अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज जाहीर

28 Mar 2026 17:18:59
Flood Relief Package
 
मुंबई : (Flood Relief Package) राज्यातील जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
 
जून ते सप्टेबर २०२५ या कालावधीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली आहे. अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे पूरग्रस्त भागात पशुधन मृत्यूमुखी पडले आणि वाहून गेले आहेत. यामुळे बाधित क्षेत्रातील पशुपालकांना विशेष मदत पॅकेज आणि सवलती जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाचे निकष शिथिल करून सर्व मृत किंवा बेपत्ता पशुधनास तसेच गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीचे दर जाहीर करण्यात आले आहेत.
 
मदतीचे दर पुढीलप्रमाणे -
 
गोठा - ३ हजार रु. प्रति गोठा
दुधाळ जनावरे - ३७,५०० रु. प्रति जनावर
ओढकाम करणारी जनावरे - ३२,००० रु. प्रति जनावर
लहान जनावरे - २०,००० रु. प्रति जनावर
शेळी/मेंढी - ४,००० रु. प्रति जनावर
कुक्कुटपालन - १०० रु. प्रति कोंबडी
 
हेही वाचा : भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
पात्रतेचे निकष
 
अल्प, अत्यल्प, भूधारक, तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व आपदाग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र असतील. प्रत्येक पशुपालकांना किमान ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत किंवा बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र असतील. तसेच कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे आणि कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी १० हजार रुपयांच्या मर्यादेत मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील.
 
हे वाचलत का? - Aviation Rules: अजित दादांच्या विमान दुर्घटनेनंतर VVIP विमानप्रवासासाठी नवे कडक नियम; आता पायलटचा निर्णय...
 
मदतीसाठी अपात्र कोण असणार?
 
विमाकृत पशुधनास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली असल्यास त्यांना शासकीय मदत मिळणार नाही. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी आणि पोलीस पाटील यांची राहील.
 
मृत किंवा बेपत्ता पशुधनाची नोंद करणे आवश्यक
 
अतिवृष्टीमध्ये मृत पावलेल्या किंवा वाहून गेलेल्या पशुधनाची भारत पशुधन अॅप, २१ वी पशुगणनेतील नोंद, लसीकरण नोंदवही, ऑनलाईन नोंद, विमा कंपनीकडील नोंद किंवा दुग्ध अनुदान योजनेतील नोंद यापैकी एका ठिकाणी नोंद करणे अनिवार्य असेल. 
 
 
Powered By Sangraha 9.0