आपली आपली रामलीला

25 Mar 2026 17:33:06

भारतात प्रामुख्याने लोकनाट्याचा बाज घेऊन रामकथा सादर केली गेली, ती उत्तर भारतात. तुलसीदासांच्या ‌‘रामचरितमानस‌’मुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे या कलेची बीजे इथे रुजली आणि स्थिरावलीदेखील. रामलीलेच्या दीर्घकाळ चाललेल्या अनोख्या परंपरेला ‌‘यूनेस्को‌’ने 2008 मध्ये विश्वाची अनमोल ठेव (UNESCO's Intangible Cultural Heritage of Humanity) म्हणून जाहीर करून, या परंपरेचा सन्मान केला आहे. अर्थात, हा झाला बाह्य सन्मान. रामाची कथा आणि तिची व्याप्ती आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठी आणि व्यापक असल्याचे रामलीला आपल्याला दाखवते. पूव पाकिस्तानातही रामलीला केली जात असे. जणू त्याचेच पुनरुत्थान करत, गेल्यावष कराचीत पुन्हा एकदा ‌‘रामकथा‌’ जनमानसात सादर झाली. या कथेने भाषा, देश, धर्म यांच्या सीमा ओलांडल्या असून, आज भारत, नेपाळसह भारतीय उपखंडातून स्थलांतरित हिंदू लोकसंख्या असलेल्या बहुतेक देश अर्थात फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, गयाना, सुरिनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो इत्यादी देशांमध्ये रामलीला सादर केली जाते. जनमानसामध्ये रामकथा रुजवणाऱ्या या रामलीलेचा घेतलेला मागोवा...

आणि प्रत्यक्ष राम अवतरतात. आज त्यांच्या लग्नाची वरात निघालेली असते. सोबत सोज्वळ सीतामाई आणि त्या वरातीत 10 ते 20 हजार अयोध्यावासी. राम आणि लक्ष्मण लग्न करून अयोध्येला येतात, तेव्हाही अशीच अलोट जनता त्यांच्यासोबत राजवाड्यात येते. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघताच, अयोध्यावासी त्यांच्या मागे जाऊ लागतात. त्यांना सोडायला गंगा किनारी येतात आणि रामाच्या अगणित लीलांचा एक भाग होऊन जातात. संपूर्ण उत्तर भारताचेच स्पंदन रामाच्या अगाध लीलांमुळे जणू रामहृद्याशी एकरूप होते. ‌‘रामायण‌’ म्हणजे केवळ कागदावर उमटलेले शब्द नाहीत, हे उत्तर भारतातमधील रामलीला पाहिले की लक्षात येते. गेली सुमारे 400 वर्षे दरवष राम, सीता, लक्ष्मण सारेच जण इथे अवतरतात. ही केवळ अखंड नाट्यपरंपरा असती, तर कदाचित प्रयोगानंतर दोन दिवस कौतुक होऊन विस्मरणातही गेली असती. पण, नाटकानंतरही वर्षभर मनामनात जिवंत असणारी ही परंपरा म्हणजे, रामजीवनाचे सगळ्यांच्या रोजच्या जगण्यात पडलेले प्रतिबिंबच म्हणावे पाहिजे. भारतातली कलापरंपरा ‌‘रामायण‌’ - ‌‘महाभारता‌’सारखी आर्षकाव्ये आणि पुराणकथांनी समृद्ध झाली आहे. रामलीला हे त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण.

अशी ही सुंदर परंपरा नेमकी चालू कधी झाली, कशी झाली? यामागेही अनेक कथा आहेत. असे म्हणतात की, 1595 मध्ये तुलसीदास महासंतांच्या आज्ञेनुसार काशीला पोहोचले. तिथल्या प्रसिद्ध ‌‘अस्सी‌’ घाटावर त्यांचे वास्तव्य सुरु झाले. रात्रीच्या प्रहरी त्यांना जे स्वप्नात दिसले, त्यातूनच सकाळी त्यांच्या लेखणीला ‌‘रामकथा‌’ लिहिण्याची प्रेरणा मिळू लागली. ‌‘रामचरितमानस‌’चे लेखन सुरू झाले आणि मार्गशीर्ष शुक्ल पक्षात राम विवाहाच्या दिवशी पूर्ण झाले. प्रभू रामांच्या आदेशामुळेच संत तुलसीदास आचार्यांकडे आले होते. प्रभू रामांचे स्मृतिचिन्ह असलेले दिव्य मुकुट, धनुष्य-बाण, कमंडलू आचार्यांनी त्यांना दिले. ते घेऊन संत तुलसीदास काही शिष्यांसोबत नौकेत बसले आणि त्याकाळच्या काशी महाराजांना भेटायला रामनगरला येथे आले. संत तुलसीदासांच्या येण्याने काशी महाराजांना अत्यानंद झाला. ते श्रद्धेने भावविभोर झाले. त्यांनी सिंहासनावरून उठून तुलसीदासांचा सन्मान केला आणि रामलीला सुरू करण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे 1621 साली ‌‘अस्सी‌’ घाटावर, तुलसीदासांनी पहिल्यांदा रामलीला केली. मग काशी नरेशांनी रामलीलाचे प्रयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लंका, चित्रकूट, अरण्य असे नेपथ्य तयार करून, भव्य प्रयोगाचीच सिद्धता केली. तेव्हापासून दरवष रामलीला सादर केली जाऊ लागली. असे म्हणतात की, त्यावेळी रामलीला सुरू करण्यामागे तुलसीदासांचा एक उद्देश होता, तो म्हणजे लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे. ज्याप्रमाणे रामयुगात रावणाचा अंत झाला, त्याचप्रमाणे त्यांच्या काळात असलेली जुलमी मुघल राजवटही संपेल, हाच विश्वास तुलसीदासांना रामलीलेमधून निर्माण करायचा होता. जुलमी राजवटीला कंटाळलेल्या लोकांना जागे करण्यासाठी, त्यांच्यात चैतन्य भरण्यासाठी आणि मुख्य म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे करण्यासाठी, त्यांनी रामाच्या कथेचा भक्कम आधार घेतला आणि ती कथा जनमानसापर्यंत पोहोचवली.

तर, बरेलीत रामलीला कशी सुरू झाली? याचीही एक गोष्ट आहे. बरेलीच्या पंडित राधेश्याम कथावकांनी रामलीला सादरीकरण डोळ्यासमोर ठेवून ‌‘राधेश्याम रामायण‌’ लिहिले. ‌‘राधेश्याम रामायणा‌’त आठ विभाग आणि 25 भाग आहेत. हिंदी, उर्दू, अवधी आणि ब्रज भाषांमधले वेगवेगळे शब्द तर यामध्ये आहेतच, पण मुख्य म्हणजे ते विशेष गायनशैलीत लिहिले आहे. या भाषा वैविध्यामुळे आणि शैलीमुळे ‌‘राधेश्याम रामायण‌’ इतके लोकप्रिय झाले की, राधेश्याम कथावक यांच्या हयातीत या पुस्तकाच्या दोन कोटींहून अधिक प्रती हिंदी आणि उर्दूमध्ये छापल्या आणि विकल्यादेखील गेल्या. बरेली येथील राधेश्याम यांच्या घराजवळच नाटक कंपन्या तळ ठोकून बसत असत. त्यांचे वडील निवेदक होते. कथा सांगता-सांगता त्यांनी राधेश्याम यांना संगीताचे धडे दिले. आता राधेश्याम कथेची गाणी गात असत आणि त्यांचे वडील त्यांचा अर्थ लावत असत. नाटकांची आवड असलेल्या पंडित राधेश्याम यांनी पाहिलेल्या नाटकांमधील गाण्यांच्या धतवर भजनांची रचना केली. येथूनच भारतात ‌‘रामकथा संवादां‌’च्या सुवर्णयुगाची खरी सुरुवात झाली.

1861च्या सुमारास भारतात इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत होता. त्यावेळी बरेली इथल्या लोकांनी सामाजिक एकजूट बांधण्यासाठी, या सांस्कृतिक परंपरेचाच उपयोग करून घेतला. बमनपुरी येथे रामलीलेचे प्रयोग होऊ लागले. हळूहळू हे प्रयोग जनआस्थेचे केंद्र झाले. त्याची वाढती लोकप्रियता पाहून, इंग्रजांनी याचे प्रयोग बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, वाढत्या जनसहभागाच्या रेट्यापुढे इंग्रज सरकारचे काही एक चालले नाही. त्यांना रामलीला प्रयोग बंद करता आले नाहीत. गेली 167 वर्षे झाली, रामलीलेचे आजही हर्षोल्लासाने आणि आस्थापूर्वक आयोजन केले जाते. बनारस शहरात चार रामलीला आहेत, ज्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. सर्वात जुनी रामलीला ‌‘श्री चित्रकूट रामलीला समिती‌’च्या रामलीलेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. याशिवाय, ‌‘मौनीबाबांची रामलीला‌’, ‌‘लाट भैरवची रामलीला‌’ आणि ‌‘अस्सी‌’ इथल्या रामलीलांचा इतिहास 400 वर्षांहून अधिक जुना आहे.

रामनगरमध्ये लोकनाट्याचा सुंदर बाज ल्यालेली रामलीला तेव्हाचे महाराज उदित नारायण सिंह यांच्या काळात सुरू झाली. त्यांचा काळ 1796 ते 1835 आहे. ही रामलीला सुरुवातीला रामनगरच्या किल्ल्यात सादर केली जाई. नंतर लोकांना त्याचा आनंद घेता यावा म्हणून, महाराजा ईश्वरी नारायण सिंह यांनी रामलीला किल्ल्याच्या बाहेर आणली. त्यांनी ‌‘रामचरितमानस‌’ या ग्रंथाचे शोधन केले. इथे याची सुरुवात पावसाळ्याच्या काळात होते. कलाकार तेव्हापासूनच गणपतीचे वगैरे मुखवटे तयार करण्यास सुरुवात करतात. यावेळी रामलीला नाट्याचे पुस्तक आणि नाटकासाठीच्या इतर सामग्रीची पूजा होते. महत्त्वाच्या पात्रांची कामे करणाऱ्या अभिनेत्यांचीही पूजा होते आणि मगच तालमीला सुरुवात होते. या सरावामध्ये ‌‘अवधी‌’ भाषेतील संवादाचा सराव केला जातो. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता इ. महत्त्वाची पात्रे सादर करणाऱ्या अभिनेत्यांना, तालमीच्या काळापासून फक्त पात्रांच्या नावानेच ओळखले, उच्चारले जाते. तीच त्यांची ओळख होते. त्यामुळे सगळेच अभिनेते एकमेकांना मान देतात. एकमेकांशी बोलून झाले की, मान खाली झुकवून आदर दाखवतात. राम उठून जायला निघाले की, सर्वच पात्रे उभी राहतात. रामलीला सादरीकरणाच्याही आधीपासून ‌‘रामायणा‌’चे पठण चालू होते. ‌‘रामलीला मंचन‌’ सुरू करण्याआधी काशी नरेश येतात आणि सशस्त्र तुकडीतील पोलिसांची सलामीही दिली जाते.

रामलीलेचा भाग म्हणून राक्षस-राक्षसींचे मोठे पुतळे तयार केले जातात. त्यांना मोठे-मोठे मुखवटे घातले जातात. हे मुखवटे घातलेले राक्षसांचे पुतळे प्रेक्षकांमधून फिरतात आणि त्यावेळी मुले घाबरून गोंधळ घालतानाचे दृश्यही बघायला मिळते. मग या राक्षसांचा प्रत्यक्ष वध केला जातो. याचे स्वरूप भव्य असते. सीता स्वयंवरासाठी आलेल्या रामाच्या हातात खूप मोठे धनुष्य असते. ते तुटल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. राम-लक्ष्मण साकार करणारे अभिनेते खऱ्या घोड्यावरून, हत्तीवरूनच लग्नासाठी येतात. ‌‘गंगावतरणा‌’चा केवट-श्रीराम यांच्यातील संवादाचा प्रसंग तर प्रत्यक्ष नदीतीरावर सजवलेल्या होडीत साकार केला जातो. इथे प्रेक्षक आणि अभिनेता यांच्यात अंतर राहातच नाही. कारण, प्रेक्षक आणि रामकथेतही काही अंतर नसते. प्रेक्षकांचा सहभाग जितका आत्मीय, तितकीच रामलीला रंगत जाते. या लीलेमध्ये आधुनिकतेचा अंशही नाही. आजही हे नाटक वीज आणि आधुनिक ध्वनीक्षेपकाशिवाय सादर होते.

रामलीला सांगतेच्यावेळी श्रीरामांची भव्य आरती होते. दसऱ्याला काशी नरेशांकडून शस्त्रपूजन केले जाते. काशीचे नरेश हत्तीवरून मिरवणुकीत सामील होतात. ते लंका मैदान येथे येतात. तिथे ‌‘रावणविजय‌’ प्रसंगाचा पाठ केला जातो. यावेळी रावणाचे काम करणारा अभिनेता धावत येऊन रामाच्या पाया पडतो आणि त्याच्या वधाचा प्रसंग रामलीलेत केला जात नाही. नंतर मोकळ्या मैदानात रावणाची उंचच उंच प्रतिमा दहन केली जाते. त्यानंतर राम अयोध्येला परत येतात. ‌‘रामराज्याभिषेका‌’चा भव्य प्रसंगही मंचित केला जातो, तेव्हा काशी नरेश स्वतः श्रीरामांच्या पाया पडतात. बनारसमध्ये त्यानंतर श्रीरामांच्या आरतीचा भव्य सोहळा होतो. यात काम करणाऱ्या अभिनेत्यांचा असा विश्वास आहे की, लीला खेळताना संवाद ते बोलत नाहीत, तर ते-ते पात्रच जणू त्यांच्यामार्फत संवाद म्हणत असतात. कारण, हे केवळ नाटक नाही; तर रामलीला ही आध्यात्मिक अनुभूती आहे, ज्यात भक्त आणि श्रीराम यांच्यातील अंतर नाहीसे होते. असाही एक विश्वास आहे की, श्रीराम याकाळात अयोध्या सोडून रामनगरामध्ये एक महिना निवासाला येतात.

रामलीला हे काही साधे नाटक नाही, तर हा पंचेन्द्रियांना सुखद अनुभव देणारा प्रयोग आहे. तो पाहताच डोळे, कान, नाक यांच्यासह मनालाही तृप्तता प्राप्त होते. रामलीलेतील पात्रे संपूर्ण गावातून फिरतात. त्यासाठी आलेले साधू गावभर फिरून कीर्तन, प्रवचन, रामजप करतात. यातूनच संपूर्ण गावातच रामलीलेचे वातावरण तयार होते. भगवान, भक्त आणि भाव यांचा त्रिवेणीसंगम इथे होताना दिसतो. त्याचबरोबर नेपथ्यकार, रंगभूषा, वेशभूषाकार अशा अनेक कलावंतांनाही रामलीलेमुळे काम आणि उत्पन्न मिळते.

बरेलीमध्ये होळीच्या दिवशी रामलीलेला सुरुवात होते. काशीच्या रामनगरमध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला सुरू होऊन, शरदातील पौर्णिमेला पूर्ण होते. तर, नक्खीघाट इथे शिवरात्रीपासून चैत्र अमावस्येपर्यंत म्हणजेच 33 दिवस रामलीला चालते. रामलीला खेळली जाते, ते प्रामुख्याने काशी आणि अयोध्येत. त्याशिवाय मिथिला, मथुरा, आग्रा, अलीगढ, एटा, इटावा, कानपूर इथे आश्विन महिन्यात रामलीलेचे आयोजन होते. मात्र, एकाचवेळी अनेक ठिकाणी रामलीलांचे आयोजन नटराजाच्या भूमीत वाराणसीला येथे होते. राजस्थान आणि माळवा भागात ती चैत्राच्या महिन्यात संपन्न होते. प्रत्येक ठिकाणच्या ‌‘रामकथे‌’तले तपशील वेगळे असतात, कथाप्रसंग वेगळे रंगवले जातात. भारतभरातील अनेक शहरांमध्ये रामलीला 7, 14 ते 31 दिवसांपर्यंत खेळली जाते आणि या भव्य नाट्यातून, भगवान रामांचे पूर्ण आयुष्य उलगडले जाते. रामजन्मापासून सुरू होणाऱ्या या कथेत अनेक लहान-मोठे प्रसंग जिवंत होतात. राम-रावणातील दहा दिवसांच्या युद्धाने याचा शेवट होतो. दसऱ्याच्या दिवशी रावणाची विशाल आकृती तयार करून, त्याचे दहन केले जाते. अर्थातच, वाईट गोष्ट दीर्घकाळ टिकू शकत नाही आणि अखेर चांगल्याचा विजय होतो, याचेच हे प्रतीक. धर्म आणि अध्यात्माची सरिता रामलीलेमुळे समाजप्रवाहामध्ये वाहती राहते.

बरेली इथे रामाचे पात्र साकार करतात दानिश खान. ते म्हणतात की, “रामलीला सभी वर्ग की है. यह हमारी तहजीब भी है. हमारे शहर को गंगा-जमुना तहजीब के नाम से भी जाना जाता है और मैं इसी परंपरा को आगे बढ़ा रहा हूं. मैं कोशिश करता हूं कि, राम के विचार अपने अंदर डाल सकूं. क्योंकि राम का किरदार मुझे शक्ति देता है.” पूव रामलीलेमध्ये फक्त पुरुष अभिनेते काम करत असत. मात्र, आता महिला आणि मुलीसुद्धा यामध्ये आवडीने सहभागी होतात. काळाप्रमाणे रामलीला बदल करत असली तरी मूळ परंपरा टिकूनही असते, हेच याचे वेगळेपण आपल्याला भावते.

‌‘रामलीला मंचना‌’ची खरी ताकद आहे, ती प्रत्येकाला आपली आपली रामलीला सापडण्यात. ना इथे कोणी अभिनेता असतो, ना लेखक, ना दिग्दर्शक. रामाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याइतकाच, जेव्हा ती पाहणारा प्रत्येक प्रेक्षक स्वतःच राम झाल्याची आणि असल्याची अनुभूती घेतो, तेव्हा ती रामलीला प्रयोगापुरती राहातच नाही. म्हणून तर, उत्तर भारतातील गावेच्या गावे महिना-महिना रामलीलेत गुंततात, अगदी राममयच होऊन जातात. आपली आपली रामलीला, आपला आपला राम शोधते, दाखवते आणि घडवतेही, हेच तर परंपरांचे बलस्थान असते.

- डॉ. सुनीला गोंधळेकर
9423236433

Powered By Sangraha 9.0