रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस... महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास संशोधक. महाराष्ट्रात प्रारंभीच्या नामवंत व निष्ठावंत इतिहास संशोधकांनी मराठा इतिहास लेखनाची व ऐतिहासिक साधने संकलित व संपादित करण्याची जी थोर आणि उज्ज्वल परंपरा निर्माण केली होती, त्या परंपरेतील रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस हे एक होत. दि. 31 मार्च रोजी त्यांचा 100वा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचे स्मरण करणारा हा लेख...
रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांनी भारतातील व महाराष्ट्रातील पहिले ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय सुरू केले. त्या गोष्टीला 100 वर्षे होत आहेत. दि. 3 नोव्हेंबर 1925 रोजी या संग्रहालयाचे उद्घाटन तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाले. त्यावेळी “हा माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे,” असे उद्गार पारसनीस यांनी काढले. त्यांच्या या स्मृतिवर्षानिमित्त त्यांच्या कार्याची माहिती करून घेतली पाहिजे.
रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचा जन्म दि. 27 नोव्हेंबर 1870 साली बोरगाव (जिल्हा सातारा) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथे झाले. शालेय अभ्यासाला जास्त प्राधान्य न देता, आपल्या आवडत्या छंदाकडे लक्ष दिले. हा छंद म्हणजे, इतिहास वाचन व त्यातील व्यक्तिमत्त्वे यांनी भारावून जाणे आणि त्यासंबंधी लिखाण करणे. परिणामी, त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्या काळात त्यांनी चालविलेले ‘महाराष्ट्र कोकीळ’ हे मासिक खूप गाजले. त्याला दोन हजार वर्गणीदारदेखील मिळाले होते.
मानसकन्या झाशीची राणी आज इतिहास संशोधक पारसनीस यांचे नाव केव्हाही निघाले, तरी इतिहासप्रेमींना झाशीच्या राणीच्या चरित्राची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. इतके ते नाव पारसनीसांशी जोडले गेलेले आहे.
आतापर्यंत झाशीच्या राणीच्या अस्सल माहितीच्या आधारे पुस्तक लिहिले गेले नव्हते. महाराष्ट्रातील लोकांना झाशीच्या राणीविषयी फार माहिती नव्हती. पारसनीसांनी राणीचे चरित्र लिहिले, तेव्हा कुठे मराठी लोकांना झाशीच्या राणीच्या जीवनाविषयी आणि तिच्या अतुल धैर्याविषयी, पराक्रमाविषयी विस्तारपूर्वक माहिती प्राप्त झाली. त्या दृष्टीने पारसनीस यांनी झाशीच्या राणीचे चरित्र लिहून तिला पुनजवित केले, असे म्हणावे लागेल. म्हणूनच तिला ‘पारसनीसांची मानसकन्या’ असे म्हटल्यास ते चूक होणार नाही.
त्याचे असे झाले होते की, पारसनीस यांनी ‘महाराष्ट्र कोकीळ’ या त्यांच्या मासिकात ‘झाशीच्या राणीचा संक्षिप्त इतिहास’ असा लेख प्रसिद्ध केला होता. त्यामुळे टिळकांनी पारसनीस यांना झाशीच्या राणीची खरी माहिती शोधून काढून ती साधार व स्वतंत्र रितीने प्रसिद्ध करावी, असे सूचवले होते. टिळकांप्रमाणे लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांनीही पारसनीस यांची पुण्यास गाठ घेऊन त्यांना इंदोरची अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची चरित्रे लिहिण्याची कळकळीने विनंती केली होती. राणीच्या चरित्राची अस्सल माहिती पारसनीस यांनी ज्या प्रयत्नांनी व कसोशीने जमविली, ती पहिली म्हणजे त्यांचे कौतुक तर वाटतेच, पण त्यांच्या चरित्रलेखनकलेचे तंत्रही लक्षात येते. पारसनीसांनी झाशीच्या राणीची चटका लावणारी जीवनकहाणी इतक्या चटकदार रितीने सांगितली आहे की, ती खरीखुरी कादंबरीच वाटावी. हे चरित्र पारसनीसांनी टिळकांना दाखविले, तेव्हा त्यांनाही अत्यंत समाधान वाटले. राणीच्या शौर्यकर्तृत्वादी गुणांचे वर्णन करावयाचे, परंतु दयाळू इंग्रज सरकारास तर दुखावायचे नाही, अशा शिताफीने शोधपूर्वक लिहिलेल्या या ग्रंथाचे त्यावेळी सर्वांनी स्वागत केले व केसरीने त्यांच्या वर गुणगौरवपर अग्रलेख लिहिला.
महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक तरुण इतिहासकाराचा उदय झाला. यानंतर पारसनीस यांना महाराष्ट्रातील जनता ‘बापूसाहेब पारसनीस’ म्हणून ओळखू लागली. झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र एवढे गाजले की, त्यातील उतारेच्या उतारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तोंडपाठ केले होते, असे सांगतात. टिळकांच्याच प्रोत्साहनामुळे पारसनीसांनी ‘उत्तर हिंदुस्थानातील प्रवास’ ही लेखमाला लिहिण्यास सुरुवात केली. पारसनीसांची भाषा अतिशय रसाळ होती. यामुळे पारसनीसांनी वर्णन केलेला उत्तर हिंदुस्थान वाचकांच्या डोळ्यांपुढे वाचताना, आपण स्वतः प्रवास करीत आहोत, असा भास उत्पन्न होतो. तत्कालीन नेते लोकमान्य टिळक, तसेच आगरकर यांचाही पारसनीस यांच्याशी परिचय झाला होता. त्याचबरोबर आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाची पारसनीस यांची ओळख झाली. ती व्यक्ती म्हणजे न्यायमूत रानडे.
न्यायमूत महादेव गोविंद रानडे यांनी 1894 साली झाशीच्या राणीचे चरित्र वाचून त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पारसनीसांना लिहिले. रानड्यांसारख्या ज्ञानशीलाच्या मुकुटमण्याने प्रसन्न व्हावे, अशीच पारसनीस यांची ती अप्रतिम कृती होती. न्यायमूत रानडे यांनी पारसनीस यांना लिहिलेल्या पत्रात, पारसनीस यांनी त्यांना त्यांच्या इतिहास संशोधनकार्यात मदत करावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. रानड्यांच्या संगतीचा मोठा लाभ हा झाला की, आजवर सरकारच्या कडेकोट पहाऱ्यात आणि कड्या-कुलुपात बंदिस्त असलेले पेशवे दफ्तर रानड्यांच्या प्रयत्नांमुळे पारसनीसांना खुले झाले. मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधन करण्याचे महान कार्य पारसनीस यांच्या हातून झाले, त्याचा पाया हा अशा रितीने घातला गेला होता. पेशवे दफ्तराशिवाय इतर ठिकाणी, वेगवेगळ्या संस्थानिकांकडे असलेली ऐतिहासिक कागदपत्रे त्यांना मिळवायची होती, ती त्यांनी मिळवली.
न्यायमूत रानडे यांच्यामुळे पेशवे दफ्तर खुले होऊन त्यातून सुमारे 15 खंड प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, ‘दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ’, ‘अयोध्येचे नबाब’, ‘धावडशीचे ब्रह्मेंद्र स्वामी यांचे चरित्र’, ‘मुसलमानी आमदानीतील मराठे सरदार’, ‘तंजावरचे राजघराणे’, ‘बायजाबाईचे चरित्र’, ‘महाबळेश्वर’, ‘पन्हाळा’, ‘सांगली संस्थान’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच किंकेड या ब्रिटिश इतिहास अभ्यासकाबरोबर ‘हिस्टरी ऑफ मराठाज’ या ग्रंथाचे तीन खंड लिहिले व 1918 ते 1925 या कालखंडात प्रकाशित केले.
भारतातील पहिले वस्तुसंग्रहालय रावबहादूर पारसनीस यांचे तत्कालीन इतिहासकारांत काही वेगळे स्थान असेल, तर ते त्यांनी ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची सातारा येथे केलेली स्थापना हे होय. पारसनीसांनी आयुष्यभर ऐतिहासिक कागदपत्रांबरोबर मौल्यवान वस्तू, दुमळ ग्रंथ, हस्तलिखित पोथ्या, ऐतिहासिक चित्रे, नाणी, शस्त्रे इत्यादी सामग्री अविश्रांत परिश्रम मिळवली होती. या कागदपत्रांचे व्यवस्थितरित्या जतन व संवर्धन व्हावे, म्हणून एक स्वतंत्र वस्तुसंग्रहालय असावे, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी 1902 पासून त्यांनी खूप परिश्रम घेतले. अखेर तिची पूर्तता 1925 साली झाली.
पारसनीस व कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांचे मित्रत्वाचे संबंध होते. इंग्लंडमधील आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व मिळविण्यासाठी त्यांना 1902 मध्ये आपल्याबरोबरोबर इंग्लंडला नेले होते. पारसनीसांनी तेथे अनेक वस्तुसंग्रहालये पाहिली. अनेक दुमळ ऐतिहासिक वस्तू खरेदी केल्या.
पारसनीसांच्या संग्रहालयात जवळजवळ 50 हजार अस्सल कागदपत्रे होती, जी त्यांनी जुन्या इतिहास प्रसिद्ध घराण्यांकडून मिळवले होती. मुघल, राजपूत आणि इतर राजघराण्याची चित्रे व दुमळ आणि हुशार व्यक्तींची सचित्र हस्तलिखिते, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार आणि इंग्लंड-भारत संबंधाबाबत हस्तलिखित पत्रे, 18व्या शतकातील आणि 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील भारतीय घटनेबाबत इंग्रजी पुस्तके, सचित्र पुस्तके, जुनी शस्त्रे आणि वस्त्रे, जुने नकाशे आहेत. त्यांच्या संग्रहालयात 743 पुस्तके, गॅझेटियर, डिक्शनरी इत्यादी 28, हस्तलिखिते 50, कलेवरील मासिके 21, नाणी (सोने, चांदी, तांबे) 2 हजार, 280 यादीत समाविष्ट नसलेली जुनी भारतीय चित्रे 39, सचित्र पुस्तके आणि पोथी 39, ऐतिहासिक पुस्तके व मासिके 285, कलेवरील पुस्तके 159, कलेवरील फ्रेंच पुस्तके 20, जुनी भारतीय चित्रे 287, ऐतिहासिक छायाचित्रे 34, इंग्रजी आणि फ्रेंच मासिके 316 इ. पुस्तके, मासिके आहेत.
पारसनीस यांनी आपल्या लेखनकला व मधुर वाणी यांच्या जोरावर आपले उद्दिष्ट साध्य केले आणि इतिहास संशोधनाच्या त्यांच्या व्यासंगाला एका उंचीवर नेले, असे म्हणावे लागेल.
- डॉ. सुरेंद्र पारसनीस
(लेखक रावबहादूर द. ब. पारसनीस यांचे नातू असून व रावबहादूर द. ब. पारसनीस चरित्र व कार्य या ग्रंथाचे लेखक-संपादक आहेत.)