शिलालेखातील रामचरित्र

25 Mar 2026 15:27:07

अनेक राजांसाठी राजाराम हा आदर्श राजा होता. त्याच्यासारखे राज्य करणे, त्याच्यासारखा पराक्रम करणे, त्याच्यासारखे शत्रूवर जय मिळवणे, हे त्या राजांचे ध्येय होते. तसे करणे त्यांना जेव्हा जमले, तेव्हा तेव्हा त्यांनी ते शिलालेखांमधून नोंदवून ठेवले. रामाचा, रामायणाचा किंवा उल्लेख असलेल्या अशाचकाही शिलालेखांचा मागोवा...

शिलालेख हा एक प्राचीन लेखनप्रकार. शिळेवर अर्थात दगडावर कोरलेला लेख म्हणजे शिलालेख. कोरला गेल्याने त्यावरील मजकूर हा दीर्घकाळापर्यंत सुरक्षित राहिलेला पुरावा ठरतो. त्यावरूनच एखाद्या न बदलणाऱ्या गोष्टीचे, खात्रीच्या गोष्टीचे वर्णन ‌‘काळ्या दगडावरची रेघ‌’ असे केले जाते. दगडाप्रमाणे विटेवरदेखील लेख लिहिण्याचीही प्रथा होती. कच्च्या विटांवर लेख लिहून, नंतर त्या विटा भाजून काढल्या जात. म्हणूनच दगड-विटांकर लेख लिहिणाऱ्या लेखनिकाने ‌‘दगडापेक्षा वीट मऊ‌’ असा वाक्प्रचार आणला असावा, असो. शिलालेखावरील माहिती शेकडो वर्षे राहात असल्याने, त्यावरून प्राचीन काळातील इतिहास, धार्मिक संदेश व राजांविषयीची माहिती प्राप्त होते. इतर वंशांतील समकालीन राजांविषयी माहिती मिळते. शिलालेखातील राम किंवा रामायण हे केवळ धार्मिक काव्याचे प्रतीक नाही, तर हजारो वर्षे पूवची भारतीय संस्कृती, आदर्श राजव्यवस्था, सामाजिक व ऐतिहासिक अस्तित्वाचे भक्कम पुरावे आहेत. याविषयी आपण या लेखात जाणून घेऊ.

दक्षिण चोल राजांचे चार शिलालेख पाहू. सुंदर चोलद्वारा अंबिल ताम्रपट्टिका, राजेंद्र चोल प्रथम यांचे दोन तिरुवलं ताम्रपट्टिका आणि वीर राजेंद्र चोलचा कन्याकुमारी येथील शिलालेख प्रसिद्ध आहेत. वीर राजेंद्र चोल याने कन्याकुमारीच्या अम्मन मंदिराच्या खांबावर कोरलेल्या शिलालेखात ब्रह्मा, मरीची, इक्ष्वाकुपासून सुरू केलेली वंशावळ हरिश्चंद्र, सगर, भगीरथपासून श्रीरामापर्यंत पोहोचते. यावर रामस्तुती चार भजनांत केली आहे. श्रीरामाच्या कुटुंबात ‌‘चोल‌’ नामक राजाचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे. शिबीचा उल्लेख तीन शिलालेखांत येतो. हे शिलालेख दहाव्या-11व्या शतकातील चोल राजाच्या आज्ञेनुसार कोरले गेले. येथे शिबी, राम, भरत यांना चोल वंशाचे पूर्वज मानले गेले आहे. हे चारही शिलालेख संस्कृतमध्ये असोन, या लेखांमधून चोल राजे स्वतःला रामाचे वंशज म्हणवून घेत होते, हे कळते.

2011 मध्ये मलप्पुरम येथे अरिकोडजवळ कुरुमाथुर विष्णू मंदिराच्या नूतनीकरणावेळी नवव्या शतकातील शिलालेख सापडला. त्यामध्येही चेर राजा महोधायपुरमचे राम राजशेखर यांनी, पेरूमलाचा संबंध रामाशी जोडल्याचे समोर आले होते. कुरुमथुर विष्णू मंदिरात ग्रॅनाईट स्लॅबवर पल्लव ग्रंथ लिपीतील संस्कृत शिलालेख आहे. संस्कृत भाषेत, शार्दुल विक्रीडित छंदात हे तीन लोक आहेत. यात राजशेखर इक्ष्वाकु वंशातील आहे. त्याला समुद्रापार जाण्याची इच्छा होती. तसेच त्याची कीत दूरदूर पसरावी, अशीही त्याची इच्छा होती. त्याने मनुच्या नियमानुसार न्यायाने राज्य केले, असे त्याचे कौतुक आहे. हा शिलालेख चेरु पेरूमलमचा सर्वांत जुना दस्तऐवज आहे, असे डॉ. व्हेरियर यांचे मत आहे. पहिल्या चेर राजाची अचूक तारीख देणारी ही पहिलीच नोंद. डॉ. शेषाद्री यांच्या अभ्यासानुसार 13व्या शतकापर्यंत तामिळनाडूमध्ये, राम मंदिराशी संबंधित 36 शिलालेख आढळले. दक्षिणेप्रमाणे उत्तर भारतातसुद्धा शिलालेखांमध्ये रामाचे आणि रामायणाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात.

जसे प्रयागराजमध्ये 11व्या शतकातील ऐतिहासिक शिलालेख उपलब्ध आहे. चंदेल राजवंशातील राजा कीर्तिवर्मन यांनी, मंत्री वत्सराज यांद्वारा स्थापित केलेला हा शिलालेख आहे. हा शिलालेख 16 ओळींचा संस्कृत भाषेमध्ये आढळतो. हा 11व्या शतकातील नागरी लिपीत कोरलेला असून, गढवा किल्ल्यातील पुरातत्त्वीय पाहणीदरम्यान हा सापडला. या लेखामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा कळते. यावरून इसवी सन 1095 मध्ये रामनवमी साजरी होत असल्याचा, सर्वांत जुना पुरावाही मिळतो. शिलालेखाच्या अभ्यासावरून वाल्मिकी रामायणातील रामाच्या वनवास प्रवासाचा संबंध लक्षात येतो. यावरूनच हिंदू स्मृतीमध्ये रामाच्या वनवास स्थळांविषयीची आस्थाही प्रतिबिंबीत होते. रामकेंद्रित लोकास्था यामधून दिसून येते. हा शिलालेख चैत्र शुक्ल एकादशीला स्थापित केला असून, रामयात्रेच्या समारोपाशी याचा संबंध जोडला जातो. ही परंपरा येथे आजही आढळते. यावरूनच रामाचे भारतीय मनातील सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व लक्षात येते.

विष्णू हरी शिलालेख - बाबरी मशीद परिसरात सापडलेला हा विष्णू हरी शिलालेख राम मंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा मानला गेला. या शिलालेखात 12व्या शतकात गहडवाल राजांनी राम मंदिर बांधले होते, असे समजते. खजुराहो येथील दहाव्या शतकातील शिलालेखात हनुमानाच्या रामभक्तीविषयीचा उल्लेख आहे. हा शिलालेख हनुमानाला ‌‘रामदूत‌’ असे संबोधित करतो. यामध्ये किष्किंधा येथील राम-हनुमान संवादाचा उल्लेख आहे. यावरून हनुमानाची रामभक्ती व उपासना याचे प्राचीन महत्त्व लक्षात येते. हा शिलालेख तीन ओळींत, संस्कृत भाषेत आहे. येथे हनुमानाची विशाल मूतदेखील आहे. ही मूत सिंदुराने लिंपीत पांढऱ्या मंदिरात स्थापित आहे. मंदिर चंदेल वंश दरम्यानचे आहे.

भारताबाहेरील शिलालेखांमध्येदेखील रामाचे वा रामयणाचे संदर्भ आढळतात. जावा द्वीपावर चंडी पनातरान येथे एका भव्य शिवालयामध्ये, शिलाचित्र रूपात रामकथा निर्मिली आहे. महपहित वंशाच्या राजकुमार हयमबुरुक याची माता जयविष्णू वद्धिनीच्या राजकाळामध्ये, इ. 1347 मध्ये हे शिलालेखाचे काम पूर्ण झाले. येथे 106 शिलाचित्र आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने हनुमानाच्या पराक्रमाचे वर्णन अधिक आहे.

व्हिएतनाम बोचान शिलालेख प्रशांत महासागराच्या पश्चिम तटावर स्थित व्हिएतनाम येथे बोचान या ठिकाणीदेखील शिलालेख आढळला. येथे अयोध्या कांडातील एका लोकाचे अंतिम चरण दिसून येते. व्हिएतनाम येथील ‌‘त्रा-किड‌’ नामक ठिकाणी असलेल्या शिलालेखात, चंपा येथील राजा प्रकाश धर्म याने शिलालेख कोरविला, असे आहे. यात आदि कवी वाल्मिकी यांचा उल्लेख आहे.

कंपूचिया येथील बील कंतेल येथे सम्राट भाववर्मन शिलालेखात (इ. स. 598) प्रतिदिन रामायण महाभारत यांचे येथे पाठ होत असत. कंबोज नरेश यशोवर्मन (889-900) शिलालेखानुसार, राघवपुत्रांनी वाल्मिकींनी सांगितल्यानुसार आपल्या पित्याचे यशोगान केल्याचा उल्लेख आला आहे. भारतीयांच्या मनात पिढ्यान्‌‍पिढ्या रामायण रुजले आहे. राम आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे. सद्गुण, सदाचार सद्विवेक, सद्विचार अशी सकारात्मकता जीवनात अंगीकारावी, यासाठी श्रीरामचरित्र कालजयी ठरते. भारतीय संस्कृतीचा मानबिंदू म्हणून श्रीरामाचा उल्लेख जगभरात होतो. शिलालेखातून राम व रामायण यांची लोकप्रियता, नैतिकता आणि रामराज्य संकल्पना लक्षात येते. केवळ उत्तरेतच नाही, तर दक्षिणेत, देशाबाहेरही रामायणामुळे भारतीय परंपरा कशी सर्वदूर विस्तारत गेली, हे देखील लक्षात येते. या शिलालेखामुळे श्रीराम कसे साऱ्या विश्वाशी जोडले गेले आहेत, रामामुळे भारतीयांची संस्कृती सर्वत्र कशी पसरली, याचे दर्शन जगाला होते. आजच्या पिढीसाठी रामाची कीत, त्याचे नीतिनियमांचे पालन व ऐतिहासिक महत्त्वाचे पुरावे म्हणून हे शिलालेख प्रेरणादायी ठरतील, यात शंका नाही.

- डॉ. वैशाली काळे-गलांडे
9420456918



Powered By Sangraha 9.0