राजस्थानी रंगरेषांमधील रामभाव

25 Mar 2026 17:47:11

राजस्थानी चित्रशैलीतून रामायण अतिशय प्रभावी आणि जिवंत स्वरूपात उभे राहते. ठसठशीत रंग, नाजूक रेषांकन आणि सूक्ष्म भावदर्शन यांच्या साहाय्याने रामकथेतील विविध प्रसंग चित्रांमधून सहज उलगडतात. प्रत्येक चित्र हे त्यामागे दडलेली कथा, भावना आणि त्या काळातील सांस्कृतिक परंपरा यांचा सुंदर मिलाफ आहे. या लेखात राजस्थानी चित्रशैलीतील अशा विविध चित्रांमधून रामायणाचा घेतलेला वेध...

राजस्थान हे देशाच्या पश्चिमेकडील राज्य. वीररसासाठी प्रसिद्ध असलेले राजस्थान, कलांमध्येही तितकेच अग्रणी आहे. राजस्थानची विविध विषयांवरील चित्रे प्रसिद्ध असून, एकट्या राजस्थानमध्ये चित्रांच्या अनेक शैली आढळतात. रामकथेचा मोह, सर्व कलांना त्यागता आला नाही. मग राजस्थानी चित्रकला याला अपवाद कशी ठरेल? राजस्थानी चित्रकलेमध्येही मोठ्या प्रमाणात रामभाव दिसून येतो. मेवाडचे राणा जगत सिंग (इस. 1628 - इस. 1652) यांनी तयार करवून घेतलेल्या ‌‘सचित्र रामायण पोथी‌’मध्ये, 400हून अधिक चित्रे रामायणाची आहेत. मेवाड शैलीमधील ही चित्रे, 16व्या-17व्या शतकातील आहेत. मनोहर आणि साहिबदीन हे त्याचे प्रमुख चित्रकार. या काळातील ‌‘आर्ष रामायण‌’च्या चित्रणाचे श्रेयदेखील प्रामुख्याने या दोन कलाकारांनाच दिले जाते. या चित्रांवर मुघल शैलीचा प्रभाव दिसतो; त्यामध्ये पात्रांनी घातलेला अंगरखा, पारदर्शक साडी, नथ, चिलखत वगैरे मुघल शैलीला साजेसे असलेले दिसते. भिक्षा मागायला आलेला रावण साधूच्या ऐवजी फकिराच्या वेशात दिसतो, यावरुनच या शैलीवर असलेला मुघल संस्क़ृतीचा प्रभाव विशद होतो.

‌‘आर्ष रामायणा‌’च्या चित्रांमध्ये रामाच्या जीवनाशी संबंधित विविध घटना वेगवेगळ्या शैलींमध्ये, वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केल्या आहेत. चित्रकार साहिबदीन याने प्रभू रामाच्या जन्मापासून ते रावणाच्या अंत्यविधीच्या तयारीपर्यंत, या ग्रंथात प्रथमच प्रत्येक दृश्याला अनेक चित्रांमध्ये विभागले आहे. यामध्ये ‌‘बालकांड‌’पासून ‌‘उत्तरकांड‌’पर्यंतचा कथाभाग आला असून, ‌‘रामायणा‌’तील काही पात्रांची वंशावळ आणि हनुमानाच्या पराक्रमांचे वर्णनही आले आहे. ‌‘किष्किंधाकांड‌’ आणि ‌‘सुंदरकांड‌’मधील चित्रे तर चकित करणारी आहेत. त्यातील पात्रे जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि तपकिरी रंगांमध्ये चित्रित केली असून, त्यावरील रेषा ठळक आहेत. ही चित्रे मेवाड शैलीतील चित्रांपेक्षा मोठी असल्याने वेगळीच भासतात.

फार पूवपासून पुस्तकांचे सौंदर्य आणि आकर्षण वाढवण्यासाठी लघुचित्रांचा वापर केला जाई. ही लघुचित्रे सामान्यतः हाताने काढलेली असत. वनस्पतींपासून रंग तयार करून त्यात भरले जात. ही ग्रंथचित्रे केवळ काही इंच रुंद आणि काही इंच लांब आकाराची असत.

उत्तरेत कांग्रा, बसोहली, कोटा, पहाडी, मंडी, चंबा, देवगड आणि जयपूरच्या शैलीतील ‌‘रामायणा‌’वर आधारित ग्रंथचित्रे आढळतात. 15व्या आणि 16व्या शतकात मेवाड हिंदू संस्कृतीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक होते. ‌‘रामायणा‌’तील धर्मसंकल्पना आणि विशेष करून त्यातील राजधर्म राजपुतांना आकर्षित करत होता. त्यात मेवाडचे सूर्यवंशी सिसोदिया राजपूत तर स्वत:ला रामाचे वंशज असल्याचे मानत. त्यामुळे राणा जगत सिंग यांनी, आपल्या पूर्वजांचे वर्णन करण्यासाठी या भव्य हस्तलिखिताची निर्मिती करवून घेतली. राणा जगत सिंग यांची ‌‘रामायण की बात‌’ ही पुस्तकेदेखील एका नवीन पद्धतीने चित्रित केली आहेत.

रामायणाची जन्मकथा

कामुक क्रौंच दाम्पत्याच्या हत्येमुळे दुःख आणि शोकाने भरलेला एक लोक वाल्मीकींच्या हृदयातून स्फुरला, जो ‌‘रामायण‌’ महाकाव्यात बहरला. त्यानंतर निर्मिलेले रामायणण् हे महाकाव्य आशियातील सर्वात उत्तरेकडील बर्फाच्छादित सायबेरियापासून ते इंडोनेशियाच्या सुसंस्कृत भूमीपर्यंत मानवाच्या मनात आनंदाच्या लाटा निर्माण करत आहे.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः |
यत्‌‍ क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्‌‍ ॥ 1-2-15

म्हणजे, “हे निषाद! तू या कामवेड्या क्रौंचाला मारले आहेस. म्हणून तू कायम सुख आणि शांतीचा उपभोग घेऊ शकत नाहीस.” वाल्मीकींच्या हृदयस्पश हृदयातून उत्स्फूर्तपणे स्फुरलेल्या या शुद्ध, प्रवाही वाणीमध्ये आपल्या संस्कृतीच्या खऱ्या स्वरूपाचा मूलभूत संदेश आणि संक्षिप्त स्पष्टीकरण सामावलेले आहे.

महष वाल्मीकी एका अशा महान पुरुषाच्या शोधात होते, जो सद्गुणी आणि शूर, धार्मिक, सत्यनिष्ठ, कृतज्ञ, दृढ चारित्र्यवान, सद्भावनेचा, विद्वान, सक्षम, आकर्षक, मनावर ताबा असलेला, तेजस्वी, मत्सररहित आणि एक योद्धा असेल. राम हे व्यक्तिमत्त्व संपूर्ण जगाचा महान आदर्श असल्याने, वाल्मीकींचा राम हा आजही जगाला मार्गदर्शन करत आहे. हे आदर्श प्राप्त करण्यासाठी मनुष्य वारंवार ‌‘रामायणा‌’चे पठण आणि चिंतन करतात. ‌‘रामायण‌’ ही मानवी जीवनाचीच कथा आहे.

राजस्थानी चित्रशैलीच्या विविध शैलींमधील रामाची कथा पुढीलप्रमाणे येते. पूर्वीच्या काळी छायाचित्रणाचा शोध लागण्यापूव, पुस्तके सुंदर आणि मनोरंजक बनवण्यासाठी चित्रांचा वापर केला जात असे. ही चित्रे सहसा हाताने काढलेली असत. या लहान आकाराच्या चित्रांना ‌‘लघुचित्रे‌’ म्हणत. भारतीय लघुचित्रे जगप्रसिद्ध आहेत. ही लघुचित्रे कांग्रा, बसोहली, कोटा, पहाडी, मंडी आणि दख्खनी यांसारख्या लघुचित्रकलेच्या विविध शैलींमध्ये आढळतात. या चित्रांमधील्र रंग गडद असतात. हे रंग मुख्यत्वे करून लहान पक्ष्यांमध्ये, ढगांमध्ये, झोपड्यांमध्ये आणि झाडांमध्ये दिसून येतात. ही चित्रे आजही राष्ट्रीय संग्रहालयात अतिशय सुरक्षितपणे ठेवलेली आहेत.

जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत आणि नद्या अस्तित्वात आहेत, जोपर्यंत मानवांमध्ये ‌‘रामायणा‌’ची कथा सांगितली जाणार असल्याचे म्हटले जाते. जो कोणी वेदांप्रमाणे असलेली ही रामाची कथा वाचतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो, असे येथील रामकथा चित्रांच्या मधून भाव प्रकट होताना दिसतात.

माळवा शैली

अयोध्येचा राजा दशरथ ‌‘पुत्रकामेष्टी‌’ यज्ञ करतो. एका वर्षानंतर त्याच्या तीन राण्यांना चार मुले होतात- कौसल्येला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न.

बिकानेर शैली

राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे बालपण आणि शिक्षण. षोडशवषय राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींच्या यज्ञाचे रक्षण करतात. ऋषींच्या आज्ञेनुसार, रामाने मारिच नावाच्या राक्षसाचा पराभव केला आणि त्राटिका राक्षशीणीला व तिचा शक्तिशाली पुत्र सुबाहुला ठार मारतो. त्यानंतर मिथिलेला जाताना गौतम ऋषींच्या आश्रमात अहिल्या भेटीचा प्रसंग घडतो. ही सर्व चित्रे बिकानेरी शैलीमध्ये तयार केलेली आहेत.

मंडी शैली

सीता ही मिथिलेचा राजा जनकाची कन्या होती, जी जनकाला शेतात, भूमातेच्या कुशीत सापडली. राजा जनकाने आपली कन्या सीता हिच्यासाठी योग्य वर शोधण्याकरिता एक ‌‘पण‌’ ठेवला होता. त्याने संपूर्ण भारतातील राजकुमारांना आपल्या दरबारात बोलावले आणि त्यांना भगवान शिवाच्या धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचे आव्हान दिले. अनेक शक्तिशाली राजे आणि योद्धे अयशस्वी ठरले. यामुळे राजा जनक दुःखी झाला. त्यावेळी विश्वामित्र राम-लक्ष्मणाला घेऊन मिथिलेला आले. त्यावेळी रामाने ते धनुष्य सहज उचलले, प्रत्यंचा लावण्यासाठी वाकवत असता धनुष्याचे दोन तुकडे झाले.

त्यानंतर रामाचा सीतेशी विवाह झाला. त्याच मांडवात लक्ष्मणाचा ऊर्मिलाशी, भरताचा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीतशी विवाह झाला. उत्सव संपल्यानंतर सर्वजण अयोध्येला परत आले. विशेष असे की, राजस्थानमधली काही महत्त्वाची राजघराणी ही भारताच्या हिमाचल प्रदेशातील भागात स्थलांतरित झाली आणि त्यांनी तेथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली. राजस्थानी चित्रकला तेथील कलेशी मिसळलेली दिसते.

जयपूर मिश्रशैली

यामध्ये राजा दशरथाचा मृत्यू, चित्रकूट येथील भरतभेट प्रसंग. शूर्पणखा प्रसंग आणि सुवर्ण मृग प्रसंगांचे चित्रण आहे.

चंबा शैली

हे चित्र चंबा शैलीमध्ये दिसते, रावण एका ऋषीचे रूप धारण करून सीतेला पळवून नेण्यासाठी येतो. भिक्षा मागणाऱ्या रावणासाठी जेव्हा सीता भिक्षा घेऊन येते, तेव्हा रावण तिचे अपहरण कर्तो. तो तिला हाताला धरून ‌‘पुष्पक‌’ विमानात बसवून घेऊन जातो. चित्रात रावणाला दहा डोकी आणि 20 हात दाखवले आहेत. त्यावेळी जटायू सीतेच्या मदतीला आला असता, तेव्हा रावणाने जटायूला जखमी केले आणि सीतेला घेऊन उडून गेला, असे हे चित्र आपल्याला या शैलीमध्ये दिसते. सीतेच्या शोधात असताना रामाची भेट जटायूशी झाली, ज्याने रामाला संपूर्ण घटना सांगितल्याचेही वर्णन चित्रात केल्याचे दिसते.

उनिरा शैली

जेव्हा दक्षिणेकडे पुढे जात राम ‌‘ऋष्यमुख‌’ नावाच्या पर्वतावर येतात, जिथे वालीकडून पराभव झाल्यानंतर सुग्रीव लपून बसला होता. हनुमानाने याठिकाणी रामाचे नम्रपणे स्वागत केले आणि त्याला सुग्रीव यांची भेट घडवून आणली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण होतात. रामाने त्याचा भाऊ वालीकडून त्याचे राज्य हस्तगत करून सुग्रीवाला दिले. सुग्रीवाने वानरसेनेला सीतेच्या शोधात पाठवले. त्यानंतर हनुमान उड्डाण होते. त्याला सीता ‌‘अशोक वाटिके‌’त सापडते. रामाने वानरसेनेकरवी सेतू बांधला आणि लंकेवर चाल केली. त्याने रावणाला युद्ध टाळण्याचा प्रस्ताव पाठवला; पण रावणाने आपला हट्ट सोडला नाही आणि राक्षस व वानरसेनेत भीषण युद्ध सुरू झाले. तेव्हा इंद्रजिताचा एक बाण लक्ष्मणाला लागून तो मूर्च्छित झाला. लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमान ‌‘संजीवनी‌’ वनस्पती घेऊन येतो. याचे वर्णन या शैलीमध्ये दिसते.

गुलेर शैली

रावण कुंभकर्ण याला उठवतो आणि त्याला युद्धात पाठवतो. तोही या युद्धामध्ये रामाच्या हातून मारला गेला. त्यामुळे रावण अत्यंत दुःखी झाला. अखेरीस, रावण आणि राम एकमेकांसमोर आले. रामाने एक शक्तिशाली बाणाच्या सहाय्याने रावणाचा वध केला. त्यानंतर बिभीषणाला लंकेचा राजा बनवण्यात आले आणि रामाचा 14 वर्षांचा वनवास संपलेल्याचे चित्रण गुलेर शैलीमध्ये करण्यात आले आहे.

बुंदी शैली

अयोध्येला परतण्यापूव, रामाने सीतेला तिच्या पावित्र्याची खात्री करण्यासाठी अग्निपरीक्षा देण्यास सांगितले. लंकेतील युद्ध संपल्यानंतर, राम आणि सीता पुष्पक विमानातून सुरक्षितपणे अयोध्येला परतले. बिभीषण, सुग्रीव, हनुमान, जांबवान आणि अंगद आदि वीरही रामासोबत परतले. सर्वांनीच त्यांचे मोठ्या थाटामाटात अयोध्येत स्वागत केले. रामाचे राज्य पृथ्वीवरील आदर्श राज्य म्हणून ओळखले जात होते आणि संपूर्ण पृथ्वीवर रामराज्य सुरू झाले. ‌‘रामायण‌’ या संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास केल्यावर हे नक्कीच सांगता येईल की, राजस्थानी चित्रशैलीतील, विविध शैलींमधील ‌‘रामाची कथा‌’ ही लघुचित्रे सुंदर आणि आकर्षक रंगांनी रंगवलेली, हस्तनिर्मित आणि आकाराने लहान आहेत. त्यांचे रंग खनिज रंग, नीलशंखांसारखी मौल्यवान रत्ने, तसेच शुद्ध सोने आणि चांदी वापरून तयार केले जात असत. ही चित्रे भूतकाळातील वरील शैलींमध्ये आढळतात. तसेच राजस्थानी चित्रशैलीमध्ये ‌‘रामायण‌’ विषयांवर आधारित चित्रांना एक विशेष प्रतिष्ठा आहे, असे आपल्याला दिसते.

अशाप्रकारे राजस्थानी चित्रशैलीतून उलगडणारे रामायण एक जिवंत अनुभव बनते. या चित्रांमधील रंग, रेषा आणि भाव
यांच्या संगमातून भक्ती, संस्कृती आणि सौंदर्य यांचा अद्वितीय मिलाफ साकार होतो. या राजस्थानी चित्रकलेतील रामभावाचा वेध घेताना आपण केवळ दृश्य सौंदर्याचाच आस्वाद घेत नाही, तर त्या मागील युगधर्म, श्रद्धा आणि कलाकाराच्या अंतर्मनाचाही मागोवा घेतो. म्हणूनच राजस्थानी चित्रशैलीतील रामायण हे केवळ कलात्मक परंपरेचे नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचे एक तेजस्वी प्रतीक ठरते. जे काळाच्या ओघातही आपल्या भावविश्वाला नित्य नवीन अर्थ देत राहते.

- अनुराग वैद्य
8308810194

Powered By Sangraha 9.0