अफवा पेरून अराजक माजवण्याचा विरोधकांचा कट; नवनाथ बन

28 Mar 2026 17:38:49
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) इराण इस्रायल युद्धाच्या काळात भारतात कालपर्यंत गॅस, इंधन टंचाई, लॉकडाऊन लावणार अशा खोट्यानाट्या अफवा पेरून अराजक माजवण्याचा कट संजय राऊत आणि विरोधक रचत होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल असा बडगा उगारल्यानंतर संजय राऊतांचे डोके अचानक ठिकाणावर आले आणि आज त्यांनी अचानक घूमजाव केले. इराणमुळे देशात इंधन पुरवठा सुरळीत असल्याची कबुली दिली, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केली.
 
नवनाथ बन म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात १४० कोटी जनतेची 'टीम इंडिया' ही भारतीयांच्या विकासासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज आहे. संजय राऊत आणि उबाठा गटाचा संघ मात्र पाकधार्जिणी भूमिका घेत 'टीम पाकिस्तान' म्हणून सदैव भारतविरोधी आणि देशाच्या विकासासाठी झटणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या टीम इंडीया विरोधात कटकारस्थान करत युद्ध लढतो."
 
"इराण इस्त्रायल युद्धाच्या काळात अनेक देश संकटात असताना, महागाईने कळस गाठला असताना, इंधन आणि गॅस पुरवठा खंडित असताना भारतात मात्र, त्याची झळ बसली नाही. पंतप्रधान मोदींच्या समर्थ नेतृत्वामुळेच हे शक्य झाले. तसेच या युद्धाच्या काळातदेखील घाणेरडे राजकारण करत राऊत, उबाठा गट आणि विरोधक सातत्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार खंबीरपणे राज्याच्या सुरक्षेसाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी झटत आहे," असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा : अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज जाहीर
 
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी भोंदुबाबाच्या आश्रमाला
 
"भोंदूबाबा खरातला पाठीशी घालून त्याच्या आश्रमाला शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवण्याचा शासन आदेश ज्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला त्यांना याप्रकरणी बोलण्याचा अधिकार नाही. आश्रमाला पाणी देण्याचा आदेश निघाला तेव्हा राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख होते आणि जे ४० आमदार खरात भोंदूबाबाच्या आश्रमात जात होते त्यामध्ये मिलिंद नार्वेकर देखील होते."
 
हे वाचलत का ? - भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
विरोधकांनी जाती धर्मात वाद निर्माण करू नये
 
"युद्धाच्या काळात भेदभाव न करता सर्व धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे. त्यामुळे राऊत आणि विरोधकांनी नाहक जाती धर्मात वाद निर्माण करू नये. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार भेदभाव विरहित जशा विकासाच्या योजना तळागाळात गरजूंपर्यंत पोहोचत आहेत, तसेच आत्ताच्या काळात केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याचे काम करत आहे," असेही नवनाथ बन म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0