगवेगळ्या ऋषींनी रचलेले आहेत. त्यांचे नामोल्लेखही काही ऋचांमध्ये आहेत. आपल्या लेखनाचा लक्षबिंदू ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ - ‌‘श्रीसूक्ते‌’ यांचा भाव अशी तुलना हा आहे. म्हणून या लेखात शब्दमर्यादेमुळे काही मंत्रांची निवड केली आहे. ‌‘श्रीसूक्ता‌’तील भावाशय ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मध्ये क्रमवारी नसून तो त्यात विखुरलेला आहे.

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे|
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥


अर्थ : या जलस्रोत देवता (मला) स्नेह देवोत (अर्थात, मला अनुकूल राहोत.) हे चिक्लीत नामक लक्ष्मीपुत्रा, तू माझ्या घरात वास कर (अर्थात, तुझ्यापासून मला लाभ मिळो) आणि माझ्या कुळात देवी लक्ष्मीचा (निरंतर) वास राहो. यात ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ या धृपदातील ‌‘मातरम्‌‍‌’ शब्दाचा भाव या लोकातून जाणवतो.

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्‌|
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्‌‍॥


अर्थात, हे अग्ने, त्या स्थिर आणि अविनाशी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर; तिच्या आगमनाने मला सुवर्ण गायी, अश्व, सेवक व इष्ट मित्र इत्यादिकांचा लाभ होईल. ‌‘श्रीसूक्ता‌’तील या मंत्रातील ‌‘यस्यां हिरण्यं विन्देयं‌’ हा भावार्थ ‌‘श्यामला सरला‌’मध्ये दर्शवता येतो.

हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्‌|
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥


उत्पन्न झालेल्या विश्वाचे संपूर्ण ज्ञान असलेल्या सुवर्णाप्रमाणे जिची अंगकांती आहे, मृगाप्रमाणे जिचा स्वभाव अत्यंत चंचल आहे, सुवर्ण आणि चांदीच्या फुलांच्या माळा जिने धारणा केल्या आहेत, चंद्राप्रमाणे जी प्रकाशमान आणि आनंद प्रदान करणारी आहे, जिने सुवर्णाचे अलंकार घातले आहेत आणि जी कलंकशून्य आहे, अशा देवी लक्ष्मीला माझ्यासाठी आमंत्रित कर.

‌‘सस्यश्यामला‌’ या शब्दाचा भाव ‌‘श्रीसूक्ता‌’च्या वरील मंत्रात जाणवतो.

कां सोस्मितां हिरण्यप्राकाराम्‌‍
आर्द्रा ज्वलन्तीम्‌‍ तृप्ताम्‌‍ तर्पयन्तीम्‌|
पद्मे स्थितां पद्मवर्णां तां इह उपह्वये श्रियम्‌‍॥


अर्थात, जी स्मितहास्य करते, जी दयाळू आहे, तेजस्वी आहे, संतुष्ट आहे, जी सर्वांना संतोष देते, जी कमळात वास करते, जिची कांती कमळासमान आहे व जिचा प्रासाद स्वर्णमय आहे, अशा लक्ष्मीला मी आवाहन करतो. ‌‘श्रीसूक्ता‌’तील वरील मंत्रातील ‌‘सोस्मितां‌’चा भाव ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील ‌‘सुहासिनीं सुमधुरभाषिणीं‌’ या शब्दांतून साम्यदर्शन घडवतो.

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्‌|
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्‌‍॥


अर्थात, ‌‘सुगंध‌’ ही जिच्या अस्तित्वाची खूण आहे, जी कधीही अपमानित होत नाही, जी नेहमीच पुष्ट अर्थात समृद्ध आहे, जिची सर्व प्राणिमात्रांवर सत्ता आहे, त्या भूमिरूपी लक्ष्मीला मी आवाहन करतो. ‌‘श्रीसूक्ता‌’च्या वरील मंत्रामध्ये ‌‘गन्धद्वारां‌’चा भाव ‌‘मलयजशीतलाम्‌‍‌’ या धृपदाच्या शब्दांत प्रतिबिंबित होतो.

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीम्‌‍
श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्‌|
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये
अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥


जी चंद्रप्रभेसमान तेजस्वी आहे, कीर्तिवान आहे, उज्ज्वल आहे, उदार आहे, जी कमल धारण करते, जिची देव सेवा करतात, जिचे ‌’ईं‌’ हे बीजरूप आहे, जी लोकांना आल्हाद देते, त्या लक्ष्मीला मी शरण आहे. हे देवी, माझे दारिद्य्र दूर कर, अशी मी तुला विनंती करतो. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील दुसऱ्या कडव्यातील ‌‘शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं‌’ अर्थात ‌‘चांदण्याप्रमाणे शीतलता‌’ हा भाव ‌‘श्रीसूक्ता‌’च्या मंत्रात जाणवतो.

पद्मानने पद्मिनि पद्मपत्रं पद्मदलायताक्षि|
विश्वप्रिये विश्वमनोनुकूले
त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व॥


हे कमलवदने, कमळामध्ये वास करणाऱ्या, कमलपत्राप्रमाणे करणाऱ्या देवते, माझ्या सर्व मनोकामना पूर्ण कर. विश्वाला प्रिय वाटणाऱ्या, विश्वातील प्राणिमात्रांच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या हे देवी, तुझ्या कमलासारख्या पायांचे सान्निध्य मला प्राप्त होवो. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील पाचव्या कडव्यातील ‌‘कमला कमलदल‌’ या पंक्तींमधील भाव ‌‘श्रीसूक्ता‌’च्या या मंत्रात जाणवतो.

आर्द्रा यष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम्‌|
सूर्यां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥


हे अग्ने, जी अत्यंत दयाळू आहे, जी दंड म्हणून वेताची काठी धारण करते, जी सोन्याच्या माळा घालते, जी सूर्यासमान तेजस्वी आहे, अशा सुवर्णकांतीयुक्त, स्वर्णमयी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. ‌‘श्रीसुक्ता‌’तील ‌‘यष्करिणीं‌’ हा भाव ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील ‌‘त्वंहि दुर्गा दशप्रहरणधारिणी‌’मध्ये प्रकर्षाने जाणवतो.

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि|
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः॥

हे लक्ष्मी, आमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही सत्य बोलावे, आम्हाला भरपूर अन्न मिळावे, आमचे पशुधन धष्टपुष्ट असावे आणि मलाही यश मिळावे. ‌‘श्रीसूक्ता‌’च्या वरील मंत्रातून ऐश्वर्यप्रदान भाव ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील ‌‘सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍‌’, तसेच ‌‘धरणीं भरणीं‌’ यातून व्यक्त होतो.

पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादि गवे रथम्‌|
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे॥


हे देवी लक्ष्मी, तू सर्व प्रजांची अर्थात लोकांची माता आहेस. तू मला पुत्र, पौत्र, अर्थात नातवंडे, धन, धान्य, हत्ती, अश्व, गायी, रथ इत्यादी सर्व वैभव दे. ही देवी, मला दीर्घायुषी करो. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील ‌‘धरणीं भरणीं मातरम्‌‍‌’ या ओळीचा भाव या मंत्रातून जाणवतो.

श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते|
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥

अर्थात, हे देवी लक्ष्मी, तू मला श्री संपत्ती, समृद्धी, कीत, प्रतिष्ठा, सौंदर्य, सौभाग्य, सद्गुण, सद्बुद्धी, तेज आदी अधिकार, आयुष्य, आरोग्य, दिव्य ऐश्वर्य, धन, धान्य, पशु, पुत्रसंतती दे, मला शतायुषी कर. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील ‌‘तुमि विद्या तुमि धर्म‌’ आणि ‌‘वाणी विद्यादायिनी‌’ या ओळीतील भाव या मंत्रातून व्यक्त होतो.

पद्मानने पद्म-उरू पद्माक्षि पद्मसंभवे|
तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्‌‍॥


अर्थ : हे उमललेल्या कमळासारखे प्रसन्न मुख असलेली, कमळासमान मृदू मांड्या असलेली, कमळासारखे नेत्र असलेली, कमळात उत्पन्न होणाऱ्या (देवी) लक्ष्मी! मला सौख्य लाभावे, म्हणून मी तुझी भक्ती करतो. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’मधील ‌‘फुल्लकुसुमितदृमदलशोभिनीम्‌‍‌’, तसेच ‌‘कमलाकमलदलहारिणीं‌’ या ओळीतील भावार्थ या मंत्रातून जाणवतो.

सरसिजनिलये सरोजहस्ते| धवलतरांशुकगंधमाल्यशोभे॥
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे|
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्‌‍॥

हे देवी लक्ष्मी, तू कमळात निवास करतेस, तुझ्या हातात कमळ आहे. तू शुभ्र वस्त्र नेसली आहेस. तुझ्या गळ्यातील सुगंधी पुष्पांची माळ तुला शोभून दिसते. तू भाग्यवान आहेस. तू विष्णूची प्रिय पत्नी आहेस. तू अतिशय मनोहर आहेस. तू त्रिभुवनाला वैभवशाली करणारी आहेस. तू मला प्रसन्न हो. ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ धृपदातील ‌‘सुजलाम्‌‍ सुफलाम्‌‍‌’ ‌‘श्रीसूक्ता‌’च्या या मंत्रातील ‌‘सरसिजनिलये‌’ व ‌‘त्रिभुवनभूतिकरि‌’ या शब्दांमध्ये प्रकर्षाने जाणवतो.

खरं तर, हे राष्ट्र जोपर्यंत आहे, तोवर हे गीत राहणारच! चांगल्याचे अनुकरण करण्याची ओढ मनुष्याला जीवन हेतूच्या जवळ घेऊन जात असते. मग निर्माण होते कुतूहल, की खरंच जीवनाचा हेतू काय असावा? अनादिकालापासून मनुष्याला हे कोडे कुतूहलाचे ठरलेले आहे आणि यातूनच मनुष्य जीवनाची वाटचाल करत असतो. मानवी मन मुळातच संवेदनशील असते. ज्या सृष्टीतील चराचरांनी त्यांना घडवले, त्यांचे स्मरण आपल्यालाही प्रेरक ठरू शकेल, या विश्वासातूनच ‌‘वन्दे मातरम्‌‍‌’ची रचना झाली असावी. मनुष्य स्वभाव समाजशील असल्यामुळे, विचार हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असल्यामुळे आणि हे गीत तर जीवनहेतूच्या एवढे जवळ नेणारे आहे की, आपले आयुष्य जर उन्नत करायचे असेल, तर आपण हे गीत मुखोद्गत केलेच पाहिजे. एवढेच नव्हे, तर समजून उमजून त्याचे मननही केले पाहिजे. हाच गीताचा गोडवा सदैव मांगल्याचा होवो आणि हे राष्ट्र अधिक संपन्न आणि बलशाली होत, या राष्ट्राची उन्नती अधिक वर्धिष्णु होत राहावी, हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना.
वन्दे मातरम्‌!

- सर्वेश फडणवीस
8668541181

Powered By Sangraha 9.0