चित्रविश्र्वातील 'सहयोग' पर्व

28 Mar 2026 15:31:46

नव्या चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या ‘सहयोग आर्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त एका विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनात दि. २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधीमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात हे प्रदर्शन रसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे, नागरी सेवा तथा पोलीस दलात कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेली चित्रे इथे प्रदर्शनासाठी तथा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्नाचा काही भाग मुंबई पोलीस कर्मचार्‍यांच्या कल्याण निधीसाठी दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने या प्रदर्शनाचा मागोवा घेणारा लेख...

भारतीय तत्त्वज्ञानामध्ये भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग यांना अनन्यसाधारण महत्त्व. हा विचार केवळ तत्त्वांच्या पातळीवर न राहता, माणसांना जीवनाच्या सर्व स्तरांमध्ये उत्कर्षासाठी मदत करणारा विचार आहे. मात्र, या पलीकडे समाज म्हणून उन्नतीसाठी आवश्यक असलेला विचार ज्या एका घटकामुळे साध्य होतो, तो विचार म्हणजे ‘सहयोगा’चा विचार. कुठल्याही समाजाला किंवा राष्ट्राला प्रगतिपथावर आगेकूच करायची असेल, तर समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊनच पुढे जावे लागेल. सहयोगाचा विचार हा नव्या आणि जुन्या ध्रुवांना जोडणारा सेतू आहे. याच प्रेरणेतून ‘सहयोग आर्ट फाऊंडेशन’ची स्थापना दहा वर्षांपूर्वी करण्यात आली.
मागच्या काही काळामध्ये मुंबईत अनेक खासगी कलादालने उदयाला आली. कलेच्या प्रांतातील विविधता जपण्यासाठी, कलाकारांना बळ मिळावे यासाठी अनेक माणसे पुढे आली. दहा वर्षांपूर्वी असाच प्रयत्न सत्येंद्र राणे यांच्या ‘सहयोग आर्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून करण्यात आला, ज्याला काळाच्या ओघात लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

नावीन्य आणि विविधता या दोन गोष्टी नसतील, तर कुठलीच कला प्रवाही राहत नाही. चित्रकलेच्या बाबतीत तर याचे वास्तव दिवसेंदिवस कठोर होत चालले आहे. एका बाजूला जुन्या तटबंदी मोडून, नव्या आकाशाकडे झेप घेण्यासाठी चित्रकारांना सातत्याने नवे प्रयोग करावे लागत आहेत; तर दुसर्‍या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आक्रमणासमोर खर्‍या अर्थाने कलेतील जिवंतपणा टिकवून ठेवण्याचे आव्हानसुद्धा कलाकारांपुढे आहे. ‘सहयोग’चे हे चित्रप्रदर्शन याच जिवंतपणाची रसरशीत अनुभूती आपल्या समोर ठेवते. या चित्रप्रदर्शनात सर्वप्रथम आपल्याला भेटीला येतो, तो निसर्ग. गावखेड्यांचे चित्रण लक्ष वेधून घेणारे आणि डोळ्यांना विश्रांती देणारे आहे. मग या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला शहरे भेटत जातात. रोज कोट्यवधींचा भार झेलणारी मुंबई आपसूकच कोर्‍या कागदावर शांत निजलेली आहे, असे आपल्याला या चित्रांतून दिसून येते.

मुंबईच्या स्वभावात शांतता नाही, आहे तो फक्त वेग आणि परिवर्तन. तिथेच दुसर्‍या बाजूला गणेश हिरे यांच्यासारखा चित्रकार आपल्याला ओळख करून देतो, युरोपातील एका संथलयीत चालणार्‍या शहराची! या चित्रसृष्टीची अनुभूती घेताना, देवी-देवतांच्या चित्रांनी मनाचा ठाव घेतला नाही, तरच नवल. कमल अहमद आपल्या चित्रांमधून ज्यावेळी ही चित्रे काढतात, त्यावेळी प्रथमदर्शनी राजस्थानी चित्रशैलीतील ‘पिचवाई’ या प्रकाराची आठवण होते. आकार आणि रेषांच्या पातळीवर असलेला नेमकेपणा हा त्या-त्या चित्राच्या सौंदर्यामध्ये भर घालतोच. मात्र, त्याचबरोबर कलाकाराची दृष्टी कशी घडते आणि व्यापक होते, याचेदेखील हे एक उत्तम उदाहरण आहे. या चित्रप्रदर्शनात मांडण्यात आलेली अमूर्त चित्रे स्थळ-काळाच्या अवकाशाला कवेत घेणारी आहेत. चित्रविश्वाला नवा अवकाश मिळवून देणारी आहेत.

या प्रदर्शनाबद्दल आपला अनुभव सांगताना पोलीस निरीक्षक मौसमी सुभाष पाटील म्हणाल्या की, "लहानपणापासूनच चित्रकला माझ्या आयुष्याचा भाग आहे. छंद म्हणून सुरू झालेली ही गोष्ट आता मला आनंद आणि मानसिक समतोल देणारा आधार बनली आहे. हे माझे पहिले प्रदर्शन आहे आणि गणवेशाच्या पलीकडील माझी वैयक्तिक ओळख लोकांसमोर मांडण्याची ही एक खास संधी आहे. चित्रकला माझ्यासाठी ताण कमी करणारी आहे. मी तणावात किंवा खिन्न असताना ती मला शांत करते आणि आनंदी असतानाही मी चित्र काढते.” त्या पुढे म्हणाल्या की, "आमच्यासारख्या जबाबदारीच्या कामांमध्ये सर्जनशीलतेसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आम्हाला आमच्या २४/७ कामाच्या धावपळीतून थोडा वेळ दूर जाऊन पुन्हा सकारात्मक ऊर्जेसह कामावर परतता येते. ” महाराष्ट्र कॅडरच्या ‘आयएएस’ अधिकारी आणि ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’, मुंबईच्या संचालक निधी चौधरी म्हणाल्या, " ‘सहयोग’च्या १०व्या आवृत्तीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कला ही व्यवसाय किंवा पदांच्या मर्यादांपलीकडे जाते. ती आपल्याला जोडते आणि अनेकदा शब्दांत व्यक्त न होणार्‍या भावना मांडण्याची संधी देते. या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील लोक एकत्र येत आहेत, हे कलेच्या एकत्र आणणार्‍या शक्तीचे उदाहरण आहे. ‘सहयोग आर्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून साकारण्यात आलेला हा प्रयोग अभिनव आणि दिशादर्शक म्हणावा लागेल.”

मुंबईमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे काम चांगले आहे. मात्र, त्यांना गॅलरी उपलब्ध होत नाही. बर्‍याचदा काही गॅलरीजमध्ये प्रस्थापित चित्रकारांचीच प्रदर्शने वारंवार आपल्याला बघायला मिळतात. मात्र, खेड्यापाड्यातून आपली कला लोकांसमोर मांडण्यासाठी जे चित्रकार येतात, त्यांना दिशा सापडत नाही. याच कारणासाठी अनुभवी चित्रकार आणि नवे चित्रकार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सहयोग आर्ट फाऊंडेशन’ची निर्मिती करण्यात आली. यामुळे झाले असे की, चित्रकलेच्या विश्वातील बारकावे यामुळे त्यांना कळले. त्याचबरोबर, मागच्या दहा वर्षांमध्ये असे अनेक नवीन कलाकार यामुळे प्रकाशझोतात आले, त्यांच्या कार्याची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली. बर्‍याचदा शासन-प्रशासनातील व्यक्तींकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र, त्यांच्यातसुद्धा एक कलाकार, चित्रकार दडलेला असतो. या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्यातील कलाकाराचे काम यावेळी प्रेक्षकांना बघता येणार आहे.

- सत्येंद्र राणे, संस्थापक, सहयोग आर्ट फाऊंडेशन

Powered By Sangraha 9.0