संघर्षातून सबळ देवेंद्र

27 Mar 2026 13:25:53

मुंबईतील एका सामान्य कुटुंबातून प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना घडवणारा प्रशिक्षक बनण्यापर्यंतचा देवेंद्र कारले यांचा प्रवास हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयवेडेपणाचे जिवंत उदाहरण. त्यांच्याविषयी...

हाँगकाँगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी मैदानाच्या कडेला उभे असलेले देवेंद्र कारले बाहेरून शांत दिसत होते; पण आतून ते मोठ्या वेदना सहन करत होते. डबल टायफॉईड आणि कावीळ या गंभीर आजारांनी त्यांची तब्येत खालावली होती. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्लाही दिला होता. तरीही, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी मागे हटण्याचा विचारही केला नाही. त्यांनी त्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताचे नाव उंचावले. हा प्रसंग त्यांच्या जिद्दीची खरी ओळख करून देणारा ठरतो. कुर्ला (पश्चिम) येथील बुद्ध कॉलनीत वाढलेले देवेंद्र कारले यांचे बालपण साध्या परिस्थितीत गेले. लहानपणापासूनच त्यांना जॅकी चॅन यांच्या चित्रपटांची आवड. त्या चित्रपटांमधून मिळालेल्या प्रेरणेने त्यांनी ‘मार्शल आर्ट्स’कडे वळण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना त्यांनी ‘तायक्वांदो’चे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रातील आवड अधिकच वृद्धिंगत होत गेली.

घरची परिस्थिती अत्यंत कठीण असल्यामुळे लहान वयातच त्यांनी कामाला सुरुवात केली. छोट्या-मोठ्या कामांतून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांनी घरखर्चात हातभार लावला. शिक्षण, काम आणि कुटुंब यांचा ताळमेळ साधताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पुढे आईची तब्येत खालावल्यामुळे आणि वैवाहिक जीवनात त्यांच्या जबाबदार्‍या आणखी वाढल्या. नोकरीच्या शोधात असताना त्यांना खासगी अंगरक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कामामुळे त्यांना शिस्त, फिटनेस आणि जबाबदारी यांचे महत्त्व अधिक जवळून समजले. जवळपास सहा वर्षे त्यांनी हे काम प्रामाणिकपणे केले. याच काळात त्यांची भेट अनुज या मित्राशी झाली. दोघांनाही ‘मार्शल आर्ट्स’ची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक तरुणांची स्वप्ने अपूर्ण राहतात, ही जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी स्वतः कोच बनण्याचा निर्धार केला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेत असताना, त्यांचा संपर्क वर्ल्ड चॅम्पियन चिनी प्रशिक्षक कोच चार्ल्स यांच्याशी आला. त्यांनी आपले ध्येय आणि परिस्थिती स्पष्टपणे मांडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. ‘कोविड’ आणि व्हिसाच्या अडचणींमुळे चीनला जाता आले नाही. पण, त्यांनी पर्याय शोधत इंडोनेशियामध्ये जाऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांनी तांत्रिक कौशल्यासोबत शिस्त, संयम आणि मानसिक ताकदही विकसित केली. मलेशिया, सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये प्रवास करत, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाची सखोल ओळख करून घेतली.

भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी मुंबईत छोट्या प्रमाणात ‘मार्शल आर्ट्स’ क्लास सुरू केला. सुरुवातीला फक्त १५-२० विद्यार्थी होते. जागेची कमतरता, आर्थिक मर्यादा आणि कमी प्रतिसाद अशा अडचणी होत्या. पण, त्यांनी सातत्य ठेवत प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईने लक्ष दिले. हळूहळू त्यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता लोकांच्या लक्षात येऊ लागली आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ खेळ शिकवला नाही; तर शिस्त, आत्मविश्वास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण दिली. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले. हाँगकाँगमध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफीज जिंकल्या आणि भारताचे नाव उंचावले. या यशानंतर त्यांच्या कार्याचा मोठा सन्मान करण्यात आला. परिसरात ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पालक पुढे येत कृतज्ञता व्यक्त करत होते. त्यांच्या मुलांमध्ये झालेला सकारात्मक बदल पाहून अनेकांनी देवेंद्र यांचे कौतुक केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.

यानंतर त्यांनी ‘ब्राईट मिशन ट्रस्ट’ ही संस्था सुरू केली. या माध्यमातून गरीब आणि गरजू मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. अनेक मुलांना आर्थिक अडचणींमुळे प्रशिक्षण घेणे शक्य नव्हते. पण, या संस्थेमुळे त्यांना संधी मिळाली. तसेच त्यांना ‘निर्भया’ पथक आणि पोलिसांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली.
यासोबतच देवेंद्र कारले यांची एक मोठी सामाजिक भूमिका म्हणजे, आपल्या समाजातील अधिकाधिक मुलांना या कलेचे प्रशिक्षण देणे. आर्थिक परिस्थितीमुळे मागे राहणार्‍या मुलांना संधी मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांची ही भूमिका केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे, तर एक जबाबदार समाजघटक म्हणूनही महत्त्वाची ठरते.

त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांची ‘राष्ट्रीय प्रशिक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आज त्यांच्या क्लासमध्ये २५० ते ३०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात त्यांना स्वतःचे यश दिसते. देवेंद्र कारले यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे. त्यांनी संकटांना सामोरे जात स्वतःची ओळख निर्माण केली आणि अनेकांना नवी दिशा दिली. भविष्यात त्यांच्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करावे, हे त्यांचे मोठे स्वप्न असून, त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने देवेंद्र कारले यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा.

- सागर देवरे




Powered By Sangraha 9.0