मुंबई : (Dr. Jayasingrao Pawar) मराठेशाहीचा इतिहास आपल्या लेखणीतून ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दि. २६ मार्च रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या ८५ व्यावर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून डॉ जयसिंगराव पवार यांची प्रकृती अस्वस्थ होती. फुफ्फुसाच्या संसर्गामुळ जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठेशाहीचा इतिहासकार हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसरला झाला. डॉ. जयसिंगराव पवारांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एमए आणि पीएचडी पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी महाविद्यालयात अध्यापन केलं. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. एमएपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची २० क्रमिक पुस्तकं अभ्यासक्रमात होती. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगरावांनी १९६४ मध्ये संशोधन कारकिर्दीला सुरुवात केली. जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ यासारखे २५ हून अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.
निवडक ग्रंथसंपदा
शिवचरित्र- एक मागोवा
आमच्या इतिहासाचा शोध व बोध
मराठेशाहीचे अंतरंग
शिवपुत्र छत्रपती राजाराम
छत्रपती संभाजी- एक चिकित्सा
राजर्षी शाहू छत्रपती पत्रव्यवहार आणि कायदे
मराठ्यांचा इतिहास खंड १ : शिवशाही
मराठ्यांचा इतिहास खंड २ : पेशवाई
मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई : खंड १ व २
उल्लेखनीय सन्मानपुष्प
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार
कोल्हापूर भूषण पुरस्कार
मालोजी राजे निंबाळकर पुरस्कार
गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार
आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार