नित्यनूतन रामायण

26 Mar 2026 13:12:31

न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः|
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति॥

॥श्रीराम समर्थ॥


सहस्रावधी वर्षे मानवाला भूरळ घालणाऱ्या या कथेचा नायक राम आहे. कशामुळे त्याच्यावर इतक्या भाषांत इतके ग्रंथ लिहिले गेले? हजारो वर्षांनंतर अगदी आजसुद्धा त्याच्याबद्दल का लिहावेसे वाटते? माझ्या मते, त्याचे एक कारण म्हणजे तो समर्थ आहे. षोडशवषय रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवले, तर तो त्राटिकेचा वध करून यज्ञाचे रक्षण करतो! मिथिलेला यज्ञ पाहायला नेले, तर शिवधनुष्य तोडून स्वयंवराचा पण जिंकतो! वनवासात पाठवले, तर तिथे दुष्टांचे मर्दन करून सुष्टांचे रक्षण करतो! भार्या पळवली, तर सुग्रीवासारखा मित्र मिळवतो, दूताकरवी सीतेचा शोध घेतो, सैन्य जमवतो, समुद्रावर सेतू बांधतो, लंकाधिपती रावणाला युद्धात हरवतो आणि सीतेला परत मिळवतो! आणि त्याला सिंहासनावर बसवले असता, तो आदर्श असे रामराज्य निर्माण करतो! केवळ राम नाही, तर रामाचे नाम आणि त्याचे चरित्रसुद्धा सामर्थ्य देणारे आहे! म्हणून ते परत परत लिहिले, सांगितले गेले.

रामायणाच्या लोकप्रियतेचे अजून एक कारण म्हणजे, त्यातील मूल्ये सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहेत. मानवी मूल्ये जसे धैर्य, धर्म, कर्तव्य, त्याग, प्रेम, निष्ठा, न्याय, क्षमा इत्यादी कथेच्या रूपात सांगितली आहेत. रामकथा आपल्याला जीवनातील पुरुषार्थांची शिकवण देते. धर्म, अर्थ आणि काम कसा साधायचा, ते दाखवते. राजधर्म, नेतृत्व आणि प्रशासन यांबद्दल मार्गदर्शन करते; पण ती फक्त राजांसाठी नाही, तर ती प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठीपण मार्गदर्शक आहे. रावणाच्या उदाहरणातून स्पष्ट होते की, धर्माची मर्यादा सोडून अर्थ आणि कामतृप्तीच्या मागे धावल्यास विनाश होतो, तर राम आणि सीतेचे पत्नीव्रत आणि पतिव्रत या धर्माचे पालन करणे, हे एकमेकांना बळ देणारे आहे. तेच त्यांना वियोग सहन करण्याची, बंदीत जीवित राहण्याची आणि युद्ध लढण्याची ताकद देणारे आहे. म्हणूनच रामायण केवळ एक कथा नाही, तर मार्गदर्शक आहे आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा सांगितली जाते.

॥चरितम्‌‍ रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्‌‍॥

प्रभू रामाचे चरित्र मधुर आहे. त्याच्या कथेची गोडी अवीट आहे. रामाबद्दल कितीही लिहिले, तरी कमीच आहे. रामाचे वर्णन करणारे शत कोटी लोक जरी लिहिले, तरी आता रामाबद्दल काही लिहायचे शिल्लक नाही, असे होणार नाही. म्हणूनच, मोठमोठ्या ऋषींनी, संतानी, पंडितांनी, शास्त्रींनी, कवींनी, अभ्यासकांनी अनेक रामायणे लिहिली, तरी त्यातला गोडवा कमी झाला नाही!

जो मनाला रमवतो तो राम, अशी ज्याच्या नावाची व्युत्पत्ती आहे, त्या रामाने वाल्मिकींपासून गदिमांपर्यंत हजारो कवींना भूरळ घातली! महान कवींना रामकथा लिहिल्याशिवाय राहवलं नाही, हे जितके खरे, तितकेच हेही खरे की, त्यांनी रामकथा लिहिल्याने ते कवी अमर झाले! वाल्मिकी ऋषींची ओळख त्यांच्या रामायणामुळे आहे. एकाहून एक सुंदर काव्ये निर्माण करणाऱ्या कालिदासाला ‌‘रघुकार‌’ म्हणूनच ओळखले जाते. आणि अनेकोत्तम गीते लिहिणारे
गदिमा ‌‘गीतरामायणाचे कवी‌’ म्हणूनच स्मरणात राहतात.

रामायणाचे नृत्य-नाट्य अविष्कार रामायण केवळ लेखणीतून नाही, तर गायनातून, नृत्यातून वा नाट्यातूनदेखील सादर झाले. महष वाल्मिकी म्हणतात -

पाठ्ये गेये च मधुरं प्रमाणैस्त्रिभिरन्वितम्‌‍|
जातिभिः सप्तभिर्बद्धं तन्त्रीलयसमन्वितम्‌‍॥1-4-8॥
रसैः शृंगारकरुणहास्यरौद्रभयानकैः|
वीरादिभी रसैर्युक्तं काव्यमेतदगायताम्‌‍॥1-4-9॥

रामायणाची रचना अशी आहे की, हवे तर त्याचे वाचन करावे, वाटले तर गायन करावे. रामायण द्रुत, मध्यम किंवा विलंबित लयीत गाता येईल.

वेगवेगळ्या पट्टीत गाता येईल. सप्तस्वरांनी सजवून गाता येईल. तंतू वाद्य व ताल वाद्य साथीला घेऊन रामायणाचे गायन करता येईल, अशी ही रचना आहे. यामध्ये शृंगार, करुण, भय, हास्य, वीर, रौद्र आदि रस ओतप्रोत भरले आहेत. (नाट्य सादरीकरणासाठी आवश्यक असलेल्या नवरसांनी रामायण युक्त आहे.)

वाल्मिकींनी रामायण लिहितानाच त्याचे वाचन, कथन, गायन, नर्तन व नाट्यरूपातून सादर करता यावे, हा विचार करूनच लिहिले होते, असे वाटते.

कलाकार कसा असावा, रामाची कथा कुणी गावी, हेदेखील वाल्मिकी सांगतात. पहिला गुण आहे संगीताचे अंग. वाल्मिकी म्हणतात, कुश-लवाचा आवाज गोड आहे. दोघे गायन, वादनाचे तज्ज्ञ आहेत. त्यांचे गायन ऐकून असे वाटावे की, जणू काही स्वगय गंधर्वच गात आहेत. कुश-लव दोघे बुद्धिमान आहेत, वेदांमध्ये पारंगत आहेत आणि त्यांना धर्माचे ज्ञान आहे. म्हणून ते रामकथा सांगू शकतील.

निपुण गायकांनी रामकथा

गाऊन ती जनमानसात रुजवली. गुजरातमधील गोड लोकगीतापासून आसामच्या वैष्णव परंपरेतील रामायणापर्यंत प्रत्येक प्रदेशाने रामकथेला आपला स्वर दिला. अप्सरेसारख्या नर्तकींनी ती नृत्यातून सादर केली. केरळच्या कथकली नृत्यापासून ते ओडिशाच्या लढाऊ शैलीतील छाऊ नृत्यापर्यंत रामकथा सादर केली गेली. प्रत्यक्ष विश्वकर्मा ज्यांना प्रसन्न झाला असेल, अशा स्थपतींनी लेण्यांतून रामकथेला रूप दिले. पाषाणाच्या मंदिरातील शिल्पांनी रामकथेला आकार दिला. काश्मीरच्या भसोह्लीपासून केरळच्या भित्तिचित्रांनी रामकथा रंगवली.

संस्कृत साहित्यात महाकाव्य, खंडकाव्य, चित्रकाव्य, लेषकाव्य, चम्पू, कथा, कादंबरी, स्तोत्र, नाटक अशा विविध प्रकारांतून रामायण लिहिले गेले. संस्कृत नाटकांच्या बरोबरीने रामलीला, यक्षगान, भाओना यांसारख्या लोककलांनीदेखील रामकथा रंगमंचावर फुलवली. विविध वनवासी समूहांनी मौखिक परंपरेने रामकथा जपली. सामान्य लोकांनी रामकथेच्या पोथ्या हाताने लिहून काढल्या, चित्रांनी सजवल्या. या पोथ्या कथाकारांना भेट दिल्या जात असत. कथाकार, कीर्तनकार आणि हरिकथाकारांनी आपल्या मधुर वाणीने रामकथा जनतेपर्यंत पोहोचवली, तर रामदासी, वारकरी आदि पंथानी रामकथेचे भक्तिरंग उलगडले.

गुप्त, चोल, इक्ष्वाकू

यांसारख्या राजांनी आपले राज्य रामराज्यासारखे म्हटले, आपल्या शौर्याची तुलना रामशी केली आणि आपली वंशपरंपरा रामाशी जोडली. बी. बी. लाल यांसारख्या दिग्गज पुरातत्त्ववेत्त्यांनी रामायणातील स्थळांवर संशोधन करून तिच्या ऐतिहासिक संदर्भांना उजाळा दिला. चित्रमहष दादासाहेब फाळकेंपासून एन. टी. रामाराव यांसारख्या दिग्गजांनी चित्रपटांच्या माध्यमातून रामकथा नव्या पिढ्यांसमोर सजीव केली.

मुख्य म्हणजे, रामाच्या वनगमनाच्या मार्गावर उभी असलेल्या मंदिरांनी आणि तीर्थस्थळांनी रामाच्या प्रवासाच्या स्मृती जीवंत ठेवल्या. या स्थळांना भेट देणे, हे रामायणाचे पारायण केल्यासारखे आहे!

विविध कला, परंपरा आणि अभिव्यक्तीच्या माध्यमांतून रामकथा पुनःपुन्हा सांगितली गेली. या कलांनी रामकथा दूरदूरपर्यंत पोहोचवली आणि ती कथा शतकानुशतके जिवंत ठेवली. रामायण तर उपजीव्य काव्य आहे. त्यामुळे रामकथेनंही या कला जीवित ठेवल्या आणि कलाकारांना उपजीविका दिली. अशा परंपरांनी कलाकारांच्या पिढ्यान्‌‍पिढ्यांना जगण्याचा आधार दिला. नवल ते काय? रामायण राजदरबारात सांगितले गेले, यात आश्चर्य नाही. ती कथा वनातही सांगितली गेली, यातही आश्चर्य नाही. कारण ही कथा जशी राजवाड्यांत घडली, तशी ती वनातही घडली. ती जशी गंगेच्या तीरावर लिहिली गेली, तशी ती लंकेच्या समुद्रकिनाऱ्यावरही लिहिली गेली, यातसुद्धा आश्चर्य नाही. कारण हा श्रीरामाचा मार्ग होता.

रामकथा भारताबाहेर चीन, मंगोलिया, जपान आणि आग्नेय

आशियाई देशांत पोहोचली. या सर्व ठिकाणी रामकथा स्वीकारली गेली. तिची विविध भाषांतरे झाली. त्यावर स्थानिक भाषेत नवीन महाकाव्ये रचली गेली. ती विविध कलांमधून साजरी केली गेली. काश्मीरच्या ‌‘रामायण मंजरी‌’पासून श्रीलंकेच्या ‌‘जानकीहरण‌’पर्यंत. एकनाथांच्या ‌‘भावार्थ रामायण‌’पासून थायलंडच्या ‌‘रामाकियन‌’पर्यंत. केरळच्या ‌‘कथकली‌’पासून कंबोडियाच्या ‌‘लखोन खोल‌’पर्यंत आणि लाहोरच्या ‌‘रामलीले‌’पासून इंडोनेशियाच्या ‌‘रामायण बॅले‌’पर्यंत सर्वांनी रामायण सादर केले. पण यांपैकी कशातही आश्चर्य नाही! यात नवल काय आहे, ते पाश्चिमात्य देशांकडे पाहिल्यावर कळेल.

पाश्चिमात्य देशांमध्ये तेथील धर्मग्रंथांचे भाषांतर करण्यावर बंदी होती. भाषांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा होती. अगदी मृत्युदंडसुद्धा दिला गेला. भाषांतरित प्रती जप्त करून जाळल्या गेल्या होत्या. धर्मग्रंथांवर प्रश्न विचारण्यास बंदी होती. त्यावर आधारित नृत्य-नाटकास मज्जाव होता. त्यावर चित्र-शिल्प करण्यास अनुमती नव्हती. गायन-वादन करण्यास बंदी होती.

याउलट भारतात, स्थानिक भाषांमध्ये रामायण लिहिणाऱ्यांना संत मानले गेले. त्यांना लोकमान्यता आणि राजाश्रय दोन्ही मिळाला. रामायणाचे वाचन, श्रवण आणि लेखन करून नवीन प्रत तयार करणे, हे पुण्यकर्म मानले गेले. रामकथा सांगणाऱ्या कथाकरांना, गायकांना, नटांना, चित्रकरांना, शिल्पकरांना नमस्कार करायची पद्धत आहे. त्यांना समाजात, गावात मान दिला जातो.

सर्व स्तरांतील लोकांनी रामायण सांगितले-लिहिले. त्यात चारही वर्णांचे स्त्री, पुरुष, राजा, रंक, नागरी, ग्रामीण आणि वनवासी सर्व आले. विविध देश, धर्म, पंथ आणि कलांनी रामायण आपापल्या पद्धतीने, क्वचित काही बदल करूनदेखील सांगितले. हे स्वातंत्र्य हिंदू धर्माने दिले.

इथे रामायणातील पेचप्रसंगांवर प्रश्न विचारायची मुभा आहे. त्या प्रश्नांना उत्तर देण्याची सोय आहे. त्यावर वाद-विवाद करायची मुभा आहे. हिंदू धर्माचे हे विशाल आणि उदार अंतःकरण हे नवल आहे. हे आश्चर्य आहे.

असे स्वातंत्र्य असल्याने, विविध कलांनी आपापल्या परीने रामायण सांगितले. लहान बाळाचे आपण लाड करतो, त्याला नवीन नवीन कपडे घालतो, दागिने घालतो. डोळ्यांत काजळ घालतो. दृष्ट लागू नये, म्हणून तीट लावतो. किती करू, किती नको असे होते! अगदी तसेच लोकांनी रामायणाचे कौतुक केले आहे. मग रामायण कुठे ग्रामीण ढंगात सजते, तर कुठे अभिजात रूपात मिरवते. कुठे ओवी रूपात गुंजन करते, तर कुठे पहाडी आवाजात घुमते. कुठे शांत रसात निरंजनासारखे तेवते, तर कुठे वीर रसात विद्युल्लतेसारखे झळकते!

- दीपाली पाटवदकर ( अतिथी संपादक)
9822455650


Powered By Sangraha 9.0