डिजिटल जगाचा अदृश्य पाया

28 Mar 2026 14:34:42

आज आपण इंटरनेटवर व्हिडिओ स्ट्रीमिंग, ईमेल पाठवणे, ‘क्लाऊड’वर अशा डिजिटल आठवणी साठवणे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे असे जे काही करतो, या सगळ्याच्या मागे ‘डेटा सेंटर’ शांतपणे, अविरतपणे कार्यरत असतात. २४ तास कार्यरत असलेली ही विशाल संरचना आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसली, तरी आधुनिक तंत्रज्ञान जगासाठी ती ‘ऑक्सिजन’सारखी अत्यावश्यक ठरली आहे. ‘एआय’च्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्राचा विस्तार अभूतपूर्व वेगाने होत असून, गुंतवणूकदारांसह सरकारेही आता याभोवती धोरणे आखत आहेत.

दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसर्‍या बुधवारी ‘आंतरराष्ट्रीय डेटा सेंटर दिन’ साजरा केला जातो. ‘७x२४ एक्सचेंज इंटरनॅशनल’ या संस्थेच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जात जातो. डेटा सेंटर उद्योगाबद्दल जनजागृती करणे आणि नव्या पिढीला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करणे, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना डेटा सेंटरचे महत्त्व व संधी याबाबत माहिती देणे, यावर भर दिला जातो.
डिजिटल सेवा, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि ‘एआय’चा वाढता वापर लक्षात घेता, डेटा सेंटरची गरज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या उपक्रमाचा उद्देश डेटा सेंटर कसे कार्य करतात, त्यांची भूमिका काय आहे आणि या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवणे, हा आहे. यामुळे कुशल मनुष्यबळाची निर्मिती आणि उद्योगाशी नव्या पिढीचे नाते मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.

‘जेएलएल’च्या २०२६च्या अहवालानुसार, २०२५ ते २०३० दरम्यान जागतिक डेटा सेंटर मार्केट दुप्पट होऊन सुमारे २०० गिगावॅट क्षमतेपर्यंत पोहोचू शकते. यासाठी सुमारे तीन ट्रिलियन डॉलर्स गुंतवणूक अपेक्षित आहे. ‘एआय’मुळे या क्षेत्रात दरवर्षी सुमारे १४ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे आणि २०३० पर्यंत अर्धे डेटा सेंटर ‘वर्कलोड एआय’ संबंधित असू शकते. भारतामध्येही या क्षेत्राची वाढ वेगाने होत आहे. २०२४ मध्ये भारताने एक गिगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला असून, २०२७ पर्यंत ही क्षमता १.८ गिगावॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. ‘५-जी’, ‘लाऊड’ आणि ‘एआय’मुळे २०३० पर्यंत आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये सरकारने विदेशी डेटा सेंटर कंपन्यांसाठी करसवलती जाहीर करून या क्षेत्राला सर्वार्थाने चालना दिली आहे.

डेटा सेंटर क्षेत्रात प्रगत इन्फ्रास्ट्रचरची गरज वाढत आहे. उच्च क्षमतेचे सर्व्हर, लिक्विड कूलिंगसारख्या नव्या तंत्रज्ञानांचा वापर आता आवश्यक झाला आहे. मात्र, तांत्रिक कौशल्य असलेले मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, ही मोठी अडचण आहे. ‘एआय’, ‘क्लाऊड’ आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांत प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर सायबर हल्ल्यांचा धोका वाढल्याने डेटा सेंटर अधिक सुरक्षित बनवणेही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. ‘झिरो ट्रस्ट मॉडेल’, मजबूत ओळख व्यवस्थापन आणि सतत निरीक्षण यांसारख्या उपाययोजना आवश्यक ठरत आहेत. ‘एआय’मुळे डेटा सेंटरची रचना आणि कार्यपद्धती पूर्णपणे बदलत आहे. आता पारंपरिक सर्व्हरऐवजी ‘एआय फॅक्टरी’सारखी उच्च क्षमतेची केंद्रे विकसित होत आहेत.

त्यामुळे आज डेटा सेंटर केवळ ‘बॅकएंड’ सुविधा राहिलेले नाहीत, तर डिजिटल अर्थव्यवस्थेचा ते कणा बनले आहेत. भारताकडे युवा मनुष्यबळ, वाढती डिजिटल अर्थव्यवस्था आणि सरकारी पाठबळ असल्यामुळे या क्षेत्रात मोठी झेप घेण्याची क्षमता आहे. मात्र, यासाठी कौशल्य विकास, शाश्वतता आणि सुरक्षा यांवर एकत्रितपणे काम करणे देखील तितकेच आवश्यक आहे. ‘आंतरराष्ट्रीय डेटा सेंटर दिन’ आपल्याला याच गोष्टीची जाणीव करून देतो की, डिजिटल जगाचा पाया आज या अदृश्य डेटा सेंटरमध्ये घडत आहे. म्हणूनच सध्याच्या युद्धकाळातही डेटा सेंटर्सना लक्ष्य केल्याचे प्रकार आखातात दिसून आले. त्यामुळे आजच्या जगात इंधन, ऊर्जेइतकेच महत्त्व आहे ते डेटाला. म्हणूनच तर 'data is the new oil' असे म्हटले जाते आणि त्याच न्यायाने डेटा सेंटर्सही तेलशुद्धीकरण प्रकल्पांइतकीच कळीची म्हणावी लागतील.


Powered By Sangraha 9.0