पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)’च्या पार्श्वभूमीवर उभे राहिलेले वाद, धमक्या आणि खेळाडूंचं पलायन पाहता, ही दरी आता केवळ क्रीडात्मक स्पर्धेची राहिलेली नाही; ती व्यवस्थेच्या स्थैर्याची आणि राष्ट्राच्या प्रतिमेची लढाई बनली आहे. ‘पीएसएल’ सुरू होण्यापूवच ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेने विदेशी खेळाडूंना दिलेल्या धमक्या या केवळ एक बातमी नाही, तर पाकिस्तानच्या क्रीडा व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा म्हणावा लागेल. क्रिकेटसारख्या आंतरराष्ट्रीय खेळासाठी सुरक्षितता ही मूलभूत अट असते. मात्र, जेव्हा खेळाडूंना येऊ नका, असा थेट इशारा दिला जातो; तेव्हा कोणत्याही ‘लीग’ची विश्वासार्हता डळमळते. त्यातच सामने बंद दरवाजांआड घेण्याचा निर्णय हा ‘पीएसएल’च्या प्रतिमेला आणखी धक्का देणारा ठरतो. प्रेक्षकांशिवाय क्रिकेट म्हणजे आत्म्याविना शरीर. खेळ होतो; पण त्यात जिवंतपणा राहात नाही.
पूर्वी, ‘पीएसएल’ ही ‘टी-20 लीग’ जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान खेळवली जायची आणि ‘आयपीएल’ सुरू होण्यापूर्वीच संपायची, ज्यामुळे वेळापत्रकाचा संघर्ष टाळला जायचा. मात्र, गेल्या वर्षापासून दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होत आहेत, ज्यामुळे अनेक परदेशी खेळाडू ‘आयपीएल’मध्ये सामील होणं पसंत करताहेत. हा मुद्दा सर्वप्रथम तेव्हा समोर आला, जेव्हा द. आफ्रिकेचा कॉर्बिन बॉश 2025 मध्ये लिझाद विल्यम्सच्या जागी ‘मुंबई इंडियन्स’मध्ये सामील होण्यासाठी ‘पेशावर झल्मी’चा संघ सोडून गेला, ज्यामुळे त्याच्यावर ‘पीएसएल’कडून एक वर्षाची बंदी घालण्यात आली. फेब्रुवारी-मार्चमध्ये ‘टी-20 विश्वचषक 2026’ झाल्यामुळे ‘पीएसएल’ पुन्हा एकदा मार्च-एप्रिलमध्ये ढकलण्यात आली, ज्यामुळे अधिक परदेशी खेळाडूंनी ‘पीएसएल लीग’ सोडून ‘आयपीएल’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
अलीकडील काळात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेजवळील चकमकी, हवाई हल्ल्यांचे आरोप आणि परस्पर दोषारोप यांमुळे परिस्थिती अधिकच चिघळलेली आहे. दोन्ही देशांतील वाढता तणाव ‘पीएसएल’वर अप्रत्यक्ष; पण गंभीर परिणाम करताना दिसतो. सीमावाद, दहशतवाद आणि राजकीय अस्थिरता यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. विविध देशांची क्रिकेट मंडळे सावध झाले आहेत. पाकिस्तानमध्ये मोठे आंतरराष्ट्रीय क्रीडा आयोजन करणे तर अधिकच कठीण. अशातच बांगलादेश सरकारने स्पष्ट संकेत दिलेत की, जर सुरक्षाप्रश्न निर्माण झाला, तर ते आपल्या खेळाडूंना ‘पीएसएल’मध्ये पाठवणार नाहीत. हा निर्णय केवळ एका देशापुरता मर्यादित नाही, तर तो इतर देशांसाठीही दिशादर्शक ठरू शकतो. जर हीच भूमिका ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यांनीही घेतली, तर ‘पीएसएल’ची आंतरराष्ट्रीय ओळख मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
‘आयपीएल’च्या यशामागे केवळ पैसा नाही, तर एक सुसंगत आणि दीर्घकालीन दृष्टी आहे. मजबूत प्रशासन, उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था, प्रचंड प्रेक्षकवर्ग आणि जागतिक स्तरावरील ब्रॅण्डिंग या सर्व गोष्टींमुळे ‘आयपीएल’ आज केवळ एक ‘लीग’ नसून, क्रिकेटचा ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ बनली आहे. आज ‘पीएसएल’ पाहता, एका निर्णायक टप्प्यावर उभी आहे. तिच्यासमोर तीन मोठी आव्हाने आहेत; सुरक्षा आणि विश्वास पुनर्स्थापित करणं, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आकर्षित करणं, आर्थिकदृष्ट्या स्पर्धात्मक बनणं. जर ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’ने या बाबींवर ठोस पावलं उचलली नाहीत, तर ‘पीएसएल’ हळूहळू जागतिक नकाशावरून मागे पडू शकते.
भारताची प्रतिमा जगभरात एक स्थिर, सुरक्षित राष्ट्र म्हणून तयार झाली आहे. मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आणि मजबूत संस्थात्मक व्यवस्था यामुळे परदेशी खेळाडू व त्यांच्या बोर्ड्समध्ये भारताबद्दल विश्वास निर्माण झाला. पण, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’ने आपल्यावर आलेल्या संकटाकडे केवळ तात्पुरत्या समस्येप्रमाणे पाहिलं, तर ते चुकीचं ठरेल. कारण, हा प्रश्न केवळ एका सीझनचा नाही, तर दीर्घकालीन विश्वासाचा आहे. सुरक्षा व्यवस्थेची पुनर्बांधणी, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा विश्वास परत मिळवणं आणि ‘लीग’ला स्थैर्य देणं अपरिहार्य. पण, जिथे मुळात देशातच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिरता नाही, तिथे क्रिकेटकडून तरी अपेक्षा काय म्हणा? असो. आजचा क्षण ‘पीएसएल’साठी निर्णायक आहे. ती स्वतःला नव्याने उभी करणार की, या संकटांच्या ओझ्याखाली दबून जाणार, ते पाहायचे.