Maharashtra Post Office Bomb Threat : राज्यभरातील पोस्ट ऑफिसना बॉम्बने उडवण्याची धमकी! आरडीएक्स असल्याच्या ई-मेलने खळबळ, यंत्रणा सतर्क

25 Mar 2026 16:34:30

Maharashtra Post Office Bomb Threat)

मुंबई : (Maharashtra Post Office Bomb Threat)  राज्यभरातील पासपोर्ट व टपाल कार्यालयाना आरडीएक्स बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी मिळाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. दुपारी १२:१० वाजता सायनाईड मिश्रित १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आला होता, त्यामुळे काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Maharashtra Post Office Bomb Threat)

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील टपाल कार्यालयांना ई-मेल प्राप्त झाला आहे. "तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी सायनाईड मिश्रीत १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा", असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. ई-मेलमध्ये नमूद केलेली वेळ उलटूनही कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा स्फोटाची घटना न घडल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तरीही, या प्रकारामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Maharashtra Post Office Bomb Threat)

या ईमेलमुळे राज्यातील बहुतांश टपाल कार्यालयातून एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून काही ठिकाणी पोलिसांकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पासपोर्ट कार्यालयाची बाँम्ब शोध व नाशक पथकाकडून तपासणी केली जात असून तसेच पार्सलचे बॉक्स तपासले जात आहेत. दरम्यान, संबंधित ई-मेलची प्राथमिक तपासणी केली असता तो तामिळनाडू येथून पाठविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, अशा प्रकारच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. (Maharashtra Post Office Bomb Threat)


Powered By Sangraha 9.0