गाझियाबादचे गद्दार आणि आपण ...

29 Mar 2026 13:03:31

दि. २३ मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद (उत्तर प्रदेश आणि दिल्ली सीमेवर) येथे २२ जणांना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’शी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. दिवसेंदिवस देशाच्या सुरक्षेपुढील आव्हाने किती गंभीर होत चालली आहेत, हे या ‘गाझियाबाद मॉड्यूल’मुळे ठळकपणे दिसून आले. थेट युद्ध शक्य नाही, हे माहीत असणार्‍या पाकिस्तानने सातत्याने भारतात घातपाती कारवाया चालू ठेवल्या आहेत. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने गाझियाबादमध्ये आणि संपूर्ण देशात आणखीन किती जणांचे इमान विकत घेतले आहे, हे भविष्यात उघड होईलच. पण, या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण किती सजग राहणे आवश्यक आहे, हेसुद्धा यातून अधोरेखित होते.

उत्तर प्रदेशातील भोवापूर येथील तरुण रेल्वे स्थानके आणि लष्करीतळांचे फोटो आणि व्हिडिओ काढून परदेशात पाठवत असल्याच्या इशार्‍यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यानंतर तपासात कित्येक धक्कादायक गोष्टीही आढळल्या. या तरुणांच्या फोनमध्ये लष्कराशी संबंधित व्हिडिओ, फोटो, टॅग केलेली ठिकाणे आणि उपकरणांनी भरलेल्या गॅलरी होत्या. तसेच रेल्वे नोड्स आणि छावणीच्या सीमाही सापडल्या. ही केवळ हौशी फोटोग्राफी नाही; तर गंभीर पूर्वनियोजित कट आहे, यात शंका नाही. त्यातच या सगळ्या कटाचे धागेदोरे थेट पाकिस्तानशी जोडलेले असल्याचे तपास यंत्रणांना लक्षात आल्यामुळे, या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

पाकिस्तानने भारतात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घुसून थेट सामान्य नागरिकांना आपले एजंट बनवण्यात यश मिळवले आहे. केवळ पाच ते २० हजार रुपये देऊन भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो, व्हिडिओ त्यांनी गाझियाबादच्या तरुणांकडून हस्तगत केले आहेत. या तरुणांपैकी अनेक मुले अल्पवयीन असून, ती पैशाच्या आमिषाला बळी पडली. काहीजण पूर्वनियोजित कटात सहभागी असून, गेल्या दोन वर्षांपासून हे सर्व पद्धतशीरपणे सुरु होते. पण, कदाचित ते हिमगनाचे टोक असून, पडद्याआड आणखी बरेच काही सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा खुलासा भविष्यात होईलच.

विशेष तपास पथकाने दि. १७ मार्चपासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. यात मग सुहेल मलिक, नौशाद अली आणि समीर ऊर्फ शूटर हे सर्व पाकिस्तानमधून कार्यरत असल्याचे उघडकीस आले. त्यांनी भारतीयांना सोशल मीडिया आणि एनस्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे जसे की- ‘व्हॉट्सअ‍ॅप’ याद्वारे आपल्या ‘मिशन’मध्ये ‘भरती’ करून घेतले. कोणत्या रेल्वे स्थानकांवर चित्रीकरण करायचे, कोणत्या परिसराचा नकाशा तयार करायचा, कोणत्या कोनातून चित्रीकरण करायचे आणि हे सर्व केव्हा पाठवायचे, यांसारख्या सूचना अगदी स्पष्टपणे दिल्या जात होत्या. प्रत्येक ‘असाईन्मेंट’साठी पाच हजार ते २० हजार रुपयांपर्यंत मोबदलाही या तरुणांना पाकिस्तानकडून दिला जात होता.

सध्या आपल्या समाजात जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. फोटो काढणे आणि व्हिडिओ घेणे याशिवाय ज्यांचा एकही दिवस जात नाही, अशी आपल्याकडे मोठी जनता. त्यामुळे केवळ एका फोटो काढण्याने जर पाच हजार मिळू शकत असतील, तेपण साध्या रेल्वे स्थानकाचा; तर कुणीही एका झटक्यात हे काम करायला तयार होईल. मात्र, त्याचे गांभीर्य किंवा परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार करू शकणारे आणि करू न शकणारे, असे दोन्हीप्रकारचे भारताचे नागरिक यात आहेत.

यातील अटक केलेल्या सहा आरोपींपैकी चारजण यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे जाऊन आले होते. तेथे त्यांनी पाकिस्तानला संवेदनशील गुप्त माहिती पाठवली होती. सुरक्षा यंत्रणांच्या मते, जम्मू-काश्मीरमधील दुसर्‍या मोठ्या हल्ल्याच्या तयारीचा हा एक भाग होता. ही मोठ्या हल्ल्याची तयारी होती. या नेटवर्कला दिल्ली-जम्मू रेल्वे कॉरिडोरवर सौरऊर्जेवर काम करणारे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवायचे होते. याद्वारे पाकिस्तानला सर्व लष्करी हालचाली थेट बघता येणार होत्या. धक्कादायक म्हणजे, दिल्ली लष्करी छावणी आणि हरियाणातील सोनिपत येथे असे कॅमेरे आधीच सुरू केल्याचे आढळले. आता त्याचाही फॉरेन्सिक तपास सुरु आहे. अशाच प्रकारची देशभरातील ५० ठिकाणांची यादी असल्याचे आढळले आहे. जर नेटवर्क त्या संख्येपर्यंत पोहोचले असते, तर सैन्याच्या हालचालींवर सतत पाळत ठेवता आली असती, असे तपासकर्त्यांचे मत आहे. या मॉड्यूलने फोटो, व्हिडिओ आणि ‘जीपीएस डेटा’ थेट पाठवण्यासाठी परदेशी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला. यासाठीचे ऑनलाईन प्रशिक्षण त्यांना परदेशातून मिळत होते आणि ४५०हून अधिक फाईल्स पाकिस्तानशी संबंधित असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे.

मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात काम करणारे, ‘सीसीटीव्ही’चे काम करणारे आणि नेटवर्किंगचे मूलभूत कौशल्य असलेले, विशेषत: तांत्रिक कौशल्ये असलेल्या तरुणांना मुख्यत्वे हेरुन, भरती करून घेण्याला प्राधान्य दिले गेले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तरुणांनाही यात सामील केले गेले आणि एवढेच नाही तर संशय येऊ नये म्हणून महिला व अल्पवयीनांचाही या कामासाठी प्याद्यांसारखा वापर केला गेला. तसेच ‘ओटीपी’ आणि सीमकार्डचा पुरवठा करणार्‍या रॅकेटचा तपास करण्यासाठी कारवाई सुरू आहे. यात भारतीय ‘ओटीपी’ परदेशात पाठवले, ज्यामुळे परदेशी व्यक्तींना भारतीय क्रमांकांवरून व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडिया खाती चालवणे शक्य झाले. सीमकार्ड, बनावट ओळखपत्रे आणि एजंटमार्फत आधीच सक्रिय केलेली सीमकार्ड्स वापरली गेली. यासाठी ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात होती. पैशांची देवाणघेवाण ‘यूपीआय’द्वारे होत होती; परंतु ती वैयक्तिक खात्यांमध्ये होत नव्हती. हा निधी लहान दुकानांमार्फत वळवला जात होता आणि रोखरक्कम काढताना फारसा संशय येणार नाही, अशाप्रकारे हे षड्यंत्र पडद्याआड रचले जात होते.

दि. २० मार्च रोजी ‘एसआयटी’ने पाच अल्पवयीन मुलांसह आणखी नऊजणांना अटक करून ताब्यात घेतले. या गटाचे संबंध उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि अगदी नेपाळपर्यंत असल्याचे उघडकीस आले आहे. दि. २२ मार्च रोजी नौशाद अली ऊर्फ लालू याला फरिदाबादमध्ये अटक करण्यात आली. तो एका पेट्रोल पंपावर टायर पंचर दुरुस्तीचे दुकान चालवत होता. तसेच पोलिसांनी मथुरेतील ‘ई-रिक्षा’ चालक असणारी अल्पवयीन मुलगी मीरा हिला ताब्यात घेतले. तिला यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शस्त्रपुरवठा प्रकरणात अटक केली होती. पाकिस्तानातील सरफराज ऊर्फ सरदार याच्या संपर्कात ती असून, तिने अनेक महिलांची भरती केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. इराम ऊर्फ महक ही प्रमुख भरती करणार्‍यांपैकी एक असल्याचे समजते आणि तिला कौशांबी येथे अटक केली गेली. समीर ऊर्फ ‘शूटर’ अद्यापही बेपत्ता असून, पाकिस्तानस्थित या मॉड्यूलचा तो मुख्य सूत्रधार असल्याचा तपास यंत्रणांचा कयास आहे. ‘एनआयए’, ‘एटीएस’ आणि उत्तर प्रदेश, दिल्ली व हरियाणा येथील पोलीस या शोधमोहिमेत समन्वयाने काम करत आहेत. देशात मोठा घटक हल्ला करण्याचे हे पूर्वनियोजन असू शकते, यात शंका नाही.

आपण भारतीय नागरिक...

गेल्या दशकभरात आणि विशेषत: ‘लॉकडाऊन’च्या काळात सोशल मीडियाने सामान्य नागरिकांच्या जीवनाचा अक्षरश: ताबा घेतला आहे. सोशल मीडियाचा वापर वाढला; पण त्यातील धोके समजून घेऊन पुढे जाणे, सावध राहणे, हेच अनेकांना माहीत नाही. सोशल मीडिया झटपट प्रसिद्धी मिळवून देऊ शकते. यामुळे ‘इन्स्टा’वर तरुणाईची रिल्स किळसवाण्या प्रकारांची हद्दही आता पार करू लागली. अनेकजण या ‘व्हायरल’ प्रसिद्धीच्या नादात वास्तविक जीवनात उद्ध्वस्त झाले. आभासी जग वास्तविक जगाला प्रभावित करणारे सगळ्यात प्रभावी माध्यम बनले आहे, ही वस्तुस्थिती. अगदी सामान्य लोकांसाठी फोटो काढणे आणि सोशल मीडियावर टाकणे, यात काहीच गैर वाटत नाही किंवा त्यातील संभाव्य धोके त्यांना माहीत नाहीत आणि काही तर माहिती असूनही त्याकडे सर्रास कानाडोळा करतात. आपल्याकडे हॉटेलिंगनंतर फॅमिली फोटो पोस्ट करणे, ही जणू एक परंपरा झाली आहे आणि विशेष म्हणजे, यासाठी कुणीही अगदी हॉटेलमधील कर्मचारी, वॉचमनपासून अगदी अनोळखी व्यक्तीसुद्धा फोटो काढून द्यायला एका पायावर (फुकटात) तयार असते. त्यामुळे एखाद्या जागेचा फोटो किती गंभीर आणि संवेदनशील असू शकतो, याविषयी जनजागृती करण्याची वेळ आलेली आहे.

आपल्या देशातील एखाद्या जागेचे फोटो काढण्यासाठी कुणी पैसे देत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. नागरिक म्हणून सजग होणे आणि त्यासाठी नागरी कर्तव्याप्रती बांधिलकी जोपासण्याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे. दिल्लीनंतर जालंधर येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, हेसुद्धा तपासातून समोर आले आहे. हे मॉड्यूल उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि नेपाळमधील दहशतवाद्यांच्या ‘स्लीपर सेल’शी जोडलेले आहे. म्हणूनच, नागरिकांना सजगतेसाठी प्रशिक्षण देण्याची आज नितांत गरज आहे. तसेच पुनःपुन्हा ही गरज अधोरेखित करीत राहणे, हे देखील क्रमप्राप्त!


- रूपाली कुलकर्णी-भुसारी
(लेखिका ‘एकता’ मासिकाच्या संपादक असून दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत.)




Powered By Sangraha 9.0