अभिनेत्री नंदिता पाटकर ही मराठी सिनेविश्वातली एक गुणी अभिनेत्री. आपल्या साध्या-सरळ; पण तितक्याच प्रभावी अभिनयाने नंदिताने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. ‘आरजे’ म्हणून सुरु झालेला प्रवास ते नंतर ‘एलिझाबेथ एकादशी’ या गाजलेल्या चित्रपटातील नंदिताने साकारलेली आईची भूमिका, आजही प्रेक्षकांच्या स्मृतीत आहे. नुकतीच नंदिताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी खास बातचीत केली. त्याचाच हा संपादित अंश...
नाटक, मग ‘आरजे’ ते अभिनेत्री असा तुझा आजवरचा प्रवास. तेव्हा अभिनयाकडे नेमकी कधी पावले पडली?
खरं सांगू का, मी स्वतःला एक ‘अॅक्सिडेंटल अभिनेत्री’ समजते. कारण, या क्षेत्रात येण्याचा मी कधीच ठरवलेला निर्णय नव्हता. ही संधी माझ्याकडे आली आणि मला या क्षेत्रात काम करता येतेय, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. मी रुपारेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी होते आणि अनेकजण या महाविद्यालयात नाटकासाठी प्रवेश घेतात; पण माझा नाटकांशी फारसा संबंध नव्हता. तो शेवटच्या वर्षी, कॉलेज संपता-संपता आला आणि तिथूनच मला नाटकाची गोडी लागली. त्याच काळात माझी ओळख चेतन दातार यांच्याशी झाली, जे माझे गुरू आहेत. त्यांच्या सांगण्यावरून मी ‘आविष्कार थिएटर ग्रुप’मध्ये जाऊ लागले. तिथली कार्यशाळा आणि विजय तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती पाहून मी भारावून गेले. हळूहळू मी तिथे शिकले, रुळले आणि नाटक करू लागले. तरीही, या क्षेत्रात करिअर करायचे, असे कधी वाटले नव्हते. पदवी पूर्ण झाल्यानंतर मी एका दूरध्वनी सेवा केंद्रात नोकरी केली, नंतर एका खासगी कंपनीत काम सुरू केले. मी ‘ऑल इंडिया रेडिओ’साठी ‘आरजे’ म्हणूनही काम करीत होते. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी नाटक असा माझा दिवस छानपणे सुरू होता.
आताच तू ‘आविष्कार’चा उल्लेख केला. अनेक कलाकार तिथून घडून आज उत्तम स्थानावर पोहोचले आहेत, असे नेहमी ऐकायला मिळते. नेमके काय आहे ‘आविष्कार’चे वैशिष्ट्य?
मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मला ‘आविष्कार थिएटर ग्रुप’सारखी संस्था मिळाली आणि माझी सुरुवात तिथून झाली. प्रायोगिक नाटकांची परंपरा जपणार्या या संस्थेची उभारणी अरुण काकडे, सुलभा देशपांडे यांसारख्या दिग्गजांनी केली. नाटकाची आवड असलेली; पण नेमके काय करायचे, हे न कळणारे अनेक तरुण तिथे यायचे आणि ‘आविष्कार’ आमच्यासाठी एक शाळाच बनली. खरेतर ती आमचे ‘विद्यापीठ’ होती, जिथे नाटकाचे मूळ शिक्षण आणि भक्कम पाया घातला गेला. तिथूनच माझ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. एकामागोमाग एक नाटक करत असताना, नोकरीत मात्र हळूहळू मन रमेनासे झाले. जवळपास सात-आठ वर्षे नोकरी केल्यानंतर एक क्षण असा आला की, आता आपल्याला पूर्णवेळ या क्षेत्रात प्रयत्न करायला हवेत आणि मग मी नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.
‘एलिझाबेथ एकादशी’ या तुझ्या पहिलाच चित्रपटातील तू साकारलेली आईची भूमिका हीदेखील तितकेची लक्षवेधी ठरली. तेव्हा, या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी ‘आविष्कार’मध्ये नाटक करत असतानाच, नोकरी सोडून पूर्णवेळ रंगभूमीकडे वळले. त्याकाळात सुषमा देशपांडे यांचे ‘बये दार उघड’ हे संत स्त्रियांवर आधारित नाटक आम्ही करत होतो आणि त्याचे प्रयोग सुरू होते. अशाच एका प्रयोगाला परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी आले होते. काही दिवसांनी त्यांचा मला फोन आला, ‘एका चित्रपटासंबंधी भेटायला येशील का?’ असा समोरुन साधा प्रश्न. माझ्यासाठी तो पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मी ऑडिशनसाठी तयारी करूनच गेले.
पण, तिथे गेल्यावर वेगळेच घडले. त्यांनी ऑडिशन घेतलीच नाही. फक्त साडी नेसल्यावर मी कशी दिसते, हे त्यांना पाहायचे होते. मी विचारलेही, "माझी ऑडिशन नाही का?” तर ते हसून म्हणाले, नाही, "आम्ही तुझे नाटक पाहिले आहे” आणि अशा अगदी अनपेक्षित पद्धतीने माझ्या चित्रपट प्रवासाची सुरुवात झाली. पहिलाच चित्रपट आणि त्याला आता बारा वर्षे झाली. तरीही, प्रेक्षकांच्या मनात तो तितकाच जिवंत आहे, ही भावना खूप आनंद देणारी आहे. आजही जेव्हा त्या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा एक वेगळीच आपुलकी जाणवते. तो चित्रपट जितका साधा, तितकाच मनाला भिडणारा आहे आणि कदाचित म्हणूनच, तो आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
मराठी नाटकांना खरेच चांगले दिवस आले आहेत, असे सध्याचे सकारात्मक चित्र. याबद्दल तुमचा अनुभव काय आहे?
मला खूप आनंद होतोय की, नाटकाला पुन्हा चांगले दिवस येताना दिसत आहेत. ‘कोविड’च्या काळात सगळेच जणू थांबले होते, गती मंदावली होती. पण, आता हळूहळू सगळे पुन्हा रुळावर येतेय आणि प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहाकडे वळताना दिसतात. घरबसल्या मोबाईल आणि ‘ओटीटी’वर सगळे सहज उपलब्ध असल्यामुळे नाटकगृहात येणे कमी झाले होते. पण, आता ती सवय बदलत आहे. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. सध्या अनेक चांगली नाटके रंगभूमीवर येत आहेत. मी स्वतः ‘शेवग्याच्या शेंगा’ या गजेंद्र अहिरे यांच्या नाटकात काम करतेय. प्रयोगानंतर प्रेक्षक मुद्दाम थांबून भेटतात, नाटकाबद्दल बोलतात. खरेतर मराठी संस्कृतीत नाटक हे मूळ आहे. आपल्या सगळ्या कलांचे ते एक भक्कम पायाभूत माध्यम आहे.
वैयक्तिक आयुष्यात कधी खचल्यासारखे वाटते, निराशाही जाणवते. अशा वेळी प्रत्येकाकडे स्वतःला सावरायचा एक मंत्र असतो. नंदिता, तुमच्यासाठी तो मंत्र काय आहे?
मी नियमित ध्यान करते खूप वर्षांपासून. त्यामुळेच कदाचित मी स्वतःला अधिक शांत आणि स्थिर ठेवू शकते. मन शांत ठेवणे ही या प्रवासातली सगळ्यात मोठी ताकद आहे आणि त्यानेच मला इतकी वर्षे टिकून राहायला मदत केली. पूर्वीची मी आणि आताची मी, खूप बदल झाला आहे. आज मी अधिक स्थिर आहे, अधिक समजूतदार आहे आणि या सगळ्यात आजूबाजूच्या माणसांचा, आपल्या वर्तुळाचा खूप मोठा वाटा असतो, हेही तितकेच खरे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे, आपणही इतरांसाठी तसेच आधार देणारे, सकारात्मक ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व बनणे. कारण, चांगली माणसे फक्त शोधायची नसतात, तर स्वतःही तसे बनायचे असते.