Krishnaraj Mahadik: नेतृत्व तयार होण्यासाठी स्वतःला कष्ट करावे लागतात - कृष्णराज महाडिक

29 Mar 2026 19:06:21
 
Krishnaraj Mahadik
 
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतचे मंत्रालय प्रतिनिधी अभिनंदन परूळेकर यांनी मुलाखतरुपी संवाद साधला. यावेळी राजकीय अपयश, आता मिळालेली संधी, रेसिंग क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय स्तरावर यश, कंटेंट क्रिएशन मधील अनुभव,राज्यातील दौरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंच परिवर्तन यावर कृष्णराज महाडिक यांनी आपले विचार मांडले. (Krishnaraj Mahadik)
 
१. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे?
 
यात सर्वात मोठा वाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आहे. त्यांनी खूप मोठा विश्वास माझ्यावर दाखवला आहे. खरतर मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप मोठ आश्चर्य वाटले.राज्यातील लोकांसाठी आणि युवकांसाठी काम करण्याच हे खूप मोठ व्यासपीठ आहे. मी आता लौकरच महाराष्ट्राचा दौरा सुरू करतोय. मागील एक महिना मी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते,या विचारधारेशी जोडलेल्या प्रमुख लोकांच्या भेटी घेतल्या आहेत. दिल्लीत अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री,खासदार आणि मुंबईत आमदारांची भेट घेऊन अतिशय चांगले मार्गदर्शन घेतले आहे.संपूर्ण महाराष्ट्र पाहण्यास मी फार उत्सुक आहे. (Krishnaraj Mahadik)
 
२.घरात राजकीय पार्श्वभूमी असल्याने स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करणार ?
 
घरात राजकीय इतिहास , वारसा चांगला आणि मोठा आहे त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.पण नेतृत्व तयार होण्यासाठी स्वतःला कष्ट करावे लागतात.फक्त कौटुंबिक पार्श्वभूमी आहे म्हणून सर्व मिळत हे खरं नाही.या पदापूर्वी सुद्धा मी अनेकवेळा राजकीय क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करत होतो. मला संविधानिक पदावर लढण्याची संधी दोनवेळा होती. ते झाले नाही पण त्याच कधीच वाईट वाटल नाही.सर्व निर्णय प्रमुख लोकांशी चर्चा करूनच घेतले होते.यातून खूप शिकायला मिळाले.मी अजून खूप तरुण आहे.लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम मी नेहमी करत आलो आहे.पक्षाचे काम , प्रचार पण अनेकवेळा केला आहे. सामाजिक कामात पण आहेच. फक्त राजकीय वारसा आहे म्हणून न्हवे तर या सर्वाची पण दखल घेतली गेली. (Krishnaraj Mahadik)
 
३.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोणते गुण आणि मार्गदर्शन तुम्ही घेतले ?
 
मी स्वतःला नशीबवान समजतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मला आता काम करायला मिळणार आहे. फार कमी लोकांना अशी संधी मिळत असते. इतर सर्व मुख्यमंत्र्यांचे रेकॉर्ड त्यांनी मोडलेले आहेत.त्या पदावर काम करत असताना त्यांच्यावर एकही डाग नाही आहे.जेव्हा मुंबईत संधी मिळायची तेव्हा त्यांची भेट घ्यायचो.कोणताही व्यक्ती काम घेऊन आला की ते त्याचे काम पूर्ण करायचे. त्यांच्या तोंडातून नाही हा शब्द मी कधी ऐकला नाही.लोकांची समस्या ऐकून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी ते खूप वेळ देतात. वृद्ध दांपत्यास मदतीचा माझा एक व्हिडिओ पाहून त्यांनी माझ्याकडून त्याबाबत माहिती घेतली होती.माझ्याप्रमाणेच अनेक लोकांच्या कामाची अशी दखल ते घेत असतात ही मोठी गोष्ट आहे.तसाच प्रभाव माझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा देखील आहे. त्यांच्या भेटीतून पण खूप प्रभावित झालो होतो. (Krishnaraj Mahadik)
 
४. वडील भाजपा खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून काय कानमंत्र मिळाले?
 
आमच्या वडिलांच काम मी लहानपणापासून बघत आलोय ते माझे आदर्श आहेत.त्यांची कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याची तळमळ अत्यंत जवळून बघितली आहे. कोल्हापूर शहराला मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी कोल्हापुरात सुसज्ज विमान सेवा असणे गरजेचे आहे ही गरज २०१४ साली खासदार झाल्यावर वडील धनंजय महाडिक यांनी ओळखली आणि प्रयत्नाने जवळपास तीन वर्षात त्याची पूर्तता केली. तेव्हा विमानसेवा सुरू करताना ६ महिन्याची आगाऊ तिकिटे त्यांनी आरक्षित करून दाखवली.आज २०२६ साली कोल्हापूर ते मुंबई नियमित विमानसेवा सुरू झाली ही त्यांची दूरदृष्टी होती.महादेवराव महाडिक उर्फ आप्पा हे आमच्यासाठी राजकीय विद्यापीठ आहे.जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते मग ते विरोधक सुद्धा असतील. तरी ते त्यांच्याकडे येत असलेले आम्ही पाहिलेले आहे.ज्याला कुणी नाही त्याला महाडिक आहे असे ते म्हणतात. त्यांच मार्गदर्शक कायमच आदर्श असते.३० वर्ष त्यांनी जिल्ह्याच नेतृत्व केले होते. (Krishnaraj Mahadik)
 
५. तुमच्या कुटुंबात राजकीय अपयश पण आले आहे त्यातून काय बोध घेतला ?
 
आमच्या घराण्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की आम्ही सर्व खेळाडू आहोत. त्यामुळे हार पचविण्याची क्षमता प्रचंड आहे.माझे आजोबा पैलवान होते वडील देखील पैलवान होते. कष्ट आणि धाडस ही आमची दोन तत्वे आहेत.मी जेवढ्या गोष्टी यशातून शिकलो त्यापेक्षा अपयशातून जास्त शिकलो आहे.यश आणि अपयश सुद्धा तात्पुरते असते त्यामुळे चिकाटीने काम करत राहणे महत्वाचे. (Krishnaraj Mahadik)
 
६. ' विषय पंपावर ' याची खूप चर्चा होते हे नेमके काय आहे ?
 
आमचा पेट्रोल पंप व्यवसाय होता त्यामुळे काही बैठकी असतील काही विशेष दिवस साजरा करायचा असेल तर आम्ही पंपावरील कार्यालयात भेटायचो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात चर्चा सुरू झाली की काही विषय असेल तर पंपावर. मी माझ्या यूट्यूब ब्लॉग मध्ये गमतीत एकदा 'विषय पंपावर 'असे म्हटले तर ते वाढत वाढत त्याचा ट्रेंडच बनला आणि मराठी बिग बॉस मध्ये पण सेलिब्रेटींनी विषय पंपावर असे म्हटल्याचे मला कुणीतरी सांगितले. (Krishnaraj Mahadik)
 
७. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच शताब्दी वर्ष पूर्ती सुरू आहे त्यातील पंच परिवर्तन बद्दल काय सांगाल ?
 
स्वदेशी, नागरिक कर्तव्य, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण या पाच गोष्टी प्रत्येक व्यक्तीने आत्मसात केल्या पाहिजेत. आपल्या देशासाठी आपल योगदान यानिमित्ताने प्रत्येक व्यक्तीने जाणले पाहिजे. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियान सरकार राबवत असते पण कचरा करू नये ही जबाबदारी नागरिकांची पण आहे. आपला देश आपल घर आहे हे समजून प्रत्येकाने काम केलं तर फार मोठ परिवर्तन या देशात होईल. (Krishnaraj Mahadik)
 
८. कार रेसिंग आणि कंटेंट क्रिएशन या क्षेत्रात देखील तुम्ही मोठी झेप घेतली आहे आता काय भावना आहेत ?
 
राजकीय क्षेत्र आणि कंटेंट क्रिएशन यामुळे रेसिंग खेळास तेवढा वेळ देता येत नाही.पण आज सुद्धा त्याबद्दल ओढ आहे.त्या खेळातून अनुभवातून मी खूप शिकलो आज माझे जे व्यक्तिमत्व आहे ते रेसिंग मुळे आहे.जेव्हा जागतिक पातळीवर स्पर्धेत तुम्ही यश प्राप्त करता तो अनुभव वेगळा असतो.तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी असता ही भावना खेळातून तयार झाली जी आज राजकारणात नवीन गोष्टी शिकायला मदत करते.आज राजकारणात नसतो तर दुसरी निवड हे कंटेंट क्रिएशन असते.ज्यामुळे खूप लोक भेटले आणि सामाजिक प्रश्न पण सुटण्यास मदत झाली. (Krishnaraj Mahadik)
 
९. आताच्या युवकांना काय संदेश द्याल ?
 
तुम्ही जेव्हा खेळात उतरता प्रशिक्षण घेता तेव्हा तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता विकसित होत जाते. पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे की विकास फक्त आर्थिक नव्हे तर तो शारीरिक,मानसिक,आध्यात्मिक असला पाहिजे.तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी कष्टाची तयारी हवी.संधी खूप असताना एकच क्षेत्रात झोकून देऊन काम करणे ,तरुण वयात क्षेत्र निवडून भविष्यातील २०,३० वर्षांचा विचार करणे गरजेचं आहे. अपयशाने खचून जाऊ नका. कुटुंबात रहा. जेव्हा कुटुंब तुमच्यासोबत उभे असते तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. दुर्घटनेत तुमचा परिवारच उभा असतो. याचा विचार करा. (Krishnaraj Mahadik)
  
Powered By Sangraha 9.0