मुंबई : (Ram Navami) पूर्वेला रामभद्र, दक्षिणेला रामचंद्र, पश्चिमेला रामदास आणि उत्तरेला रामलला; भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले तर रामनामाची गंगा अखंड वाहताना दिसते. ती पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी केले.
रामनवमीचे औचित्य साधून भाजपा मुंबई धार्मिक-अध्यात्मिक आघाडीच्या वतीने '५००वर्ष राम मंदिर प्रतिष्ठापनेची…५०० मुलांच्या रामरक्षा साहमुहिक पठणाची' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता बी, एन, वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, दादर (प) येथे कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास कोषाध्यक्ष तथा भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई तरुण भारतचे संपादक तथा भाजप मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, भाजपा मुंबई सरचिटणीस राजेश शिरवडकर, भाजप मुंबई धार्मिक-अध्यात्मिक आघाडी संयोजक सुरेश मिश्रा, नगरसेविका कल्पेशा कोठारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : रामनवमीच्या शुभेच्छांत रामच नाही! ममतादीदींचे मतपेढीचे राजकारण पुन्हा चव्हाट्यावर
उपस्थितांना संबोधत मोहन सालेकर पुढे म्हणाले, जीवनाची सुरूवात आणि शेवट ज्या नावाने व्हावी अशी प्रत्येक भारतीयाची असते ते नाव म्हणजे श्रीराम. श्रीरामांचे जीवन पाहिल्यास ते केवळ धार्मिक व्यक्तिमत्त्व नसून आदर्श नेतृत्व, संघटनशक्ती आणि कर्तव्यपरायणतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. रावणासारख्या बलाढ्य शत्रूचा पराभव करताना त्यांनी दाखवलेले सामर्थ्य हे केवळ शारीरिक नव्हते, तर नैतिक व बौद्धिक शक्तीचेही प्रतीक होते. त्याचबरोबर वानरसेना एकत्र करून त्यांनी उभारलेली संघटनशक्ती ही आधुनिक व्यवस्थापनशास्त्रालाही प्रेरणा देणारी आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा मुंबई सरचिटणीस राजेश शिरवडकर यांनी केले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या ५०० वर्षांच्या इतिहासाचा उल्लेख करत मंदिर उभारणीमागील दीर्घ संघर्षाची आठवण त्यांनी आपल्या उद्भोधनातून करून दिली. या कालखंडात अनेक पिढ्यांनी सातत्याने लढा दिला, त्याग केला आणि अखेर मंदिर उभारणीचे स्वप्न साकार झाले, असे त्यांनी नमूद केले. रामजन्मभूमीचा लढा हा श्रद्धा, संघर्ष आणि समर्पण यांचा संगम असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण वंदे मातरम् ने झाली. तर समारोप रामरक्षा पठणाने झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गायक निनाद आजगावकर यांची साथ विद्यार्थ्यांना लाभली.