‘अध्यात्माचे प्रबोधन करत विज्ञानविषयक सूत्रांची जोड देऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख करून देणार्या शिवभक्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील यांच्याविषयी...
जनसामान्यांना जडवादाच्या जीवनदृष्टीतून जागे करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य निष्काम कर्मयोगी श्री राष्ट्रसंत जनार्दनस्वामींनी जन्मभर जाणीवपूर्वक जोपासले. श्रद्धा, शूचिता, अस्मिता, दया, प्रेम, परोपकार, क्षमा ही त्यांची शिकवण समाजाला देता यावी, यासाठी त्यांचे परमशिष्य शिवभक्त त्र्यंबक कृष्णाजी पाटील अर्थात, भाऊ पाटील प्रयत्नशील आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात यज्ञ, पारायणे, सत्संग, रामकथा, हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून समाजप्रबोधन, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्तीसाठी त्यांचे कार्य सुरू आहे. एक नवा पैसाही न स्वीकारता, केवळ राष्ट्रसंत जनार्दनस्वामींचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे, हा एकमेव त्यांचा ध्यास. वयाच्या ७५व्या वर्षीदेखील एखाद्या तरुणास लाजवेल, अशी त्यांच्यात ऊर्जा.
आयुष्याचा प्रत्येक क्षण परोपकारासाठी खर्च व्हावा, या उदात्त हेतूने भाऊ पाटील महाराष्ट्रभर प्रवचनासाठी फिरतात. आतापर्यंत त्यांनी राज्यभरात शेकडो ‘रामकथा’ सोहळ्यांत सहभाग घेत प्रभू श्रीरामाची गाथा लोकांपर्यंत पोहोचविली. हजारो प्रवचने, हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून त्यांनी संतवाणीची शिकवण दिली. हे कार्य करीत असताना त्यांनी आपल्यातील अमाप ऊर्जेचे अनेकांना दर्शन घडविले. त्यांच्या प्रवचनाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी सांगितलेला प्रत्येक दृष्टांत भाविकांना मंत्रमुग्ध करणारा असतो. ‘परअन्न, परधन, परदार, परनिंदा यांचा त्याग करा,’ या जगद्गुरूंच्या आदेशाचे भाऊ पाटील तंतोतंत पालन करतात. आपले कार्य देश आणि धर्मासाठीच असावे, हे एकमेव ध्येय समोर ठेवून ते वाटचाल करीत आहेत. समाजात ज्या गोष्टी बसत नाहीत, त्यांना आपण वाईट, विकृत म्हणतो. कारण, ते आपल्या संस्कृतीत बसणारे नसते. परंतु, तो माणसाचा आदिम स्वभाव आहे. त्याला लगाम घालून संस्कृती घडविण्याचे काम अध्यात्म करत असते.
प्रवचनातून या अध्यात्माचा प्रसार तर होतोच. शिवाय, आपली संस्कृती जपता येते, असे भाऊंचे मत. अर्थात, अध्यात्माचे प्रबोधन करताना विज्ञानविषयक सूत्रांची जोड त्यांच्या प्रवचनातून पाहावयास मिळतेच. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख विसरलेल्या समाजाला त्याची जाण करून देणे, हा आपल्या आयुष्याचा मंत्र असल्याचे सांगत त्यांनी स्वतःला प्रबोधनाच्या कार्यात झोकून दिले. प्रवचन, सत्संगाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी झाला पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. विज्ञानाच्या शतकातही समाज भरकटलेल्या अवस्थेत आहे. संत-महात्म्यांनी समाजहिताचे विचार सांगितलेले असले, तरी ते अनेकांच्या विस्मरणात गेलेले आहेत. हेच विचार आज समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी भाऊ पाटील राज्यभर पायपीट करतात. अतिशय वेगाने आणि अल्पकाळात पुणतांबा येथे भगवान काशी-विश्वेश्वराच्या जुन्या मंदिराच्या जागेवर दिमाखदार नवीन मंदिराचे सर्व बांधकाम पूर्ण करून स्वामीजी त्र्यंबकेश्वरला आले.
पुणतांबा क्षेत्री इ. स. १९७१ मध्ये शिवालय बांधून दिल्यानंतर जवळपास १३ वर्षे स्वामीजी पुणतांब्याला गेले नाहीत. नवीन बांधलेले मंदिर प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत होते. १९८४ मध्ये पुणतांबा व परिसरातील भाविक मोहनराव चव्हाण यांच्या मध्यस्थीने त्र्यंबकेश्वर येथे स्वामीजींकडे आले. नतमस्तक होऊन क्षमा मागितली आणि प्राणप्रतिष्ठा आपल्या शुभहस्ते करण्यात यावी, असा आग्रह धरला. स्वामीजी संत होते; त्यांनी होकार दिला आणि तो कार्यक्रम झाला. दि. १९ ऑगस्ट १९८४ रोजी स्वामीजींच्या हस्ते पुणतांबा येथील नूतन मंदिरात भगवान काशी-विश्वेश्वराची व अंगभूत देव-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. पुणतांबा व परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. यज्ञ, हरिनाम सप्ताह, पारायणे, सत्संग, भजन-पूजनाचा मोठा कार्यक्रम झाला. सांगतेच्या दिवशी स्वामीजींनी अर्धा तास प्रवचन करून पुढील प्रस्थानासाठी भाऊ पाटील यांना आज्ञा दिली. ‘भाऊ पाटीलचे प्रवचन ऐका, कुणी उठू नका,’ असा संकेत दिला. त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली. गुरुमहात्म्य सांगितले आणि राजा हरिश्चंद्र व करण देवता यांचा कथाप्रसंग सांगून, देव-गुरुदेवांना दिलेल्या वचनाचा भंग केल्यावर किती उपद्रव, दुःख-कष्टांना सामोरे जावे लागते, याचे वर्णन केले.
हल्ली एकत्र कुटुंबाचे चित्र दुर्लभ आहे. मात्र, भाऊ आणि परिघा पाटील हे दाम्पत्य त्यास अपवाद आहेत. या दाम्पत्याला चार मुले असून, त्यांच्या पत्नी, नातवंडे असा मोठा गोतावळा आहे. हे सर्व एकत्र राहत असून, आई-वडिलांच्या सेवेत कुठलीही कुचराई या कुटुंबाकडून होत नाही. त्यांची चारही मुले व्यवसायात स्थिर असून, वडिलांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी सदैव तत्पर असतात. प्रवचनानिमित्त आई-वडील राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात असोत, त्यांची सर्व व्यवस्था मुलांकडून पाहिली जाते. त्यासाठी आई-वडिलांना त्यांनी स्वतंत्र वाहन आणि चालक दिला आहे. अंतिम श्वासापर्यंत धर्मकार्याचा वसा घेतलेले भाऊ पाटील आज वयाच्या ७४व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना त्यांच्या तमाम भक्तपरिवाराकडून केली जात आहे. या सर्व प्रवासात अर्धांगिनी परिघा पाटील यांची त्यांना सदैव साथ लाभते. भाऊ पाटील यांना निरोगी आयुष्य लाभून, त्यांचे धर्माचे हे काम अविरत सुरू राहण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
- विराम गांगुर्डे