मुंबई : (Devendra Fadnavis) भारताच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीमुळे खूप मोठी आव्हाने नाहीत. पुरवठ्याबाबत काही छोटी आव्हाने येतील, पण त्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करतो आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे पुरवठ्यावर होत असलेल्या परिणासंदर्भात ही चर्चा होती. जवळजवळ सगळ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्याचे कौतूक करत त्यांचे आभार मानले. आपल्याकडे पुरवठ्यामध्ये कमीत कमी व्यत्यय आलेला आहे. विशेषत: पेट्रोल-डिझेल सातत्याने मिळत आहे. सर्वांना घरगुती गॅस मिळतो आहे. कालपासून व्यावसायिक गॅसची ७० टक्क्यांपर्यंत मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांचा विचार करता सगळ्या देशांमध्ये काही ना काही व्यत्यय आला असून बऱ्याच गोष्टी बंद झाल्या आहेत. पण भारतात त्या झाल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील दीर्घकालीन रणनीती सांगितली."
हेही वाचा : Aviation Rules: अजित दादांच्या विमान दुर्घटनेनंतर VVIP विमानप्रवासासाठी नवे कडक नियम; आता पायलटचा निर्णय...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई
"काही लोक जाणीवपूर्वक आपल्या देशात संभ्रम पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही. अशा गोष्टी पसरवणारे एकप्रकारे देशद्रोह करत आहेत. त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. भारताने ही परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे या गोष्टींचा आपल्या जीवनावर जास्त परिणाम होणार नाही, असा मला विश्वास आहे. आता तरी भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या आपुर्तीमध्ये जास्त अडचणी येतील असे वाटत नाही. होर्मुझमधून मोठ्या प्रमाणात एलपीजी येतो. पण त्यालाही काही नियमांच्या आधारे परवानगी मिळत आहे. पुरवठा थोडा मंद असला तरी तो येतो आहे," असेही त्यांनी सांगितले.
हे वाचलत का? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या सहकार भवनचे उदघाटन
गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटीशर्ती शिथिल
"राज्यात मोठ्या प्रमाणात महानगर गॅस निगम लिमिटेड पाईपलाईन टाकण्याचे काम करत असून पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कालच एक जीआर काढून सगळ्या महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटीशर्ती शिथिल केल्या आहे. गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध असल्याने एलपीजीची आवश्यकता असणार नाही. शहरांवरचा एलपीजीचा भार कमी केल्यास भविष्यात अशी परिस्थिी उद्भवल्यास कुठलीही अडचण येणार नाही," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.