रामकथेची प्रयागतीर्थे ...

25 Mar 2026 16:56:45

रामकथा एखाद्या महासागराप्रमाणे आहे... आपल्या प्रतिभेच्या उष्म्याने लेखक-कवी-नाटककार यांनी त्याचे बाष्प केले आणि त्यांच्या प्रतिभेच्या जलधारांच्या रूपात रामकथा नव्याने वर्षत राहिली...नवनव्या रूपात समाजमनांचे सिंचन करत राहिली. रामचरित्रातूनच जन्मलेल्या अनेक प्रवाहांनी रामकथेची पुण्यधारा हजारो वर्षं वाहात आहे. अनेक साहित्यप्रकारांची वळणे घेत, प्रत्येक वळणावर तितकीच रम्य, तितकीच जीवनदायी! वाल्मिकी प्रतिभेतून जन्मलेली रामायणगंगा,विविध प्रतिभावान कवी नाटककारांच्या नाट्यप्रतिभेची यमुना आणि सुप्त रूपाने असलेली श्रीरामचरित्ररूपी सरस्वती यांचा त्रिवेणी संगम पहायला मिळतो तो प्राचीन रामायण आधारित नाटकांत. अशा सुंदर प्रयाग तीर्थांचा हा परिचय...

आधुनिक काळात एखाद्या धार्मिक पौराणिक कथेवर आधारित नाटक लिहिताना, त्यात नाटककार त्याच्या स्वतंत्र चिंतनातून ती कथा मांडतो. पात्रनिर्मिती, प्रसंगनिर्मिती किंवा भिन्न दृष्टिकोन देणारी नाटके ही आधुनिक वाटत असली, तरी वस्तुतः त्याची बीजे संस्कृत नाटककारांनी आधीच पेरून ठेवलेली दिसतात!

भासाने लिहिलेल्या दोन नाटकांपैकी ‌‘अभिषेकनाटकम्‌‍‌’ हे भासाचे सहा अंकी नाटक आहे. वाल्मिकी रामायणातील किष्किंधा कांड ते युद्ध कांड, म्हणजे वालीच्या वधापासून ते रामाच्या राज्यभिषेकापर्यंतचा कथाभाग यामध्ये आहे. यातील व्यक्तिरेखा तशा सरळ मूळ कथेनुसारच आहेत. रावण हा दुराचरण करणारा स्त्रीलंपट आहे, लक्ष्मण आज्ञाधारक आहे. सीतेच्या अग्निपरीक्षेनंतर स्वतः अग्नी तिच्या शुद्धतेची ग्वाही देतो; राम-सीता अयोध्येला परततात आणि रामाचा अभिषेक होतो.

‌‘प्रतिमा‌’ नाटकात भासाने कथेत पुष्कळ भर घातलेली दिसते. कैकेयी म्हणजे खलनायिका केंद्रस्थानी ठेवून लिहिणे, हेच मुळात त्या काळात धाडसाचे होते. भरत अयोध्येत येतो आणि नगराबाहेरच्या प्रतिमागृहात दशरथाची प्रतिमा पाहून त्याला पित्याच्या निधनाची वार्ता कळते, इकडे राज्याभिषेकाची सिद्धता चालू असताना सीतेच्या हाती एक वल्कल येते, कैकेयीला मिळालेल्या वरामुळे नव्हे, तर ‌‘विवाहशुल्क‌’ म्हणून कैकेयीपुत्राला राज्याभिषेक करायचे दशरथाने मान्य केलेले असल्यामुळे कैकेयी ही मागणी करते, असे वाल्मिकी रामायणात नसलेले प्रसंग भासाने लिहिले आहेत.

त्यातही भास कैकेयीच्या वर्तनाला एक उदात्त हेतूची जोड देतो. श्रावणबाळाच्या आई-वडिलांनी दशरथाला दिलेल्या ‌‘तूही पुत्र वियोगाने मरशील,‌’ या शापामुळे आता दशरथाला मृत्यू तर चुकणार नाही, पण शापाच्या प्रभावाने एखाद्या पुत्राचा मृत्यू व्हायला नको, म्हणून प्राणप्रिय रामाचा वियोग तिने वनवासाच्या रूपात घडवून आणला, असे भास लिहितो! तणावामुळे मी 14 वासरे (दिवस)ऐवजी चुकून वत्सरे (वर्षे) बोलून गेले, असेही ती म्हणते आणि तिचीही ‌‘प्रतिमा‌’ बदलून टाकण्यात, नाटककार यशस्वी होतो. ‌‘प्रतिमा‌’ नाव हे दोन्ही अंगांनी सार्थ ठरते.

19व्या शतकाच्या उत्तरार्धापसून ‌‘उत्तररामचरित‌’, ‌‘जानकी परिणय‌’, ‌‘अभिषेक‌’, ‌‘प्रतिमा‌’ आदि संस्कृत नाटकांची मराठी भाषांतरे आली आहेत. त्याआधीच रामायणावर आधारित मराठी नाटकेही लिहिली गेली, जसे 17व्या शतकातील तंजावूरचे राजे शहाजीराजे भोसले व त्यांचा पुतण्या प्रतापसिंह यांच्या रचनांमध्ये ‌‘सीताकल्याण‌’, ‌‘लक्ष्मण परिचय‌’, ‌‘जानकी सुखोल्लास‌’ अशी रामायणाधारित नाटके दिसतात.

मराठी नाट्यसृष्टीची नांदीच मुळी ‌‘सीता स्वयंवर‌’ या विष्णुदास भावेंच्या नाटकाने झाली आहे. सांगलीचे तत्कालीन राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या सूचनेमुळे भावे यांनी ‌‘सीता स्वयंवर‌’ लिहिले. पहिला प्रयोग राजांना फार आवडला. त्यानंतर रामायणावर अजून दहा नाटके तयार करून, त्याचे प्रयोग भावे यांनी राजांच्या समोर केले. मराठीतील साधारण 200 पौराणिक नाटकांपैकी, सुमारे 25 नाटके ही रामायणावर आधारित आहेत. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे ‌‘संगीत रामराज्यवियोग‌’, खाडिलकरांचे ‌‘सवती मत्सर‌’, मामा वरेरकर यांचे ‌‘भूमिकन्या सीता‌’, भासाच्या ‌‘प्रतिमा‌’वर आधारित पद्माकर गोवईकरलिखित ‌‘धाडिला राम तिने का वनी‌’, वि. वा. शिरवाडकरांचे ‌‘कैकेयी‌’ अशी अनेक नाटके आली.

नाटककाराची वैचारिक बैठक, त्या काळाची समाजाची स्थिती आणि विचारपरिवर्तनाची गरज यानुसार नाटकांची मांडणी झालेली जाणवते. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‌‘रामराज्यवियोग‌’ नाटकामध्ये रावणवध ही ईश्वरी योजना असून तिला बाधा येऊ नये, ती सफल व्हावी, यासाठी रामाने वनात जाणे आवश्यक होते; ते काम मंथरेने कैकेयीकडून करवून घेतल्याचे दर्शवल्यामुळे कैकेयीसह मंथरेची व्यक्तिरेखाही यात उन्नत झाली आहे.

मामा वरेरकर यांची सीता सोशिक, कुटुंबवत्सल आहेच, पण ती प्रश्न विचारणारी, युक्तिवाद करणारी आणि स्वतःच्या मनातला सल बोलून दाखवणारी आहे. ऊर्मिलेचे दुःख समजून घेताना ती म्हणते, ‌‘निष्ठेचा अतिरेक म्हणजे शुद्ध निर्दयपणा. या भक्तिभावाचे जग पोवाडे गाईल; पण या आत्यंतिक भक्तीच्या पायी पिचून जाणाऱ्या जीवाची आठवण कुणाला राहील का?‌’ शेवटी ती एक विधान करते, “पृथ्वी निष्कंटक झाली, ते सीता-रामाचे राज्य होतं म्हणून; पण या निष्कलंक सीतेला पुन्हा पुन्हा अग्निदिव्य करावे लागत आहे, ते रामराज्य आहे म्हणून!” गिरिजाबाई केळकर यांनी ‌‘मंदोदरी‌’ नाटकातून स्त्रीचे हक्क आणि कर्तव्ये मंदोदरीच्या माध्यमातून मांडली, तर स्नेहलता रेड्डी यांच्या ‌‘सीता‌’ या
नाटकात अग्निदिव्याला नकार देणारी सीता मांडतात.

शिरवाडकरांची कैकेयी ही ‌‘अनंत कालची माता‌’ आहे. तिच्या वर्तनाचे मूळ निव्वळ तिच्या मातृप्रेमात आहे. शिवाय तिला विश्वासात न घेता निर्णय घेण्यावर तिचा आक्षेप आहे. ती दशरथाला म्हणते, “स्त्री संतापली की फार तर पलंगातून बाहेर पडेल, पण माता जेव्हा क्रुद्ध होते, तेव्हा ती सारे जग जाळून टाकते.” पण कैकेयीच्या करणीने संतापलेला भरत जेव्हा तिला एक ‘आई‌’ म्हणून लाथाडतो, तेव्हा मात्र तिच्या दुःखाला पारावर उरत नाही. शेवटी पश्चात्ताप दग्ध होऊन ती रामाला आशीर्वादच देते.

सीतात्यागाचा प्रक्षिप्त प्रसंग, कैकेयीचे क्रूर वर्तन लेखकांनी विविध पद्धतीने हाताळले. मूळ रामकथेबद्दल, त्यातील मूल्यांबद्दल जराही अनादर, अश्रद्धा या लिखाणात नाही. आजही आदर्श समाजरचनेची तुलना रामराज्याशी केली जाते. त्यामुळे रामकथेवर आधारित नाट्यकृतींच्या माध्यमातून रामराज्याचे परिपूर्ण स्वप्न दर्शवायचे, तर त्यात जाती, लिंग, वृत्ती यांवर आधारित अन्याय नसावेत, हे वाटणे, श्रीरामांच्या आदर्श व्यक्तित्वाला साजेसे असेच.

‌‘जोवरी हे जग जोवरी भाषण, तोवरी नूतन नित रामायण‌’ या आधुनिक वाल्मिकींच्या वचनाप्रमाणे, वाल्मिकींच्या काव्यगंगेचा प्रवाह संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही काठांच्यामधून अविरतपणे वाहातच राहील.

- विनिता तेलंग
9890928411


Powered By Sangraha 9.0