छाऊ नृत्य - एक प्रभावी नाट्यात्मक अभिव्यक्ती

25 Mar 2026 19:17:12

रामकथा ही सर्वार्थाने देशाच्या चारही दिशांना पसरली. देशाच्या विविध भागांत प्रचलित लोककलांमधून या रामकथारुपी पुष्पाचा सुवास जनमानसामध्ये दरवळला. देशाच्या पूर्वेकडे असलेले ‌‘छाऊ नृत्य‌’ हे देखील यांपैकीच एक. या नृत्याच्या माध्यमातून देशाच्या पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये रामकथा प्रवाही झाली आणि प्रत्येक पिढ्यांमध्ये वारसा म्हणून आल्याचे दिसते. याच ‌‘छाऊ नृत्या‌’चा इतिहास त्यातील रामकथा सादरीकरणाची पद्धत, या कलेच्या पद्धती अशा सर्वांच्या माध्यमातून ‌‘छाऊ नृत्य‌’ कलेतील रामभक्तीचा घेतलेला धांडोळा...

‘रामायण‌’ आणि ‌‘महाभारत‌’ ही केवळ इतिहासकाव्ये नसून, भारतीय तत्त्वज्ञानाचे कथारूपी ज्ञानभांडार आहेत. हे ज्ञान समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे लोककला. वाल्मिकी ऋषींनी लव-कुशांच्या मुखी सुरू केलेली रामायणगानची परंपरा केवळ गायनापूत मर्यादित न राहता, ती लोकनृत्य, नाट्य, चित्रकथी, बाहुल्यांचा खेळ, रावण छाया, पाटेर गान अशा पिढ्यान्‌‍पिढ्या चालत आलेल्या अनेक दृक्‌‍श्राव्य लोककलांमधून आविष्कृत झाली आहे. रामायण-महाभारतातील कथा अनेकांच्या उपजीविकेचे साधन होऊन, त्यांची परंपराहहे शतकानुशतके जिवंत ठेवली आहे. पूर्व भारतातील छाऊ/छौ नृत्य ही त्यातीलच एक अनोखी व अत्यंत प्रभावी लोकनृत्य परंपरा. ‌‘छाऊ‌’ या शब्दाचा अर्थ ‌‘छाया ‌’(मुखवटा) किंवा ‌‘लष्करी छावणी‌’ अस होतो. नावातूनच या नृत्याचे मुखवटेधारी, लढाऊ शैलीचे स्वरूप स्पष्ट होते. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या सीमाभागात विकसित झालेल्या या नृत्यात भव्य मुखवटे, वनवासी परंपरा, धार्मिक विधी, युद्धकला, संगीत आणि कथांचे नाट्यमय सादरीकरण यांचा संगम दिसतो. मार्च-एप्रिल महिन्यात वसंत उत्सव किंवा त्यांच्या भाषेत पलाश उत्सवाच्या काळात येणाऱ्या चैत्र पर्वात, तसेच शिव गजन उत्सवात मंदिराबाहेरील प्रांगणात गावोगावी रात्री पुरुषांद्वारे छाऊ नृत्य सादर करण्याची परंपरा आहे.

नृत्याचा उगम - परिखण्डा खेल

तीन प्रांतांनुसार छाऊ नृत्याच्या तीन प्रमुख शैली मानल्या जातात. पश्चिम बंगालचे ‌‘पुरुलिया छाऊ‌’, झारखंडचे ‌‘सेराईकेला छाऊ‌’ आणि ओडिशाचे ‌‘मयूरभंज छाऊ‌’. छोटा नागपूर पठारावरील हे प्रदेश वनवासीबहुल आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहेत. संथल, मुंडा, भूमिज, कुम, महतो, डोम अशा जमातींचे हे मूळ नृत्य मानले जाते. या नृत्याचा उगम ‌‘परिखण्डा खेल‌’ या मार्शल आर्टमधून झाला आहे. ‌‘परी-खंडा‌’ म्हणजे ढाल आणि तलवार. सैनिकांचे शरीरसामर्थ्य वाढवण्यासाठी परिखण्डा खेळाचा सराव केला जात असे. त्याच परंपरेतून छाऊ नृत्यातही ढाल-तलवार वापरली जाते. आजही कलाकार दिवसा परिखण्डाचा सराव करतात आणि रात्री छाऊ सादर करतात. ढोल, धमसा, मोहुरी आणि शेहनाई यांच्या तालावर या नृत्याचे संपूर्ण सादरीकरण होते. छाऊचे वैशिष्ट्य म्हणजे यात संवाद किंवा गीते नसतात, तर कथानक पूर्णपणे देहबोली, वेशभूषा आणि मुखवट्यांतून व्यक्त होते.

पुरुलिया छाऊ

‌‘छाऊ‌’च्या तिन्ही शैलींमध्ये रामायणाचे प्रसंग सादर केले जात असले, तरी प्रत्येक शैलीची अभिव्यक्ती वेगळी आहे. यांपैकी पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील ‌‘पुरुलिया छाऊ‌’ ही शैली सर्वाधिक विशेष रंगतदार, भव्य, अत्यंत वीररसप्रधान आहे. खुल्या प्रांगणात मोठ्या चौकोनी जागेत हे नृत्य सादर करण्यासाठी पाच ते 20 पुरुषांचा समूह येतो. प्रत्येक नर्तकाने पात्रानुरूप मुखवटा घातलेला असतो व प्रसंगानुरूप तो प्रवेश करतो. त्यांची राजेशाही वेशभूषा सुंदर आणि आकर्षक असते. भडक धोतर, चमकदार जरीकामयुक्त जाकीट, खांद्यावरून मागे झुलणारे भपकेदार शेलावस्त्र, हातांची हालचाल उठून दिसण्यासाठी बोटाला बांधलेला रंगीत रुमाल, दोन्ही बाह्यांवर समान अंतरावर राखीसारखी बांधलेली चार मोठी फुले, चांदी-मोत्याचे अंगभर भरगच्च दागिने यांवरूनच एखादा राजेशाही घराण्यातील राजपुरुषच नाचत असल्याचा भास होतो. पण हा भास नाही, तर पात्रांचे मुखवटे घातल्यामुळे साक्षात श्रीराम, लक्ष्मण किंवा रावण डोळ्यांसमोर अवतरल्याचा अनुभवही प्रेक्षकांना मिळतो.

समूहातील प्रत्येक नर्तकाच्या नृत्यात एखाद्या पराक्रमी योद्धाची ढब सतत झळकत असते. हाताची मूठ आवळून, दोन्ही पायांत अंतर ठेवून, गुडघ्यात थोडे वाकून चौक स्थानकमध्ये ते उभे राहतात. नर्तकांच्या उड्या, फिरक्या, एका पायावर वेगाने गोल गिरकी घेऊन जमिनीवर बसणे, क्षणात उठून पुन्हा आणखी पाच-सहा गिरक्या घेणे, कोलांट्या उड्या यांसारख्या चपळ व वेगवान हालचाली सभोवताली बसलेल्या प्रेक्षकांना थक्क करून टाकतात. पक्ष्यांसारखी झटका देत मानेची व छातीची हालचाल असो, अथवा प्राण्यांसारखे दबे पाँव किंवा लांब पावले टाकल्याची चाल असो, या सर्वांची अगदी हुबेहूब नक्कल छाऊ नृत्यात दिसते. त्यांच्या भाषेत या आंगिक क्रियांना चौका, गती, चाली, धारण, पिकिटी, टोपका, उफलिस अशी नावे आहेत. या सर्वाचं प्रशिक्षण गुरू म्हणजे ‌‘उस्ताद‌’ देतात. मुखवटा घातल्यानंतर नर्तकाचा चेहरा पूर्णपणे झाकला जातो. त्यामुळे भावना व्यक्त करण्यासाठी, देहबोली हे एकमेव मुख्य माध्यम ठरते. त्याला शरीराच्या तांडव अंगी हालचालींवरच अवलंबून राहावे लागते, हेच या नृत्याचे खरे कौशल्य.

भव्य छाऊ मुखवटे

‌‘पुरुलिया छाऊ‌’चे सर्वांत आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे भव्य मुखवटे. हे मुखवटे कलाकारांना देव, राक्षस किंवा पौराणिक पात्रांमध्ये रूपांतरित करतात. पुरुलिया जिल्ह्यातील बाघमुंडी परिसरात, अयोध्या टेकड्यांच्या पायथ्याशी चरिदा नावाचे छोटे गाव आहे. मुखोश ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील, सुमारे 300 कुटुंबे मुखवटे बनवण्याचा परंपरागत व्यवसाय करत आहेत. सूत्रधार समाजाच्या नावाने ओळखले जाणारे येथील स्थानिक कारागीर ‌‘मिट्टीगारा‌’ तंत्राप्रमाणे मातीचे साचे, कागदाचे थर, कापड आणि नैसर्गिक रंग वापरून हे मुखवटे तयार करतात. चेहऱ्यावरचे डोळे, भुवया, नाक, हनुवटी प्रकर्षाने दिसतील, असे उठावदार बनवतात. मुखवट्यांवर रामासाठी हिरवा, लक्ष्मणासाठी गुलाबी, रावणासाठी काळा-गडद निळा, तर इतर पात्रांसाठी पिवळा किंवा केशरी रंग वापरला जातो. छाऊ नृत्यात चार प्रकारची पात्रे असतात. मानवी, दैवी, असुरी आणि प्राणी जसे सिंह, वाघ, बैल, मगर, गोरिला, नाग, बेडूक, कासव, वानर इत्यादी.

मुखवट्याच्या शिरी पांढऱ्या वनस्पतीपासून बनवली जाणारी बंगालमधील पारंपरिक शोलाची सजावट करतात. त्यावर पिसे, चमकी, फुले-पाने, गोटा-पट्टी, झालर, सलमा, मोत्यांच्या माळा यांचा थर रचून, मुखवट्यांना मोठे व आकर्षक रूप दिले जाते. कधी लांब केस, जटा, मिश्या, छोटे शिंग किंवा राक्षसी सुळेही मुखवट्यांवर तयार केले जातात. हनुमानासाठी वानराचा चेहरा, छोट्या सोंडेचा गणेश, वाघ व इतर प्राण्यांचे चेहरे, रावणासाठी एका रेषेत दहा चेहरे असेही मुखवटे साकार केले जातात. साधारण दोन ते सात किलो वजनाचे हे रंगीबेरंगी मुखवटे, छाऊ नृत्यात रामायणाला सजीव रूप देतात. ते केवळ सजावट नसून पात्राचे व्यक्तिमत्त्वही दर्शवतात. चरिदा येथील या वैशिष्ट्यपूर्ण मुखवट्यांना भारत सरकारचा जीआय टॅग मिळाला आहे.

या कलेचे आश्रयदाता व आद्य प्रवर्तक म्हणून राजा मदन मोहन सिंग देव ओळखले जातात. शेतकरी, कुंभार, वीटकाम करणारे मजूर, रंगारी, बिडी बनवणारे लोक आपली रोजगारी सांभाळत, छाऊ मंडलीमध्ये सहभागी होतात. परंपरा जोपासणे आपली जबाबदारी मानून, अतिशय श्रद्धेने ते छाऊ नृत्याला आपला वेळ, मेहनत आणि सर्वस्व अर्पण करतात. यातून त्यांना अगदी जुजबी पैसे मिळत असले, तरी या पवित्र कार्यामधून कित्येक पटींचा आनंद त्यांना मिळतो. देवावरच्या प्रगाढ श्रद्धेमुळे ते अतिशय तन्मयतेने छाऊ नृत्य करतात.

पुरुलिया छाऊतून रामकथा - तरणीसेन बधचे मंचन

महाराष्ट्रात जसे गदिमांच्या गीतरामायणावर, रामलीलामध्ये गोस्वामी तुलसीदासांच्या ‌‘रामचरित मानस‌’वर नृत्य केले जाते, तसेच ‌‘छाऊ‌’मध्ये 15व्या शतकातील कृत्तीबास ओझा लिखित ‌‘कृत्तिवासी रामायण‌’ (श्रीराम पांचाली) यावर नृत्य केले जाते. सुमारे 30 विविध प्रसंगांतून संपूर्ण रामायण सादर करतात. विश्वामित्रांच्या निर्देशानुसार ताडका वध, राम-लक्ष्मणाद्वारे राक्षसांचा वध, सीता स्वयंवर-शिवधनुष्य प्रसंग, रावण-जटायू संग्राम, राम-लक्ष्मण शूर्पणखा संघर्ष, राम-रावण युद्ध इत्यादी असे रामायणातील अनेक प्रसंग ज्याला ‌‘पाल‌’ म्हणतात; संपूर्ण ताकदीनिशी रोमांचकारी पद्धतीने सादर केले जातात.
अशीच एक प्रचलित कथा म्हणजे तरणीसेन बध.

नृत्यासाठी राखीव मोठ्या चौकोनी जागेत एकीकडे वादक बसतात. सुरुवातीला आधी वाद्यवादन होतं. वाद्यांच्या आवाजाने लोकांना आता नृत्य-नाटिका लवकरच सुरू होण्याचा संकेत मिळतो आणि संपूर्ण गाव हा खेळ पाहण्याकरिता प्रांगणात गोळा होते. वादकांच्या समोरच्या कडेला पात्रांना जाण्या-येण्यासाठी जागा असते. ती सोडून संपूर्ण सभोवताली प्रेक्षक बसलेले असतात. प्रत्येक प्रस्तुतीची सुरुवात गणेशवंदनेने होते. गणपतीचा मुखवटा व चार लाकडी हात लावलेला कलाकार येऊन नाचतो. नंतर प्रत्येक पात्राच्या प्रवेशाआधी गायक झुमूर गाण्यातून सादर होणाऱ्या पाल कथेचे वर्णन व पात्रांची ओळख करतो व कथेत पुढे आवश्यक त्यांचे संवादही तोच म्हणतो.

झुमूर संपताच ढोल-धमसाच्या तालावर या कथेत प्रथम रावण प्रवेश करतो. दहा मुख असलेला मोठा मुखवटा व दहा लाकडी हात लावून, त्याचे रूप फारच उग्र दिसते. अतिशय रागावलेला रावण जलद गतीत वाद्यांच्या तालावर पूर्ण मंचाला दोन-तीनवेळा गोल फेऱ्या मारतो, जेणेकरून प्रत्येक प्रेक्षक त्याला जवळून पाहू शकेल. नंतर अनेक गिरक्या, उड्या मारून आपले शौर्य, सामर्थ्य, ताकद प्रस्थापित करतो. तो जाताच सात-आठ योद्धे येऊन रावणाप्रमाणेच मंचाला फेऱ्या, गिरक्या, उड्या मारून जातात. कधी एका रेषेत, कधी जोडीने तीन-चार वेळा मंचावर ये-जा करत, नृत्यातून पात्राचे व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करतात. हे योद्धे म्हणजे विभीषणपुत्र तरणीसेन व त्याचे सेनापती होत.

यानंतर तरणीसेन व त्याच्या मातेचा नृत्यात्मक संवाद होतो. मातेची भूमिका पुरुषच स्त्री मुखवटा लावून बंगाली साडी नेसून करतो. ही माता जरी तरणीसेनसोबत नृत्य करत असली, तरी ती त्याच्यासारख्या उंच व कोलांट्या उड्या मारत नाही, तर स्त्रीसुलभ अशा सौम्य उड्या, सौम्य गिरक्या व स्त्रीपात्राला साजेशी पाय जास्त वर न उचलता चाल चालते. पुढे तरणीसेन व रावण या दोघांत नृत्याद्वारे पराक्रम, युद्धकौशल्य दाखवत रावण त्याला युद्धाला जाण्यास आदेश देतो. प्रस्तुतीचा खरा गमतीशीर भाग आता खाली घुंगुरडी बसून ‌‘डकवॉक‌’सारखे चालणारी वानर सेना आहे. मुखवटे लावलेले सहा-सात वानर हातात गदा घेऊन हुबेहूब माकडांच्या खोड्या, नकला, उड्या करून दाखवतात. त्यांच्या पाठोपाठ वीर हनुमान, विभीषण, राम, लक्ष्मण येतात. पात्रानुरूप हातात गदा, धनुष्य व तलवार धरलेली असते. तेही छाऊ नृत्य करतात. यात आता शेवटी तरणीसेन प्रवेश करतो. राम आणि त्याच्यातील युद्ध दाखवायला दोघे आमने-सामने, तिरपे, पुढे-मागे, गोल फिरत जोमाने युद्ध करतात. यावेळेस वाद्यांचा लय, ताल, आवाज वाढत जातो आणि वातावरणात एक ताण निर्माण होतो. खूप वेळ असेच वातावरण तंग राहून, दोघांच्या नृत्याने रंग येतो व शेवटी राम तरणीसेनाचा वध करतो. असा एक प्रसंग, म्हणजे एक ‌‘पाल‌’ तासभर चालतो. चैत्र पर्वात असे विविध प्रसंग रोज रात्रभर सादर केले जातात.

सरायकेला आणि मयूरभंज छाऊ

सरायकेला छाऊला झारखंडच्या सिंह देव राजघराण्याचा, तर ‌‘मयूरभंज छाऊ‌’ला भांज राजवंशाच्या राजांचा आश्रय मिळाला. या राजांनी नृत्याच्या संरक्षण आणि विकासाकडे विशेष लक्ष दिल्यामुळे, या शैलींमध्ये घराणेदार वैविध्य निर्माण झाले. काही काळ तर राजघराण्यातील सदस्य स्वतः नर्तक म्हणूनही सहभागी होत असत. परिणामी, या दोन शैली मुख्यतः क्षत्रिय समाजात प्रचलित झाल्या. त्यांनी नृत्याची संरचना, संहिता आणि संगीत यात काळानुरूप बदल घडवले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील काही राग-रागिणी व तालांच्या आधार नृत्याला समर्पक विविध विषयांवर आधारित नवीन दहा-15 मिनिटांच्या छोटेखानी रचना तयार केल्या, ज्या मुख्यत्वे आता रंगमंचावर सादर केल्या जातात. तेथील तत्कालीन संस्थानांकडून छाऊ मंडलींचे नियमितपणे कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करून, कलाकारांना प्रोत्साहन व प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे सरायकेला आणि ‌‘मयूरभंज छाऊ‌’मध्ये एक प्रकारची शिस्तबद्धता आणि अभिजातता दिसून येते. म्हणून या शैली शास्त्रीय नृत्यशैलीच्या जवळ जाणाऱ्या वाटतात. युद्धकलेतून उगम असल्या, तरी या दोन्ही शैली पुरुलिया छाऊच्या तुलनेत अधिक संयमित, रेखीव आणि सौंदर्यप्रधान स्वरूपात तेवढ्याच प्रभावीपणे सादर केल्या जातात.

सरायकेला छाऊ मुखवटे

झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील ‌‘छाऊ‌’मध्येही मुखवट्यांचा वापर होतो. पण विविध पात्रांसाठी वेगवेगळे मुखवटे नसून, एकच मानवी पुरुष व स्त्री मुखवटा सर्व पात्रांसाठी वापरतात. तो भडक-उठावदार रंगात नसून फिकट सौम्य रंगात असतो. भुवया, डोळे, ओठ अत्यंत नाजूक आखीव-रेखीव असण्यावर भर असतो. पुरुलिया छाऊसारखे मुखवट्यावर अनेक थरांची सजावट नसून, छोटेच मुकुट वजा सजावट असते. तसेच उग्र वीररसांचा तेजस्वी भाव चेहऱ्यावर नसून शांत, स्मित, निरागस असा एकच नैसर्गिक भाव मुखवट्यावर जाणवतो. म्हणूनच तर आंगिक क्रियेद्वाराच करूण, विरह, शृंगार, वीर इ. रसभाव नेमका व्यक्त करणे एक कसोटीच असते. हातांच्या हालचाली, शरीराची विभिन्न भंगीमा, मृदू आणि लयबद्ध आंगिक मुद्रा आणि हळूहळू वाढत जाणारा तालाचा ठेका यांच्या साहाय्याने नर्तक कथेतील व्यक्तिरेखेच्या भावना उलगडत उत्कर्षबिंदू गाठतो. रामायणातील अनेक भावनात्मक प्रसंग येथे अधिक प्रतीकात्मक पद्धतीने सादर होतात. उदाहरणार्थ, रामाचे वनवासातील जीवन, सीतेची व्यथा, हनुमानाची भक्ती, रावणाचा अहंकार, समुद्र शासन, ऋष्य शृंग, मेघनाद वध इत्यादी. या शैलीत रामायण केवळ युद्धकथा म्हणूनच नाही, तर भावनाप्रधान नाट्यमय कथानक म्हणून उलगडते.

सरायकेला छाऊची वेशभूषा पुरुलिया छाऊच्या तुलनेने कमी भडक, साधी, पण चमकदार असते. पुरुष पात्रे धोतर, सदरा आणि काही मूलभूत दागिने घालतात. स्त्री पात्रांचे सादरीकरणही पुरुषच करतात. ते साडी वजा घागरा आणि डोक्यावर पातळ ओढणी असा सर्व स्त्रीअलंकारयुक्त वेश धारण करतात. सरायकेल छाऊमध्ये कथा अधिकतर दोन मुख्य पात्रांवर आधारित असते. जसे राम-सीता, हर-पार्वती, नाविक-नाविका, दिवस-रात्री इ. यात शास्त्रीय नृत्याप्रमाणे, पुरुषी तांडव व स्त्री लास्य अशी नृत्याची दोन्ही अंगे स्पष्ट दिसतात. मयूर नृत्य, शिकारी नृत्य हीदेखील इतर प्रसिद्ध नृत्ये आहेत.

मयूरभंज छाऊ नृत्य - ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील ‌‘छाऊ‌’ नृत्य, ‌‘छाऊ‌’ परंपरेतील सर्वांत वेगळे मानले जाते. शिवाच्या भैरव रूपाला प्रसन्न करण्यासाठी चैत्र पर्वावेळी रौद्ररसप्रधान हे नृत्य सादर केले जाते. ‌‘मयूरभंज‌’ या नावाचा मोराशी थेट संबंध नाही. काही अभ्यासकांच्या मते, भांज राजवंशीय राजे स्वतःला मोराचे वंशज मानत किंवा स्थानिक लोक मोराची पूजा करत असावेत, म्हणून हे नाव प्रचलित झाले. त्या प्रांतातील आदिवासींचे नृत्य आणि पारिखण्डासारख्याच रुकमार नाच व पाईका नृत्यातूनच या शैलीचा विकास झाला. ढाल-तलवार हातात घेऊन निश्चित पदसंचालन करत ते विविध आंगिक मुद्रा सादर करतात.

सरायकेला - छाऊ व रामलीला नृत्याने प्रभावित होऊन 19व्या शतकात भांज राजांनी आपली राजधानी बारीपदा येथे, आपल्या राजघराणं ‌‘मयूरभंज‌’ नावाने नवीन छाऊ नृत्यशैली निर्माण केली. नृत्यशैलीच्या विकासासाठी महाराज कृष्ण चंद्र भंज देव, त्यांचे पुत्र महाराज श्रीराम चंद्र भंज देव, नातू महाराज प्रताप चंद्र भंज देव यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. दीड शतकापूव नावारूपास आलेल्या मयूरभंज नृत्याचे महाराजांनी वैशिष्ट्यपूर्ण शैलीकरण केल्यामुळे, त्याची शास्त्रीय नृत्याप्रमाणे योग्य रचनात्मक चौकट तयार झाली आहे. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे, यात मुखवटे वापरले जात नाहीत. त्यामुळे नर्तकांना चेहऱ्याच्या भावांद्वारे कथा व्यक्त करण्याची संधी मिळते. मयूरभंज छाऊमध्ये शरीराच्या वरच्या भागाच्या हालचालींना विशेष महत्त्व असते. कंबर, खांदे आणि छातीच्या हालचालींमधून पात्रांच्या भावना व्यक्त केल्या जातात. या हालचालींमध्ये कधी ओडिसी नृत्याची लय, तर कधी युद्धकलेचा प्रभाव जाणवतो.

ही शैली विशेषतः उपरी (उंच हवाई क्रिया), उफलीस आणि टोपका (पुढे झेप घेण्याची क्रिया) यासाठी ओळखली जाते. प्रत्येक कृतीचे पुढे फैलावणे, ताणणे, वाकणे, लपेटणे, झटकणे, आकुंचन करणे, ओढणे, जोरकस, सुस्पष्ट, अचूक, जलद, प्रवाही आणि लवचिक असे वगकरण केले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय ओडिसी नृत्यातील बोल आणि पारंपरिक लोकधूनांच्या तालावर हे नृत्य एकल (फुटनाच), युगल (जुडीनाच) आणि समूहात (मेलनाच) सादर केले जाते. यात नृत्त, नाट्य आणि नृत्य हे नर्तनाचे तिन्ही विधान सादर होतात. रंगमंचावर सात निश्चित प्रस्तुतीक्रमांतून ते सादर केले जातात. यामध्ये पुरुषांची वेशभूषा हातात कडा, गळ्यात एखादी माळ, धोतर, फेटा आणि कधी पंचायुक्त अशी साधीच असते. आजकाल देशविदेशांतील तरुण-तरुणी मयूरभंज शैली शिकून, त्यात ‌‘कॉन्टेम्पररी डान्ससारखे नवनवीन प्रयोग करत आहेत.

मयूरभंज छाऊमध्ये सीताहरणाचे मंचन - रामायणातील प्रसंग मयूरभंजमध्ये अधिक ऊर्जामय आणि भावपूर्ण पद्धतीने साकारले जातात. उदाहरणार्थ, वाली-सुग्रीव युद्ध, महि-रावण वध, राम शोक, जाम्बुवन, पवनपुत्र हनुमान, सीताहरण, लंकादहन, रावण जटायू संग्राम, राम-रावण युद्ध, इत्यादी. आपण सीताहरण हा प्रसंग पाहूया.

मयूरभंज नृत्याची सुरुवात नेहमी भैरववंदनेनी होते, ज्यात केवळ वाद्यवादन केले जाते. यानंतर कथेचा प्रारंभ वल्कले धारण केलेल्या राम, लक्ष्मण, सीता यांच्या प्रवेशाने होतो. निसर्गरम्य आनंदी वातावरणात ते दैनंदिन कामे करण्यात मग्न असल्याचे नृत्याद्वारे दाखवतात. जसे राम-सीता जोडीने निसर्गाचे निरीक्षण करतात, लक्ष्मण पाणी भरणे, धनुष्यबाण दुरुस्त करणे, धार काढणे इत्यादी. पुढे शूर्पणखा उग्र वेशात हातात खड्ग धरून नृत्यक्रियेतून आपली व्यक्तिरेखा उलगडत, दोघांच्या सौंदर्यावर भाळते. दुसरी नर्तिका तिचे पालटलेले रूप घेऊन राम-लक्ष्मणाशी प्रेमालाप करते. तेव्हा लक्ष्मणाने तिचे कान-नाक कापल्याने तिचा थयथयाट होतो. त्यानंतर नाचत-बागडत हरणाचा छोटा मुखवटा घातलेला सुवर्णमृग येतो. एखाद्या मृगाच्या सर्व हालचाली, उड्या, कटाक्ष, चंचलता, चाल सर्व काही नर्तक खुबीने सादर करतो. कथा अशीच पुढे सरकत असताना, रावण अंगावर भिक्षुकाचे वस्त्र गुंडाळून कुटीबाहेर येतो व सीतेला उचलून विमानातून लंकेला नेतो. तेथे रावण त्याच्या इतर असुरांसमवेत आपल्या पराक्रम, शौर्य आणि अहंकाराचे प्रदर्शन करतो.

यावेळी लक्ष्मण, रावण, सीता यांच्या मनातील द्वंद्वभाव, संभ्रम आणि रावणाचा कपटी स्वभाव हे सर्व केवळ वाद्य-संगीतावरच सादर केलं जातं. प्रत्येक परिस्थिती, पात्र व प्रत्येक सूक्ष्म भावाला अनुरूप ताल आणि राग प्रसंगानुरुप बदलतात. मयूरभंज नृत्याचा राजदरबारी विकास झाल्याने नृत्यात शास्त्रीय संगीताची सुसूत्रता, लयबद्धता, पण त्याचवेळी लोकसंगीताची तालात्मक सहजता, सरलता यांचा उत्तम मेळ आणि त्यावर उत्तम नृत्य सादरीकरण हे मयूरभंज नृत्याचे वैशिष्ट्य प्रेक्षकांना मोहून टाकते. व्यापकदृष्ट्या, पुरुलिया छाऊ दमदार, जोशपूर्ण आणि पौरुषी, सरायकेला छाऊ काव्यात्मक आणि भावनिक आणि मयूरभंज छाऊ चैतन्यशील आणि नैसर्गिक प्रवृत्तीचा आहे, असेच त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.

रामकथांनी जसे सर्व कलांना सामावून घेतलं आहे, तसेच समाजातील प्रत्येक घटकांनाही एकत्र बांधून ठेवले आहे. रामायण हे कलाकारांसाठी कलासाधना आहे, कारागिरांसाठी रोजगार, लहानांसाठी मनोरंजन, मोठ्यांसाठी मार्गदर्शन, प्रेक्षकांसाठी अनुभूती, भाविकांसाठी श्रद्धा-भक्ती, लोकांसाठी उत्सव, समाजासाठी परंपरा आणि देशासाठी वारसा आहे.

‌‘छाऊ‌’ नृत्यपरंपरेचे जतन, संवर्धन आणि देशविदेशांत त्याच्या प्रचारासाठी गुरू गंभीर सिंग मुरा यांना, 1981 साली ‌‘पद्मश्री‌’ पुरस्काराने सम्मानित केले गेले. छाऊ नृत्याच्या वैशिष्ट्यांमुळे 2010 साली ‌‘युनेस्को‌’च्या अमूर्त सांस्कृतिक वारसायादीत, छाऊ नृत्याचा समावेश झाला. या मान्यतेमुळे ही कला भारताचा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा ठरली आहे.

या कलेचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारकडून झारखंड येथे छाऊ केंद्राची स्थापना, विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश, ‌‘संगीत नाटक अकादमी‌’, ‌‘एनसीपीए‌’सारख्या संस्थांकडून कार्यशाळेचे आयोजन, गुरू-शिष्य परंपरेतून प्रशिक्षण, नामांकित कलाकारांना आर्थिक मदत आणि सम्मान, शिष्यवृत्ती आणि ‌‘प्रोजेक्ट छाऊनी‌’अंतर्गत डिजिटल दस्तऐवजीकरणासारखे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच देशविदेशांत ‌‘खजुराहो नृत्य महोत्सव‌’सारखे महोत्सव आयोजित करून छाऊ नृत्याचा प्रसारही केला जात आहे.

- क्षमा क्षीरसागर
9923120460

Powered By Sangraha 9.0