राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पायाभूत सुविधांनी अभूतपूर्व वेग घेतला आहे. लोकल आणि मेट्रोने शहराच्या प्रवासाला नवी दिशा दिल्यानंतर, लवकरच जलवाहतुकीचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून जलमेट्रोच्या माध्यमातून उपनगरीय वाहतुकीचे नवे पर्व मुंबई महागर प्रदेशात सुरू होइल. या पार्श्वभूमीवर मुंबईत आकार घेणार्या या जलवाहतूक क्रांतीचा आढावा घेऊया.
रोज सकाळी लोकलच्या गर्दीत जीव मुठीत घेऊन कार्यालयात हजेरी लावणार्या मुंबईकरांसाठी समुद्राच्या लाटांवर विहार करीत, जलद वाहतुकीचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘वॉटरमेट्रो’ या आधुनिक जलवाहतुकीच्या पर्यायामुळे केवळ प्रवास सुकर होणार नाही, तर मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासालाही गतिमानता प्राप्त होणार आहे.
आजपर्यंत वर्सोवा-मढ, मार्वे-मनोरी, गोराई-एस्सेल वर्ल्ड, गेटवे ऑफ इंडिया-मांडवा किंवा बेलापूर-नेरुळ अशा काही मर्यादित जलमार्गांवर प्रवासाची सेवा उपलब्ध होती; पण आता तीच जलवाहतूक मेट्रोच्या स्वरुपात धावणार्या शहराच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात समुद्राच्या लाटांवर स्वार होणार्या जलमेट्रोने अगदी काही मिनिटांत उपनगरातून शहरातील कार्यालयापर्यंत पोहोचण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे. उदाहरणार्थ, ठाण्यात राहणारा एखादा युवक, जो लोकलने आणि इतर पर्यायी वाहतूक साधनांनी रोज दोन तासांचा प्रवास करून दक्षिण मुंबईत पोहोचतो, त्याच्यासाठी हा वेळ अर्ध्यावर येऊ शकतो. वसई-मिरा रोड, भाईंदर भागातील नागरिकांनाही गर्दीच्या रस्त्यांऐवजी थेट जलमार्ग प्रवासाच्या वेळेची बचत करणारा पर्याय ठरू शकतो.
२०३१ पर्यंत वार्षिक ७.५ कोटी प्रवाशांचा अंदाज
आजही मुंबई महानगर प्रदेशात दररोज सुमारे ४४ हजार प्रवासी जलमार्गाचा वापर करतात. मात्र, जलमेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही संख्या तब्बल दोन लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. २०३१ पर्यंत वार्षिक ७.५ कोटी प्रवासी या सेवेतून प्रवास करतील.
बोट नेमकी कशी असेल?
या जलमेट्रोमध्ये ५० ते २०० प्रवाशांची क्षमता असलेल्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड बोटी असतील. म्हणजेच हा प्रवास फक्त सोयीचा नाही, तर पर्यावरणपूरकही असेल. ‘कॅन्डेला पी-१२’ ही इलेक्ट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉईल तंत्रज्ञान यांचा संगम असलेली जगातील एक अत्याधुनिक प्रवासी फेरी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही फेरी पाण्याच्या पृष्ठभागावर उडते, असा आभास होतो. २५ नॉट्स म्हणजेच (सुमारे ४६ किमी प्रतितास) या वेगाने चालणारी ही नौका केवळ जलद नाही, तर डिझेल फेरीपेक्षा ८० टक्के कमी ऊर्जा वापरते आणि शून्य कार्बन उत्सर्जन करते. त्यामुळे ती पर्यावरणपूरक, शांत आणि टिकाऊ वाहतुकीचे उत्तम उदाहरण ठरते.
‘कोची मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने सादर केलेल्या डीपीआरनुसार अहवालात काय?
मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २९ टर्मिनल उभारण्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच दहा मार्गांची निवड करण्यात आली आहे.
सोयी-सुविधेने सुसज्ज टर्मिनल्स
या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारे टर्मिनल्सही आधुनिक असतील. टर्मिनल्सचे तीन प्रकार करण्यात येणार असून प्रमुख टर्मिनल्स सुमारे ६ हजार, २६० चौ.मी., इंटरमिजिएट टर्मिनल्स १ हजार, ७६० चौ.मी. आणि लहान टर्मिनल्स ५६० चौ.मी. क्षेत्रफळाचे असतील. या ठिकाणी पार्किंग, डिजिटल तिकीट व्यवस्था, आरामदायी प्रतीक्षागृह आणि इतर सुविधा यांमुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणार्या नोकरवर्गाचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
पुरेशा निधीचीही तरतूद
या प्रकल्पासाठी तीन टप्प्यांमध्ये एकूण ६,५९२.२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी एकूण २०७ बोटींची आवश्यकता भासणार आहे. मुंबई जलमेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर राबवण्यात येणार आहे. ‘पीपीपी’ मॉडेलअंतर्गत बोट खरेदी व संचालन, मार्ग आणि टर्मिनल एसक्लुझिव्हिटी, टर्मिनल्सचा व्यावसायिक वापर, जाहिरात व ब्रॅण्डिंग, पार्किंग सुविधा आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी एकत्रीकरण यांसारख्या बाबींमधून अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचा ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा विचार आहे.
वर्षाअखेरीस दोन बोटी ताफ्यात येणार
‘कोची मेट्रो रेल लिमिटेड’कडून दि. ११ मार्च रोजी ‘डीपीआर’ सादर करण्यात आला. नुकतेच या अहवालाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. येत्या काही महिन्यांत पर्यावरणीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे १ हजार, ५०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय पाठिंबा देण्यात येणार असून २०२६-२७ साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे तयार झाले आहे. तसेच, मुंबई वॉटरमेट्रोसाठी आम्ही काही महिन्यांपूर्वीच पावले उचलली आहेत. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा आम्हाला प्राप्त झाला असून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठकही घेतलेली आहे. लवकरच आपल्या मुंबईमध्ये मुंबई वॉटरमेट्रोचे जाळे तयार होईल. आपण मुंबईच्या एक भागातून मुंबई उपनगराकडे जसा आज मेट्रोने प्रवास करता, गाडीने प्रवास करता, लोकल ट्रेनने प्रवास करतात. तसेच येणार्या कालावधीत जलवाहतुकीच्या माध्यमातून अतिशय माफक दरामध्ये मुंबईतून मुंबई उपनगराकडे पोहोचता येईल. याचसाठी हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.
- नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास