नुकताच आपण गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. परंतु, भारताच्या संदर्भात हा उत्सव केवळ दिनदर्शिकेतील बदल नाही, तर तो आकाशातील खगोलीय हालचाली, ऋतुचक्र आणि निसर्गातील बदल यांच्याशी अतिशय घट्टपणे जोडलेला आहे. त्याचाच सविस्तर मागोवा घेणारा हा लेख...
महाराष्ट्रातील ‘गुढीपाडवा’, दक्षिण भारतातील ‘उगादी’, काश्मीरमधील ‘नवरेह’ किंवा उत्तर भारतातील ‘चैत्र शुक्ल प्रतिपदा’ या सर्वांचा पाया एकच आहे आणि तो म्हणजे भारतीय कालगणना आणि तिच्या मागील खगोलशास्त्रीय तत्त्वे!
प्रथम आपण ‘वर्ष’ म्हणजे नेमके काय, हे समजून घेतले पाहिजे. पृथ्वी सूर्याभोवती एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. या एका पूर्ण प्रदक्षिणेस सुमारे 365.24 दिवस लागतात. हेच आपण ‘सौर वर्ष’ म्हणून ओळखतो. परंतु, भारतीय कालगणना केवळ सूर्याच्या हालचालीवर आधारित नाही, तर ती चंद्राच्या हालचालींचाही विचार करते. म्हणूनच तिला ‘चांद्र-सौर कालगणना’ असे म्हणतात.
चंद्र पृथ्वीभोवती सुमारे 29.5 दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. या कालावधीला ‘चांद्रमास’ म्हणतात. अमावस्या ते अमावस्या किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा असा हा चक्राकार प्रवास असतो. भारतीय दिनदर्शिकेत महिन्यांची मोजणी या चांद्रमासावर आधारित आहे. परंतु, 12 चांद्रमासांची बेरीज सुमारे 354 दिवस इतकी होते, जी सौर वर्षापेक्षा सुमारे 11 दिवसांनी कमी आहे. हा फरक भरून काढण्यासाठी ‘अधिक महिना’ (अधिक मास) ही संकल्पना वापरली जाते. दर दोन-तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडून चांद्र आणि सौर कालगणना यांचा समतोल राखला जातो.
भारतीय नवीन वर्षाची सुरुवात प्रामुख्याने ‘चैत्र शुक्ल प्रतिपदा’ या दिवशी होते. हा दिवस निवडण्यामागे केवळ धार्मिक कारणे नाहीत, तर त्यामागे ठोस खगोलशास्त्रीय आधार आहे. हा काळ वसंत ऋतूच्या प्रारंभी येतो, जो वसंत संपाताच्या आसपास असतो. सूर्य त्यांच्या भासमान मार्गावर म्हणजेच, आयनिक किंवा क्रांतिवृत्तावर दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जाताना जेव्हा विषुववृत्ताला छेदतो, त्या छेदनबिंदूला ‘वसंत संपात बिंदू’ म्हणतात. इथे दिवस आणि रात्र समान असतात. यावेळी पृथ्वीच्या अक्षाचा झुकाव आणि सूर्यप्रकाश यांचे वितरण असे असते की, दिवस आणि रात्र जवळजवळ समान असतात. हा क्षण पृथ्वीवरील ऊर्जा वितरणाचा ‘समतोल बिंदू’ मानला जातो.
वसंत संपातानंतर उत्तर गोलार्धात दिवस लांब होऊ लागतात, तापमान वाढते आणि वनस्पतींमध्ये नवीन जीवनाची सुरुवात होते. म्हणूनच, या काळाला नवचैतन्याचा आरंभ असे मानले जाते. भारतीय संशोधकांनी हजारो वर्षांपूव या नैसर्गिक बदलांचे निरीक्षण करून नवीन वर्षाची सुरुवात या काळाशी जोडली. हे निरीक्षण-आधारित विज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
सूर्याच्या राशीतील हालचालीही भारतीय कालगणनेत महत्त्वाच्या आहेत. सूर्याच्या भासमान मार्गावर 12 राशी आहेत. सूर्य एका राशीतून दुसऱ्यात प्रवेश करतो, त्याला ‘संक्रांती’ म्हणतात. ‘मकरसंक्रांती’ हा सूर्याच्या ‘उत्तरायण’ प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.
भारतीय कालगणनेत दोन प्रमुख पद्धती आढळतात, ‘अमांत’ आणि ‘पौर्णिमांत’. ‘अमांत’ पद्धतीत महिना अमावस्येपासून सुरू होतो, तर ‘पौर्णिमांत’ पद्धतीत तो पौर्णिमेपासून सुरू होतो. महाराष्ट्रात ‘अमांत’ पद्धती प्रचलित आहे, त्यामुळे गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.
दरवष भारतीय नवीन वर्षाची तारीख निश्चित एकाच दिवशी का येत नाही? तर याचे मूळ कारण म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या कालचक्रातील विसंगती. चंद्रमास साधारण 29.5 दिवसांचा असतो, तर सौर वर्ष 365.24 दिवसांचे असते. त्यामुळे चांद्र महिन्यांची बेरीज आणि सौर वर्ष यामध्ये दरवष सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. हा फरक जर तसाच राहू दिला, तर कालांतराने महिने आणि ऋतू यांचे नाते तुटू लागेल. उदाहरणार्थ, चैत्र महिना हिवाळ्यात येऊ लागेल किंवा दिवाळी उन्हाळ्यात येईल. ही विसंगती टाळण्यासाठी भारतीय कालगणनेत अत्यंत सूक्ष्म पद्धत वापरली जाते. यामध्ये ‘अधिक महिना’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. साधारण दोन ते अडीच वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. जेव्हा एका सौर महिन्यात दोन अमावस्या येतात, त्यावेळी हा महिना येतो. म्हणजेच, सूर्याच्या राशीतील संक्रमण त्या चांद्रमासात होत नाही. अशा वेळी तो महिना ‘अधिक’ म्हणून ओळखला जातो. या समायोजनामुळे चांद्र आणि सौर कालगणना पुन्हा एकमेकांशी जुळवून घेतात. ही प्रक्रिया अत्यंत तर्कबुद्धीपूर्ण आहे आणि दीर्घकालीन समतोल राखते.
याशिवाय, पृथ्वीची कक्षा पूर्णपणे गोल नसून किंचित लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग वर्षभर एकसमान राहत नाही. काही काळ ती थोडी जलद, तर काही काळ थोडी मंद गतीने फिरते. यामुळे ऋतूंच्या आगमनाच्या अचूक वेळेत सूक्ष्म बदल घडतात. या सूक्ष्म बदलांचा परिणाम कालगणनेवरही पडतो. तसेच पृथ्वीच्या अक्षाचा झुकाव आणि त्यातील सूक्ष्म दीर्घकालीन बदल, ज्याला ‘परांचन गती’ म्हटले जाते, यामुळेही तारकांच्या संदर्भात सूर्याची स्थिती हळूहळू सरकत राहते.
भारतीय नवीन वर्ष हा एखाद्या स्थिर तारखेचा उत्सव नसून, एक गतिमान खगोलीय घटना आहे. तो आकाशातील प्रत्यक्ष स्थितींशी जुळवून घेत राहतो. म्हणूनच, तो कधी मार्चच्या शेवटी; तर कधी एप्रिलच्या सुरुवातीला येतो. या बदलामागे अनियमितता नसून, एक अत्यंत अचूक आणि सुसंगत गणिती व्यवस्था कार्यरत असते. त्यामुळे भारतीय कालगणना ही स्थिर दिनदर्शिकेपेक्षा अधिक लवचीक आणि नैसर्गिकतेशी सुसंगत अशी प्रणाली आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
या सर्व प्रक्रियेमध्ये ‘वेळ’ ही संकल्पना अत्यंत सापेक्ष आहे, हेही लक्षात येते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग, सूर्याभोवतीची कक्षा, चंद्राचे परिभ्रमण या सर्व हालचाली एकत्रितपणे आपल्या वेळेची रचना करतात. त्यामुळे नवीन वर्ष म्हणजे एखाद्या क्षणाचा अचानक बदल नसून, एका दीर्घ खगोलीय चक्राचा नैसर्गिक टप्पा आहे.
भारतीय नवीन वर्षाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, त्याची निसर्गाशी असलेली सांगड. पाश्चात्त्य दिनदर्शिकेत 1 जानेवारी हा दिवस हिवाळ्याच्या मध्यात येतो, ज्याचा ऋतुचक्राशी थेट संबंध नाही. परंतु, भारतीय नवीन वर्ष वसंत ऋतूच्या सुरुवातीला येते, जेव्हा शेती, हवामान आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांत नवीन सुरुवात दिसून येते. त्यामुळे ही कालगणना अधिक जिवंत आणि अनुभवाधारित वाटते.
इतिहासाच्या दृष्टीने पाहिले, तर भारतीय संशोधकांनी अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे करून ही प्रणाली विकसित केली. त्यांनी कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय आकाशातील बदलांचे दीर्घकालीन निरीक्षण केले आणि त्यावर आधारित गणिती सूत्रबद्धता तयार केली. यामुळे वेळेचे मोजमाप केवळ तांत्रिक नसून, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संदर्भांनी समृद्ध झाले.
आजच्या काळात अणू-घड्याळे, उपग्रह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण वेळेचे अत्यंत अचूक मोजमाप करतो. तरीही, भारतीय कालगणनेचे महत्त्व कमी होत नाही. कारण, ती आपल्याला वेळेच्या मूळ स्वरूपाशी, म्हणजे निसर्गाशी जोडून ठेवते. नवीन वर्ष म्हणजे केवळ दिनदर्शिकेतील एक पान बदलणे नसून पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या अखंड नृत्याचा एक नवा टप्पा आहे.
भारतीय नवीन वर्ष ही एक वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संकल्पना आहे. आपण या विश्वाचा एक भाग आहोत आणि आपल्या वेळेची जाणीव ही आकाशातील घटनांशी घट्ट जोडलेली आहे, याची ती आपल्याला आठवण करून देते. त्यामुळे जेव्हा आपण गुढी उभारतो किंवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, तेव्हा आपण केवळ परंपरा जपत नाही; तर विश्वाच्या या महान लयीशी स्वतःला पुन्हा एकदा जोडत असतो.
- सुजाता बाबर
sumiba_r@yahoo.com