चीनची ‘लष्करी तंत्रज्ञान महासत्ता’ म्हणून असलेली प्रतिमा आता पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडच्या काही संघर्षांमध्ये चीनने पुरवलेली संरक्षण यंत्रणा अपयशी ठरल्याने त्यातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. बीजिंगने प्रगत आणि विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध केलेली हवाई संरक्षण उपकरणे पाकिस्तान, व्हेनेझुएला आणि अलीकडे इराणमधील मोठ्या लष्करी कारवाया रोखण्यात अपयशी ठरली. चिनी यंत्रणा जाहिरात केल्याप्रमाणे तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या शत्रूंसमोर टिकत नाही, हेच यावरुन सिद्ध होते.
अनेक वर्षांपासून चिनी नेत्यांनी लष्करी संचलन आणि संरक्षण प्रदर्शनांमध्ये ‘एचक्यू-9बी’ ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आणि संबंधित ‘रडार’ तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले होते. ही प्रणाली एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा मागोवा घेण्यास आणि त्यांचा नाश करण्यास सक्षम असलेली एक शक्तिशाली लांब पल्ल्याची संरक्षण ढाल म्हणून विकली गेली. मात्र, अलीकडच्या लष्करी कारवायांनी या दाव्यांबद्दल शंका निर्माण केली आहे.
‘एचक्यू-9बी’, ज्याला ‘रेड फ्लॅग 9’ म्हणूनही ओळखले जाते, ही चीनची प्रमुख लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली मानली जाते. ‘चायना एरोस्पेस सायन्स ॲण्ड इंडस्ट्री कॉर्पोरेशन’ने विकसित केलेली ही प्रणाली अमेरिकेची ‘पेट्रियट’ आणि रशियाची ‘एस-300’ या यंत्रणांकडून प्रेरणा घेऊन तयार केली आहे. या प्रणालीमध्ये प्रगत रडार ट्रॅकिंग, इलेक्ट्रॉनिक काऊंटरमेझर्स आणि एकाच वेळी अनेक हवाई लक्ष्यांशी लढा देण्याची क्षमता आहे. हे 260 किमीपर्यंतच्या पल्ल्यात आणि अंदाजे 50 किमी उंचीवर विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि काही ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी डिझाईन केलेली आहे.
चीनने बीजिंग, तिबेट आणि दक्षिण चीन समुद्रासह महत्त्वाच्या ठिकाणी ही प्रणाली तैनात केली आहे. तरीही, चीनबाहेर या यंत्रणेच्या रणांगणावरील कामगिरीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्यक्ष युद्धात त्यांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. ते अंध, बहिरे आणि मूके ठरले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान धोक्याचे संकेत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चिनी यंत्रणांबद्दलची चिंता पहिल्यांदा वाढली. या मोहिमेदरम्यान, भारतीय दलांनी सीमेपलीकडील दहशतवादी आणि लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून अचूक हल्ले केले. लष्करी मूल्यांकनानुसार, पाकिस्तानने तैनात केलेली चिनी हवाई संरक्षण यंत्रणा येणारे धोके रोखण्यासाठी धडपडत होती. समस्या ‘एचक्यू-9’ आणि ‘एचक्यू-16’सारख्या चिनी प्लॅटफॉर्मशी संबंधित होत्या, भारतीय क्षेपणास्त्रे आणि विमानांनी वारंवार या संरक्षण ढालीला भेदले.
भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये चिनी क्षेपणास्त्रांचा सलग चार दिवस पराभव झाला. ते कशाचाही बचाव करण्यास, नाश करण्यास किंवा मागोवा घेण्यास असमर्थ ठरले. पाकिस्तान हा चीनचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र ग्राहक असून, तो आपल्या लष्करी आयातीपैकी सुमारे 82 टक्के वाटा बीजिंगकडून घेतो. त्यामुळे या घटनेने चिनी संरक्षण उपकरणांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हेनेझुएला मोहिमेने रडारमधील त्रुटी उघड केल्या
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या नाट्यमय लष्करी कारवाईदरम्यान चिनी संरक्षण तंत्रज्ञानाबद्दलच्या शंका अधिक गडद झाल्या. या मोहिमेदरम्यान, अमेरिकन सैन्याने स्टेल्थ विमाने, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्लॅटफॉर्म आणि विशेष दलांचा समावेश असलेली एक मोठी मोहीम राबवली. या मोहिमेत कोणताही अमेरिकन बळी न जाता, व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना पकडण्यात यश आले. या मोहिमेने व्हेनेझुएलाच्या रडार आणि हवाई संरक्षण नेटवर्कमधील कच्चे दुवे उघड केले, ज्यामध्ये चीनने पुरवलेली ‘जेवाय-27ए’सारखी ‘अल वॉर्निंग रडार सिस्टम’ समाविष्ट होती. चीनची ‘जेवाय-27’ रडार प्रणाली 280 ते 390 किमी अंतरावरील लक्ष्यांची ओळख पटवण्यास आणि स्कॅन करण्यास सक्षम आहे. हे रडार विशेषतः वेगवान, सुपरसॉनिक ‘एफ-22’ आणि एफ-35’ फायटर जेट्सचा शोध घेण्यासाठी ओळखले जाते.
मात्र, ही रडार यंत्रणा मोहिमेत सामील असलेल्या विमानांचा शोध घेण्यास अपयशी ठरली. जेव्हा मादुरो यांना व्हेनेझुएलामध्ये पकडण्यात आले, तेव्हा प्रत्यक्ष युद्धात चिनी रडार राष्ट्रीय मानहानी आणि लज्जेचा विषय ठरला. व्हेनेझुएलाच्या हवाई हद्दीत घुसलेल्या 150 विमानांपैकी एकाचाही शोध घेण्यात ते अपयशी ठरले. या घटनेने बीजिंगच्या संरक्षण उद्योगाला मोठा धक्का बसला. कारण, ‘जेवाय-27ए’ रडार स्टेल्थ विमानांचा शोध घेण्यास सक्षम असल्याचा प्रचार केला गेला होता.
इराणवरील हल्ल्यांमुळे छाननी अधिक तीव्र
इराणने आपल्या अणू केंद्र आणि लष्करी तळांच्या संरक्षणासाठी चिनी रडार आणि ‘एचक्यू’ मालिकेतील क्षेपणास्त्र प्रणाली मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या आहेत. मात्र, अमेरिकन आणि पाश्चिमात्य हवाई हल्ल्यांपुढे या प्रणाली हतबल ठरल्या.
प्रतिसाद कालावधी : आधुनिक युद्धात सेकंदाला महत्त्व असते. इराणमधील संघर्षात चिनी हवाई संरक्षण प्रणालीचा ‘रिस्पॉन्सटाईम’ खूप संथ असल्याचे आढळले. शत्रूचे क्षेपणास्त्र लक्ष्यावर आदळल्यानंतर चिनी यंत्रणेला त्याची जाणीव होत असे.
मोठे नुकसान : अमेरिकन हल्ल्यांना रोखण्यात अपयश आल्याने इराणच्या महत्त्वाच्या तळांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे पश्चिम आशियातील देशांमध्ये चिनी शस्त्रांच्या प्रभावीपणाबद्दल भीती आणि साशंकता पसरली आहे.
चीनशी संबंधित हवाई संरक्षण क्षमतेची सर्वात अलीकडील इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या मोठ्या हल्ल्यांदरम्यान पोलखोल झाली. इराणमधील 20पेक्षा जास्त प्रांतांमधील लष्करी पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक प्रतिष्ठानांना लक्ष्य करून समन्वित हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामुळे व्यापक नुकसान झाले आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा थरांमध्ये (लेयर्स) काम करण्यासाठी तयार केली होती. लांब पल्ल्याचा स्तर चिनी ‘एचक्यू-9बी’ प्रणालीवर आधारित होता, ज्याला रशियन ‘एस-300पीएमयू-2’ आणि इराणच्या स्वदेशी ‘बावर-373’ प्लॅटफॉर्मचा पाठिंबा होता. ‘खोरदाद-15’ आणि ‘राद’सारख्या मध्यम पल्ल्याच्या प्रणाली उर्वरित त्रुटी भरून काढतील अशी अपेक्षा होती; तर ‘तोर-एम2’ आणि ‘पान्ट्सिर-एस1’सह कमी पल्ल्याच्या प्रणाली कमी उंचीवरून येणारे धोके रोखण्यासाठी होत्या. ही बहुस्तरीय संरक्षण रचना असूनही, हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले.
इराणमधील ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’दरम्यान, चिनी ‘एचक्यू-9बी’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा पुन्हा एकदा पराभव झाला. आधुनिक हवाई मोहिमा अनेकदा ‘सॅच्युरेशन टॅक्टिक्स’वर अवलंबून असतात, ज्यामध्ये डझनभर किंवा शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन एकाच वेळी सोडले जातात. अशा परिस्थितीत प्रगत हवाई संरक्षण यंत्रणांनाही संघर्ष करावा लागू शकतो. दुसरी शक्यता अशी आहे की, मुख्य हल्ला सुरू होण्यापूवच इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर ऑपरेशन्स आणि स्टेल्थ विमानांनी रडार यंत्रणा आणि कमांड नोड्स निकामी केले.
निर्यात विश्वासार्हतेवर दबाव
चीन हा जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र निर्यातदार असून आशिया, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि लॅटिन अमेरिकेत लष्करी उपकरणांची विक्री करत आहे. पाकिस्तान, इराण, इजिप्त आणि अझरबैजान यांसारख्या देशांनी अलीकडच्या वर्षांत चिनी हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे.
काही वर्षांपूव इजिप्त, अझरबैजान, पाकिस्तान आणि इराण यांसारख्या देशांनी चिनी हवाई संरक्षण यंत्रणेवर अब्जावधी खर्च केले होते; आज त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. अनेक खरेदीदारांसाठी, चिनी उपकरणांची निवड करण्यात कमी किंमत हा एक मोठा घटक होता. चिनी प्रणाली ‘पेट्रियट’ किंवा प्रगत युरोपियन प्लॅटफॉर्मसारख्या पाश्चात्त्य पर्यायांपेक्षा स्वस्त असतात. परंतु, कमी किंमत विश्वासार्हता आणि तांत्रिक परिपक्वतेचा बळी देऊन मिळते.
तैवानसाठी परिणाम
पाकिस्तान, व्हेनेझुएला आणि इराणमधील घटनांनी तैवानलाही आशेचा किरण दाखवला आहे. चीनने आपली विश्वासार्हता गमावली आहे आणि त्याची शस्त्रास्त्रांची स्पर्धा आता तितकी भीतिदायक राहिलेली नाही. अमेरिकेच्या तुलनेत चिनी युद्ध तंत्रज्ञान आणि रडार अविश्वसनीय, असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
पनामामध्ये जनरल मॅन्युएल नोरिएगाला पकडण्यासाठी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांना अनेक दिवस लागले होते. ओसामा बिन लादेनचा शोध घेऊन त्याचा खात्मा करण्यासाठी जवळपास दहा वर्षे लागली. परंतु, ‘ऑपरेशन ब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ आणि ‘एपिक फ्युरी’ने एक नवीन मानक प्रस्थापित केले आहे. इराणने निर्माण केलेल्या दहशतवादी धोक्याविरुद्ध अनेक युरोपियन आणि अरब देशांना एकत्र आणले आहे.
बदलता जागतिक शक्ती समतोल
चिनी संरक्षण यंत्रणांच्या प्रभाव क्षमतेची चर्चा आगामी काळात अधिक तीव्र होणार आहे. या प्रणालींच्या रणांगणावरील कामगिरीमुळे चीनचा संरक्षण उद्योग अभूतपूर्व छाननीच्या कचाट्यात सापडला आहे. जगात विविध भागांमध्ये चाललेली युद्धे भारताकरिता एक संधी आहे. भारताची शस्त्रे युद्धजन्य परिस्थितीमध्ये चीनपेक्षा जास्त चांगली काम करतात, हे आपण दाखवून देऊ शकतो; याकरिता भारताची शस्त्रे आणि दारुगोळ्याची निर्यात वेगाने वाढवण्याची गरज आहे.