भारतीय सांस्कृतिक परंपरेत रामायणाचे स्थान अद्वितीय आहे. भारताच्या विविध प्रदेशांनी रामकथेचे आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या कलारूपांत सादरीकरण केले. उत्तर भारतात ‘रामलीला’, दक्षिणेत ‘कथकली’, ‘यक्षगान’, तर ईशान्य भारतातील आसाममध्ये लोकनाट्य, नृत्य, संगीत आणि धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून रामकथा आजही समृद्ध सांस्कृतिक परंपरा म्हणून जोपासली जाते. आसामच्या लोकसंस्कृतीत नामघरांमध्ये, वैष्णव सत्रांमध्ये आणि धार्मिक उत्सवांमध्ये रामकथा अभिनय, संगीत आणि भक्तिभाव यांच्या संगमातून रंगमंचावर साकार होते. आसामच्या जनमानसाच्या मनावर कोरल्या गेलेल्या रामकथेचा घेतलेला मागोवा...
आसाममधील रामकथेचे प्रमुख रूप म्हणजे ‘भाओना’ किंवा ‘अंकिया नाट’. या परंपरेची मुळे १५व्या आणि १६व्या शतकातील वैष्णव भक्तीमध्ये आढळतात. त्या काळात धार्मिक शिक्षण आणि आध्यात्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संगीत, कीर्तन, नृत्य आणि नाट्य यांचा उपयोग केला गेला. या प्रक्रियेतूनच आसाममध्ये एक भक्तीपर सांस्कृतिक विश्व निर्माण झाले. या विश्वाचे प्रवर्तक होते श्रीमंत शंकरदेव. श्रीमंत शंकरदेव हे संत, कवी, नाटककार, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारकही होते. त्यांनी ‘एकशरण नामधर्म’ या वैष्णव परंपरेचा प्रसार करताना भक्ती, नैतिकता आणि समरसता या मूल्यांना विशेष महत्त्व दिले. कला हे धर्मोपदेशाचे माध्यम मानूनच त्यांनी कीर्तन, भक्तीपर काव्य, संगीत आणि नाट्य यांच्या साहाय्याने समाजाशी संवाद साधला. त्यांच्या याच प्रयत्नांतून ‘अंकिया नाट’ ही नाट्यपरंपरा विकसित झाली. या नाटकांच्या रंगमंचीय सादरीकरणालाच ‘भाओना’ असे म्हणतात.
‘भाओना’ सादरीकरणामधून मनोरंजनाबरोबच, धार्मिक आणि सांस्कृतिक शिक्षणही मिळते. यातील सूत्रधार, गायक, वादक, अभिनेते, नृत्य आणि संगीत यांच्या समन्वयातूनच पुराणकथा अधिक सजीव झालेल्या दिसतात. ‘नामघर’ आणि ‘सत्र’ या संस्थांमुळे ही परंपरा व्यापक प्रमाणात सर्वदूर विस्तारली आणि त्यातूनच रामायणाचादेखील प्रसार झाला. आसाममधील वैष्णवभक्तीपर परंपरेच्या प्रसारात ‘नामघर’ आणि ‘सत्र’ यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची अशीच. ‘नामघर’ हे गावातील सामूहिक उपासना, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे ठिकाण असून, येथे विविध निमित्ताने भाओना आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे ‘नामघर’ हे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संवादाच एके केंद्र झाले आहे.
‘सत्रे’ ही वैष्णव मठसंस्था असून, तेथे धार्मिक शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य, नाट्य आणि शास्त्राध्ययन यांचेही प्रशिक्षण दिले जाते. अनेक ‘भाओना’ सादरीकरणांची तयारी याच सत्रांमध्ये घडते. त्यामुळे आसामच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात ‘नामघर’ आणि ‘सत्र’ या संस्था, परंपरांचे जतन करणारी महत्त्वाची आधारकेंद्रे ठरताना दिसतात. ‘भाओना’ किंवा ‘अंकिया नाट’ही ही धार्मिक रंगपरंपरादेखील, श्रीमंत शंकरदेव आणि त्यांच्या शिष्यांनीच विकसित केली. ‘अंकिया नाट’ म्हणजे एकांक स्वरूपातील भक्तीपर नाटके होय. यामध्ये पुराणकथा आणि धार्मिक कथानकांचे सादरीकरण केले जाते. या नाटकांच्या रंगमंचीय सादरीकरणालाच ‘भाओना’ असे म्हणतात. सूत्रधार हा या नाट्यप्रकारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, तो प्रसंगांची ओळख करून देतो, कथानक स्पष्ट करतो आणि नाटकाचा प्रवाह देखील सांभाळतो. संवाद, संगीत आणि अभिनय यांच्या साहाय्याने यातील कथा अधिक जिवंत आणि प्रभावी झालेली दिसते. अनेक नाटकांमध्ये बजावली किंवा मिश्र भाषेचा वापर दिसतो; म्हणून या कथा सर्वसामान्यांना सहजगम्य होतात.
‘भाओना’ सादरीकरणात गायन-बायन ही परंपरा आहे. ‘गायन’ म्हणजे गायक आणि ‘बायन’ म्हणजे वादक. हे कलाकार ढोल, ताल (झांज), खोल (मृदुंगासारखे तालवाद्य) आणि इतर वाद्यांच्या साहाय्याने, नाट्यप्रयोगाला संगीतसाथ देतात. हा वादक समूह कथानकाच्या भावानुसार वातावरण निर्मिती करतो. युद्धप्रसंगातील तीव्रता, भक्तिपूर्ण प्रसंगांतील शांतता आणि करुण प्रसंगातील भावनिकता याच संगीताच्या माध्यमातून व्यक्त होते. सूत्रधाराचे निवेदन आणि वादकांच्या साथीने भाओना हा संगीत, लय, निवेदन आणि भक्ती यांचा सुरेख अनुभव देतो.
शंकरदेवांच्या नाट्यपरंपरेत विविध धार्मिक कथांचे सादरीकरण आढळते. त्यांपैकी ‘रामविजय’ हे रामायणाशी संबंधित महत्त्वाचे नाटक मानले जाते. या नाटकात रामकथेतील प्रसंग भक्तीपर शैलीत रंगमंचावर साकारले जातात. याशिवाय, रामायणातील इतर प्रसंग, पात्रे आणि मूल्ये यांचाही प्रभाव भाओना परंपरेतील अनेक सादरीकरणांत दिसतो. रामाचा वनवास, रावणाशी झालेला संघर्ष आणि आदर्श नायकत्व यांसारखे प्रसंग प्रेक्षकांसमोर जिवंत होतात.
‘भाओना’ आणि ‘अंकिया नाट’ परंपरेत रामाचे चित्रण विविध प्रकारे केलेले दिसते. काही सादरीकरणांमध्ये श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून धर्म, संयम आणि कर्तव्याचे प्रतीक म्हणून दाखवले असून, काही ठिकाणी ते विष्णूचा अवतार म्हणून भक्तीचे केंद्र असतात, तर काही प्रसंगांत आदर्श राजा म्हणून श्रीराम न्याय, करुणा आणि लोककल्याण यांचे प्रतिमान ठरतात. या विविध रूपांमुळे ‘भाओना’च्या माध्यमातून सादर होणार्या रामकथा केवळ धार्मिक आख्यान न राहता, नैतिक शिक्षणाचेही माध्यम झालेल्या दिसतात. रामाचे जीवन आदर्श मानून समाजात सत्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा यांसारखी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्नही या सादरीकरणांतून झालेला दिसतो.
आसामच्या ‘भाओना’ परंपरेचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे, मुखवटा-निर्मिती कला. ‘भाओना’ सादरीकरणात अनेक पात्रांचे प्रभावी चित्रण करण्यासाठी, मुखवट्यांचा वापर केला जातो. विशेषतः राक्षस, प्राणी, देवता किंवा अद्भुत पात्रे साकारताना, या मुखवट्यांमुळे रंगमंचावर अद्वितीय दृश्यवैभव निर्माण होते. ही कला अत्यंत कौशल्यपूर्ण असून, पारंपरिक पद्धतीने आजवर जपली गेली आहे. या मुखवट्यांच्या निर्मितीचे वैशिष्ट्य म्हणजे, या निर्मितीमध्ये स्थानिक नैसर्गिक साहित्याचाच वापर केला जातो. बांबूचा सांगाडा, कापड किंवा कागदाचे थर, माती, शोला वनस्पती, ज्यूट आणि नैसर्गिक रंग यांच्या साहाय्यानेच हे मुखवटे आकाराला येतात. प्रत्येक मुखवटा घडवताना पात्राचे रूप, भाव आणि स्वभाववैशिष्ट्य यांचा अत्यंत सूक्ष्म विचार केला जातो.
काही मुखवटे केवळ चेहरा झाकणारे असतात, तर काही मोठ्या आकाराचे मुखवटे संपूर्ण पात्राचे रूप अधिक भव्यपणे साकारण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे भाओना सादरीकरणात दृश्यात्मक प्रभाव तीव्र होतो आणि पात्रे जणू जिवंत झाल्याचा अनुभव निर्माण होतो. या प्रक्रियेतून कलाकारांचे सूक्ष्म हस्तकौशल्य आणि पारंपरिक कलासाधनेतील निपूणता स्पष्टपणे दिसून येते.
ब्रह्मपुत्रा नदीवरील माजुली हे जगातील सर्वांत मोठ्या नदीद्वीपांपैकी एक मानले जाते. ते आसामच्या वैष्णव सांस्कृतिक परंपरेचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथे अनेक सत्रे असून, त्यांपैकी काही सत्रांमध्ये मुखवटा-निर्मितीची परंपरा पिढ्यान्पिढ्या जपली गेली आहे. विशेषतः समागुरी सत्र हे मुखवटा-निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये मुखवटा-निर्मितीची परंपरा गुरू-शिष्य पद्धतीने पिढ्यान्पिढ्या जपली गेली आहे. येथे तयार होणारे मुखवटे संग्रही ठेवण्याबरोबरच, भाओना सादरीकरणांत वापरलेही जातात. त्यामुळेच ही कला आजपावतो टिकून आहे.
माजुलीतील अनेक सत्रांनी भाओना, सत्रीय नृत्य आणि मुखवटा-निर्मिती कला-परंपरांना आश्रय दिला. या सत्रांमुळेच या कलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत हस्तांतरित झाला. इतक्यातच माजुलीच्या पारंपरिक मुखवट्यांना ‘जिओग्राफिकल टॅग’ अर्थात भौगोलिक संकेत टॅग प्रदान करण्यात आला. या मान्यतेमुळे या लोककलेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तसेच या परंपरेच्या जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत हस्तांतरणासाठीही नवी प्रेरणा आणि संधी निर्माण झाल्या आहेत.
आसामच्या वैष्णव सत्रसंस्कृतीत विकसित झालेली आणखी एक महत्त्वाची कला म्हणजे, सत्रीय नृत्य. या नृत्यामधून धार्मिक कथांचे नाट्यरूप सादरीकरण होते. सत्रीय नृत्यात विष्णूचे विविध अवतार, तसेच रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण आढळते. नृत्य, अभिनय आणि संगीत यांचा सुंदर संगम असलेले हे कलारूप, भाओना परंपरेशी जवळचे आहे. त्यामुळे रामकथा नृत्याच्या माध्यमातूनही प्रेक्षकांसमोर जिवंत होते. सन २००० मध्ये सत्रीय नृत्याला ‘भारतातील अभिजात नृत्यपरंपरांपैकी एक’ म्हणून मान्यता मिळाली.
आसामच्या या संपूर्ण परंपरेचा केंद्रबिंदू म्हणजे भक्ती.
‘भाओना’, ‘अंकिया नाट’, ‘सत्रीय नृत्य’ आणि ‘नामघरातील सामूहिक उपासना’ या सर्वांच्या मुळाशी, ईश्वरभक्ती आणि नामस्मरणाची परंपरा आहे. ‘भाओना’ सादरीकरणामागे कलात्मक कौशल्याबरोबरच आध्यात्मिक शिस्तपण असते. कलाकारांचे प्रशिक्षण, संगीताचा सराव, वेशभूषा आणि अभिनय या सर्वांमध्ये, धार्मिक अनुशासन पाळले जाते. नाट्यप्रयोग हा भक्तीचा एक भाग मानला जातो. या सादरीकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावकर्यांचा सामूहिक सहभाग. अनेकदा गावातील लोकच यामध्ये विविध कामे करतात. त्यामुळे भाओना हा गावाच्या सामूहिक श्रद्धेचा उत्सव बनतो. रामनवमीनिमित्ताने या परंपरेचा विचार केला, तर भारतीय संस्कृतीची विविधता आणि एकात्मता दोन्ही ठळकपणे जाणवतात. देशाच्या वेगवेगळ्या भागांत रामकथेची रूपे बदलली, तरी तिचा नैतिक आणि आध्यात्मिक संदेश एकच राहतो. आसामची ‘भाओना’ परंपरा ही त्या समृद्ध भारतीय सांस्कृतिक वारशाची सुंदर आणि प्रेरणादायी अभिव्यक्ती आहे. रामकथेचा हा लोकपरंपरेतून जपला गेलेला प्रवास सांगतो की, भारताच्या विविध प्रदेशांत रूप बदलले, तरी रामायणाची मूल्ये आणि आदर्श आजही समाजजीवनात जिवंत आहेत.
- डॉ. किमया देशपांडे
(लेखिका अनुवादिका, इतिहास संशोधक व भारतीय संस्कृती विषयाच्या अभ्यासक आहेत.)