कोल्हापूर–वैभववाडी नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार

26 Mar 2026 17:26:22
Kolhapur–Vaibhavwadi Rail Project
 
मुंबई : (Kolhapur–Vaibhavwadi Rail Project) कोल्हापूर श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते वैभववाडी दरम्यान प्रस्तावित १०८ किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि कोकण विभागातील संपर्क अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या स्वप्नांना गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
डीपीआर तयार झाल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राज्य सरकारांसह विविध संबंधित भागधारकांशी चर्चा, तसेच नीती आयोग आणि अर्थ मंत्रालय यांसारख्या संस्थांकडून आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. प्रकल्प मंजुरी ही सतत सुरू असणारी प्रक्रिया असल्याने अंतिम कालमर्यादा या मंजुरींवर अवलंबून असेल.
 
सध्या कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून देशातील दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या एकूण ३० रेल्वे सेवा चालू आहेत. यात वंदे भारत एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, दीक्षाभूमी एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, हरिप्रिया एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जमीन अधिग्रहण, वनपरवानग्या, विविध प्राधिकरणांकडून मंजुरी, भौगोलिक व तांत्रिक अडचणी, कायदा-सुव्यवस्था, तसेच कामकाजासाठी उपलब्ध कालावधी यांसारखे अनेक घटक महत्त्वाचे ठरतात.
 
तसेच, कोणत्याही रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देताना संभाव्य प्रवासी व मालवाहतूक, आर्थिक व्यवहार्यता, कनेक्टिव्हिटी, विद्यमान मार्गांवरील ताण कमी करणे, राज्य सरकारे व लोकप्रतिनिधींच्या मागण्या, सामाजिक-आर्थिक परिणाम आणि निधीची उपलब्धता यांचा विचार केला जातो. ही माहिती रेल्वेमंत्री तसेच माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
 
हे वाचलत का? - महाराष्ट्र धर्म वाढला पाहिजे पण भोंदुगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
नवीन रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्राच्या स्वप्नांना गती
 
कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी नवीन रेल्वे मार्गाच्या डीपीआरची तयारी पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार! सध्या कोल्हापूरहून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या 30 रेल्वे सेवांमुळे मजबूत संपर्क उपलब्ध आहे. त्यातच या नवीन रेल्वे मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होऊन प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्राच्या स्वप्नांना गती देण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार!
 
Powered By Sangraha 9.0