शत्रू कितीही छोटा व दुबळा भासत असला, तरी त्याला कमी लेखण्याची चूक कधी करू नये. जवळपास महिनाभर चाललेल्या या युद्धानंतरही इराण हार वा शरणागती पत्करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने अमेरिका आता या दिशाहीन युद्धातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने पाच दिवसांचा एकतर्फी युद्धविराम जाहीर करून आपण कमजोर असल्याचे दाखवून दिले आहे. आता खेळी इराणच्या हाती आली आहे.
ऐन भरात सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका व इस्रायल युद्धाच्या धुमश्चक्रीत सोमवारी अचानक पाच दिवसांचा एकतर्फी युद्धविराम जाहीर करून अमेरिकेने सर्वांना धक्का दिला. येते पाच दिवस अमेरिका इराणवर हल्ले करणार नाही, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यासाठी आपण इराणबरोबर सुरू केलेल्या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे कारणही त्यांनी दिले. या सकारात्मक चर्चेमुळे अमेरिका इराणच्या वीज उत्पादन प्रकल्पांवरील हल्ले थांबवत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. अर्थात, इराणने हा दावा उडवून लावला असून, आपण अमेरिकेशी कोणत्याही पद्धतीने चर्चा करीत नसल्याचे सांगितले आहे. आपण दिलेल्या धमकीमुळे घाबरून अमेरिकेने हल्ल्यांचा बेत रहित केल्याचा दावाही इराणने केला आहे.
असे असले, तरी दुसर्या दिवशी काही इराणी सरकारी सूत्रांनी अमेरिकेशी गुप्त वाटाघाटी सुरू असल्याचे सूचित केले. यात तुर्कीये, इजिप्त आणि पाकिस्तान हे देश मध्यस्थीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. इराणतर्फे या वाटाघाटींमध्ये कोण भाग घेत आहे, ते स्पष्ट झाले नसले, तरी इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. अर्थात, कालिबाफ यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर त्याचा इन्कार केला. अमेरिकेकडून उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यामार्फत या वाटाघाटी केल्या जातील, असे सूचित केले जात आहे.
अमेरिका-इराण यांच्यातील या कथित वाटाघाटींचा गोंधळ आणखी एक-दोन दिवस सुरू राहील. तरीही दोन्ही देशांकडून काही प्रमाणात गुप्त स्तरावर काही ना काही वाटाघाटी सुरू आहेत, हे निश्चित. त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. याचे कारण जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या संघर्षात, इराण कितीही इन्कार करीत असला, तरी त्याची भरपूर प्रमाणात हानी झाली आहे. अमेरिकेची थेट हानी नसली, तरी अमेरिकेसारख्या जगातील एकमेव महासत्तेला तब्बल महिनाभर झुंजवत ठेवण्याची ताकद इराणने दाखवून दिली आहे. अमेरिकेच्या दृष्टीने हा संघर्ष तिच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. गेली अनेक वर्षे असंख्य आर्थिक व राजकीय निर्बंध लादलेला इराणसारखा एक देश आपल्याला दाद देत नाही आणि आपल्या अब्जावधी डॉलरच्या अत्याधुनिक लष्करी सामग्रीचा चक्काचूर करून लढत राहतो, ही अमेरिकेच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे. या युद्धाचा खर्चही अमेरिकेच्या हाताबाहेर जात चालला आहे. इतका खर्च करूनही हवे ते इप्सित साध्य होताना दिसत नाही. जितके दिवस इराण लढत राहील, तितकी अमेरिकेची बेअब्रू वाढीव प्रमाणात होत राहील.
इराणकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. त्याचे पहिल्या फळीतील राजकीय व लष्करी नेतृत्व नष्ट झाले आहे. दुसर्या व तिसर्या फळीतील नेतृत्वाबाबत संभ्रम आहे. इराणमध्ये सध्या सत्ता नेमकी कुणाच्या हातात आहे, हे स्पष्ट झालेले नसतानाही तो देश अमेरिकेला टक्कर देत आहे आणि इराणी जनताही या राजवटीमागे भक्कमपणे उभी आहे, ही गोष्ट अमेरिकेला हैराण करणारीच. शिवाय, इस्रायलवरील हल्ल्यांची तीव्रता आणि हानीची शक्यता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कारण, इराणने आता अमेरिकेपेक्षा इस्रायलला पहिले लक्ष्य केले आहे. लगतच्या आखाती देशांचेही प्रचंड आर्थिक नुकसान होत असून त्यांचा दबाव अमेरिकेवर वाढत चालला आहे. या सार्या संघर्षाचे खापर केवळ अमेरिकेच्या डोक्यावर फुटत असून, खुद्द अमेरिकी जनमानसातही या युद्धामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने खाली घसरली आहे. त्यामुळे इराणपेक्षाही अमेरिकेला हा संघर्ष लवकरच आटोपता घेण्याची निकड जाणवत आहे. युद्धविरामाची घोषणा हे त्यातील पहिले पाऊल आहे.
इराणने युद्धबंदीसाठी तीन प्रमुख मागण्या पुढे केल्या असून, त्या स्वीकारणे अमेरिकेला शक्य नाही. आपल्यावर लादलेले सर्व आर्थिक निर्बंध अमेरिकेने उठविले पाहिजेत, आपल्या सार्वभौम हक्कांना आणि सुरक्षेला मान्यता देणे आणि या युद्धात झालेल्या सर्व आर्थिक नुकसानाची भरपाई करणे आणि भविष्यात आपल्या देशावर अमेरिका किंवा इस्रायल यांच्याकडून हल्ले होणार नाहीत, याची हमी इराणने मागितली आहे. तसेच आपला क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम पुढे सुरू ठेवला जाईल, हेही इराणने नमूद केले आहे. या अटी विजेत्या देशाच्या वाटतात. त्या मान्य करणे अमेरिकेला शक्य नाही.
अर्थात, सध्या तरी युद्धाची स्थिती खूपच अनिश्चित असून, येत्या काही दिवसांत परिस्थितीला कोणतेही वळण लागू शकते. मात्र, यातून एक गोष्ट उघड झाली आहे. ती म्हणजे, अमेरिका काहीही दावे करीत असली, तरी अमेरिका आणि इस्रायलला फार मोठे आर्थिक, राजकीय आणि सामरिक नुकसान सोसावे लागत आहे. आज तरी, इराण शरणागती पत्करेल, याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शत्रू कितीही छोटा आणि दुबळा भासत असला, तरी त्याला कमी लेखण्याची चूक शेवटी खूपच महागात पडते, हा धडा अमेरिका आणि इस्रायलला मिळाला आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे होर्मुझच्या आखातावरील इराणचे वर्चस्व मोडून काढणे कोणालाही शक्य नाही, ही गोष्टही सिद्ध झाली आहे. हे वर्चस्व अबाधित असेपर्यंत इराणचा पराभव शक्य नाही, हेही जगाने पाहिले आहे. इराण हा कितीही मागास आणि धर्मांध देश वाटला, तरी तो लष्करीदृष्ट्या प्रबळ आहे, ही गोष्ट या संघर्षाने दाखवून दिली. आपण इराणची सारी नाविक आणि हवाई संरक्षण सिद्धता पूर्ण नष्ट केली, त्याचे तेलशुद्धीकरण प्रकल्प नेस्तनाबूत केले, त्याचे राजकीय नेतृत्व संपविले असे कितीही दावे अमेरिकेने केले असले, तरी युद्धबंदीचा प्रस्ताव जाहीर करून आपण माघार घेतली आहे, हेच अमेरिकेने सूचित केले. गतवर्षी भारत-पाकिस्तान संघर्षात (ऑपरेशन सिंदूर) युद्धबंदीची याचना प्रथम पाकिस्तानने केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे अमेरिकेने कथित वाटाघाटींचे कारण देत जरी तात्पुरता युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला असेल, तर त्याचा अर्थ अमेरिकेने अप्रत्यक्षपणे आपली हार मानली आहे, असाच होतो. वाटाघाटी सुरू राहिल्या, तरी या संघर्षात इराणचे प्रभुत्व सिद्ध झाले आहे.
- राहुल बोरगांवकर